Post Harvest Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Post Harvest Technology : शेतीमाल स्वच्छतेसाठी रोटरी ब्रश वॉशर, अल्ट्रासोनिक वॉशर

Post Harvest Fruit Hygiene : फळे, भाज्यांच्या काढणीनंतरच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध आधुनिक यंत्रांची आपण माहिती घेत आहोत. गेल्या भागामध्ये ड्रम वॉशर, स्प्रे वॉशर यंत्राची माहिती घेतली.

Team Agrowon

डॉ. विक्रम कड डॉ. गणेश शेळके डॉ. सुदामा काकडे

रोटरी ब्रश वॉशर मशिन

विविध फळे आणि भाज्यांच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या रोटरी ब्रश वॉशर यंत्रामध्ये एक फिरणारा सिलिंडर आणि फिरणारे ब्रशेस (rotary brushes) वापरले जातात. त्यामुळे शेती उत्पादन घासले जाऊन, त्यावरील माती, धूळ, कीडनाशकांचे अवशेष आणि अन्य अशुद्धता पाण्याच्या साह्याने स्वच्छ होतात. मोठ्या प्रमाणात हाताळणी केल्या जाणाऱ्या प्रक्रिया उद्योगामध्ये या यंत्रांचा वापर होतो. बटाटे, गाजर आणि इतर कंदवर्गीय भाज्यांसाठी अधिक उपयुक्त आहे. यात पाणी पुनर्वापर प्रणाली वापरली जात असल्याने कमी पाण्यामध्ये अधिक स्वच्छता होते.

कार्यप्रणाली

रोटरी ब्रश वॉशरमध्ये वृत्तचिती (सिलिंडर) आकाराच्या यंत्रभागामध्ये ब्रशेस आणि फिरणारे रोलर्स असतात. त्यात एका बाजूने फळे किंवा भाज्या आत टाकल्या जातात. त्यावर फिरणाऱ्या ब्रशेसमुळे सौम्य घर्षण होते. त्याच वेळी दुसऱ्या बाजूने उच्च दाबाने पाण्याची फवारणी सुरू असते. काही वेळी गरजेनुसार सौम्य क्लोरीनयुक्त द्रावणही वापरले जाते. त्यामुळे शेतीमालावरील घाण, माती, रसायने व सूक्ष्मजीव काढून टाकले जातात.

यंत्राचा तपशील

 ब्रश रोलर्स ः साधारणतः नायलॉन किंवा तत्सम मऊ ब्रशेस असतात.

 रोटरी ड्रम (फिरणारी नळी) ः गोलसर किंवा झुकलेल्या दिशेने फिरणारी नळी असते. ती शेतीमालाला पुढे ढकलण्याचे काम करते.

 पाण्याचा फवारा यंत्रणा ः उच्च दाबाच्या पाण्याच्या साह्याने धुण्याची प्रक्रिया होते.

 निचरा प्रणाली ः स्वच्छतेनंतर घाण व पाणी बाहेर टाकण्यासाठी विशेष वाहिन्या असतात.

 वेग नियंत्रण प्रणाली ः ब्रशेसच्या फिरण्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी मोटर आणि गिअर सिस्टिम असतो.

धुण्याची प्रक्रिया

 प्रारंभिक तयारी : शेतीमालामध्ये मातीची ढेकळे किंवा दगड वगैरे अन्य घटक नसल्याची खात्री करून घेणे आवश्यक असते.

 वॉशिंग यंत्रामध्ये भरणा : शेतीउत्पादने यंत्रात वरून टाकली जातात. तिथे फिरणाऱ्या ब्रशच्या संपर्कात येतात.

 ब्रशिंग आणि पाणी फवारणी : फिरणाऱ्या ब्रशेसच्या साहाय्याने उत्पादनाच्या पृष्ठभाग घासले जातात. उच्च दाबाच्या पाणी फवाऱ्याने उरलेली घाण व अशुद्धता दूर केली जाते.

 रोटरी ड्रम : रोटरी ड्रमच्या हळूहळू फिरण्यामुळे फळे पुढे ढकलली जातात.

 गाळणी आणि सुकविण्याची प्रक्रिया : स्वच्छ झालेली उत्पादने गाळण्याच्या प्रणालीमधून पुढे पाठवली जातात, तिथे अधिकचे पाणीF काढून टाकले जाते. शेतीमाल कोरडा करण्यासाठी हवेच्या प्रवाहाचा वापर केला जातो.

मुख्य वैशिष्ट्ये

 सतत फिरणारी सिलेंडर प्रणाली : उत्पादन एकसमान स्वच्छ करण्यासाठी एक विशेष प्रकारचा फिरणारा सिलिंडर वापरण्यात येतो.

 ब्रश आणि पाण्याच्या जेटचा संयोग : उत्पादनाच्या पृष्ठभागावरील चिकटलेली माती आणि घाण स्वच्छ करण्यासाठी.

 स्टेनलेस स्टील संरचना : अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सुरक्षित आणि दीर्घायुषी.

 समायोज्य फिरण्याचा वेग : उत्पादनाच्या प्रकारानुसार स्वच्छतेच्या तीव्रतेत बदल करण्यासाठी वेग नियंत्रित केला जातो.

 उच्च कार्यक्षमता व जलद प्रक्रिया : फळे आणि भाज्यांची वेगाने स्वच्छता शक्य होते.

 संपूर्ण स्वच्छता : फळे व भाज्यांवरील माती, धूळ व सूक्ष्मजीव पूर्णतः निघून जातात.

 संवेदनशील फळांसाठी सुरक्षित : ब्रशेस मऊ असल्यामुळे फळांचे नुकसान होत नाही.

 पाणी व ऊर्जेची बचत : पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत कमी पाणी लागते. पाण्याचा पुनर्वापर करून पर्यावरणपूरक प्रक्रिया शक्य होते.

 स्वयंचलित प्रक्रिया : कमी देखभाल खर्च असलेले तंत्रज्ञान. कामगारांची गरज कमी पडते. हाताने धुण्याच्या तुलनेत कमी श्रम लागतात.

 स्वच्छतेचा उच्च स्तर : अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक असलेली स्वच्छता सहज मिळते. या फळे आणि भाज्यांसाठी प्रामुख्याने वापर : सफरचंद, द्राक्षे, संत्री, लिंबू, आंबा, पेरू, डाळिंब, बटाटा, गाजर, बीट, मुळा, टोमॅटो, आले, हळद इ.

अल्ट्रासोनिक वॉशर मशिन (Ultrasonic Washer Machine)

अल्ट्रासोनिक वॉशर/ क्लिनिंग मशिन ही उच्च वारंवारितेच्या व प्रचंड कंपनसंख्येच्या ध्वनिलहरींवर (ultrasonic waves) आधारित यंत्रणा आहे. कोणत्याही वस्तूंचे स्वच्छ आणि निर्जंतुक धुणे शक्य करते. या मशिनमध्ये पाण्यात निर्माण होणाऱ्या सूक्ष्म बुडबुडे उत्पादनाच्या पृष्ठभागावरील अशुद्धता, धूळ, कीटकनाशकांचे अवशेष आणि सूक्ष्मजीव पूर्णतः हटवतात. हे तंत्रज्ञान मुख्यतः औद्योगिक, वैद्यकीय, अन्न प्रक्रिया आणि प्रयोगशाळांमध्ये वापरले जाते.

कार्यप्रणाली

अल्ट्रासोनिक वॉशर/क्लिनिंग मशिनची कार्यप्रणाली मुख्यत: ध्वनिलहरींच्या (साउंड वेव्ह) वापरावर आधारित असते. या यंत्रामध्ये एक ट्रान्सड्यूसर बसवलेला असून, तो विद्युत ऊर्जेचे रूपांतर २० किलोहर्टझ (kHz) पेक्षा जास्त उच्च वारंवारीतेच्या ध्वनिलहरींमध्ये करतो. त्यामुळे द्रवामध्ये सूक्ष्म बुडबुडे तयार होतात. ते फुटतेवेळी अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे शेतीमालावरील घाण, धूळ, रसायनाचे अवशेष आणि सूक्ष्मजीव दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.

यंत्राचा तपशील

 ट्रान्सड्यूसर : उच्च वारंवारितेच्या ध्वनिलहरींची निर्मित करतो.

 स्वच्छता टाकी : फळे किंवा वस्तू ठेवण्यासाठी असलेली टाकी.

 पंप : पाणी किंवा स्वच्छचा द्रावणे चांगल्या प्रकारे फिरविण्यासाठी.

 पाणी उकळण्यासाठी प्रणाली : पाणी उकळण्यासाठी किंवा सुसंगत तापमान राखण्यासाठी.

 नियंत्रण प्रणाली (कंट्रोल पॅनेल) : मशिनचे कार्य नियंत्रित करण्यासाठी.

धुण्याची प्रक्रिया

 मशिनची तयारी : यंत्रामध्ये आवश्यक प्रमाणात स्वच्छ पाणी भरावे. काही प्रकरणांमध्ये ओझोनयुक्त पाणी किंवा सौम्य निर्जंतुक द्रव ही वापरले जाते.

 फळांची मांडणी : धुण्यासाठी निवडलेली फळे टाकीमध्ये ठेवावीत.

 अल्ट्रासोनिक प्रक्रियेची सुरुवात : मशिन सुरू करताच अल्ट्रासोनिक वेव्ह द्रवामध्ये उत्सर्जित होतात. या लहरींमुळे द्रवामध्ये सूक्ष्म बुडबुडे तयार होतात आणि फुटतात. या क्रियेच्या परिणामस्वरूप फळांच्या पृष्ठभागावरील घाण, रासायनिक अवशेष, जंतू आणि कीटकनाशकांचे अवशेष प्रभावीपणे काढले जातात.

 स्वच्छ धुणे आणि निचरा : अल्ट्रासोनिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फळे स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली जातात. त्यानंतर, फळे कोरडी करण्यासाठी एअर ब्लोअर किंवा नैसर्गिक पद्धतीचा वापर केला जातो.

मुख्य वैशिष्ट्ये

 अल्ट्रासोनिक तंत्रज्ञान : २० ते ४० किलोहर्टझ वारंवारितेवर (फ्रिक्वेंसी) कार्य करणारी प्रणाली उत्पादनाच्या अगदी सूक्ष्म भागांमधील घाण काढून टाकते.

 रसायनमुक्तमुक्त प्रक्रिया : कोणत्या घातक रसायनाच्या वापराशिवाय फक्त पाण्याच्या साह्याने प्रभावी स्वच्छता शक्य होते.

 नाजूक उत्पादनांसाठी उपयुक्त : बेरी, द्राक्षे, स्ट्रॉबेरी आणि इतर नाजूक उत्पादनांसाठी सुरक्षित व प्रभावी प्रणाली.

 वेगवान आणि प्रभावी : हे तंत्रज्ञान जलद आणि प्रभावी असून, वेळ आणि श्रमामध्ये मोठी बचत होते.

अल्ट्रासोनिक वॉशर मशिन प्रामुख्याने खालील फळांसाठी वापरली जाते.

फळांचे प्रकार अल्ट्रासोनिक क्लिनिंगचा प्रभाव.

सफरचंद फळावरील मेणाच्या थराचा आणि कीटकनाशकाच्या अंशाचे प्रभावीपणे नाश करता येतो.

द्राक्षे लहान आणि क्लस्टरमध्ये असलेल्या फळांवरील धूळ आणि जंतू काढतो.

संत्री कवचावरील बुरशी व केमिकल अवशेष काढतो.

स्ट्रॉबेरी नाजूक फळांवरील कीटकनाशक आणि घाण दूर करतो.

टरबूज कवचावरील जंतू आणि घाण काढतो.

- डॉ. विक्रम कड, ०७५८८०२४६९७

कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT