Agriculture Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Modern Agriculture Technology : भाजीपाला पिकातील आधुनिक तंत्रज्ञान

Vegetable Farming : भाजीपाला लागवड प्रामुख्याने सरी वरंबा किंवा गादीवाफ्यावर केली जाते. त्यात आता रुंद वरंबा सरी पद्धतीचा (बीबीएफ) अवलंब वाढवला पाहिजे. कारण ही पद्धत मध्यम, भारी जमिनीत जलसंधारण आणि अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

Team Agrowon

डॉ. अरविंद सोनकांबळे, डॉ. सोनाली वानखडे

भाग २

Indian Agriculture : भाजीपाला लागवड प्रामुख्याने सरी वरंबा किंवा गादीवाफ्यावर केली जाते. त्यात आता रुंद वरंबा सरी पद्धतीचा (बीबीएफ) अवलंब वाढवला पाहिजे. कारण ही पद्धत मध्यम, भारी जमिनीत जलसंधारण आणि अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. रूंद वरंब्यावर लागवड केल्यामुळे पिकामध्ये हवा खेळती राहते.

मुळांजवळ माती, पाणी आणि हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. परिणामी बियाण्याची उगवण व पिकाची पुढील वाढ जोरदारपणे होते. पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरल्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होते. पावसाच्या खंडाच्या काळातही त्याचा फायदा होतो.

आच्छादनाचा वापर

शेतात झाडांजवळील शेत जमिनीचा पृष्ठभाग आच्छादनाने झाकून ठेवता येतो. त्यामुळे ओलावा टिकून राहून पाण्याची २५ ते ३० टक्के बचत होते. या भागामध्ये तणे वाढत नाहीत. परिणामी, आंतरमशागतीची कामे कमी होतात.

वायूचे आदान-प्रदान चांगल्या पद्धतीने होऊन माती सशक्त होते. बीज उगवणक्षमतेत वाढ होते. प्लॅस्टिक आच्छादनामुळे कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण वाढते. प्रकाश संश्‍लेषणाला मदत होते.

गादीवाफ्यावर पाणी साचून राहत नाही. आच्छादनामुळे भाजीपाला पिकामध्ये हानिकारक ठरणाऱ्या मूळसड, खोडसड यांचे प्रमाण कमी होते. वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काकडी, कलिंगड, ढेमसे आणि खरबूज या बरोबरच मिरची, वांगी, टोमॅटो या पिकांमध्येही आच्छादनाचा वापर करतात. आच्छादनासाठी पॉलिथिन पेपर किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर करता येतो. प्लॅस्टिक आच्छादनामुळे फळांची जमिनीशी संपर्क ठळतो. फळे खराब होत नाहीत.

भाजीपाला काढणी

भाजीपाला पिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करावी. मागणीनुसार त्याचे नियोजन करावे. काढणी झाल्यानंतर त्याची प्रतवारी करूनच बाजारात पाठवावे.

आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धती

हरितगृहातील लागवड

व्यावसायिक भाजीपाला उत्पादनासाठी शेडनेट किंवा पॉलिहाउसचा वापर होऊ लागला आहे. यात प्रामुख्याने बिगर हंगामात पिके घेऊन अधिक उत्पन्न मिळवले जाते. नैसर्गिक वायू विजनावर आधारित शेडनेटमध्ये तापमान, आर्द्रता व कार्बन डायऑक्साइड या घटकांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे योग्य व्यवस्थापनातून निर्यातक्षम उत्पादन मिळू शकते.

भाजीपाला पिकातील कलम तंत्रज्ञान

या तंत्रज्ञानामध्ये स्थानिक माती व परिस्थितीमध्ये मुळांची जोमदार वाढ होणाऱ्या देशी वाणांची रूटस्टॉक म्हणून निवड केली जाते. त्यावर कलम करण्यासाठी अपेक्षित संकरित वाणांची काडी सायन म्हणून वापरली जाते. यासाठी व्यापारी तत्त्वावर क्लेफ्ट कलम, टॉप इन्सर्शन कलम, भेट कलम, व पाचर कलम अशा विविध कलम पद्धतींचा वापर केला जातो.

कलम तंत्राचे फायदे

मातीतून प्रादुर्भाव करणाऱ्या रोगांना ही रोपे प्रतिकारक्षम असतात.

कलम केलेले रोप सूत्रकृमींना बळी पडत नाही.

जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता अधिक असते.

पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ होत असल्यामुळे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा अधिक होतो.

एकाच वेळी संकरित वाण आणि देशी वाणांचे फायदे मिळवता येतात.

फळांचा आकार, उत्पादन व गुणवत्ता सुधारते.

क्रॉप कव्हर तंत्रज्ञान

वातावरणातील बदलांचे पिकावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी आणि किडी व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिकावर आच्छादन केले जाते, त्याला ‘क्रॉप कव्हर’ म्हणतात. हे एक पॉलिस्टर किंवा पॉलिप्रोपिलीनपासून बनविलेले नॉन ओव्हन कापड असून, अतिशय पातळ व अतिनील किरण शोषक असते.

याच्या वापरामुळे पिकाच्या आतील बाजूस सूक्ष्म वातावरण (मायक्रो क्‍लायमेट) तयार होते. किडी-रोगांना अटकाव होतो. परिणामी, पिकाची गुणवत्ता व उत्पादन वाढण्यास मदत होते. हिरवी मिरची उत्पादनाकरिता पांढऱ्या रंगाचे १७ जी.एस.एम. जाडीचे क्रॉप कव्हर पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांपर्यंत झाकण्याची शिफारस करण्यात आली आहे.

व्हर्टिकल फार्मिंग

परदेशीमध्ये व्हर्टिकल फार्मिंग म्हणजेच उभ्या पद्धतीच्या शेतीचे प्रमाण वाढत आहे. या विविध पद्धतीच्या मांडणीमध्ये ट्रे किंवा कुंड्यांमध्ये सुपीक माती किंवा कोकोपीट, व्हर्मीक्लाइत, राइसब्रान अशा विविध माध्यमांचा वापर केला जातो.

पिकासाठी आवश्यक सूर्यप्रकाश किंवा कृत्रिम प्रकाश, वायू, पाणी, तापमान, आर्द्रता आणि विद्राव्य खते यांचा नियंत्रित वापर केला जातो. परिणामी, कमी जागेमध्ये अधिक पटीने उत्पादन मिळवणे शक्य होते. भविष्यात वाढत्या लोकसंख्येच्या अन्नसुरक्षेसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हायड्रोपोनिक्स

हायड्रोपोनिक्स म्हणजे अन्नद्रव्ययुक्त पाण्यामध्येच मुळांची व पर्यायाने पिकाची वाढ केली जाते. यातील पाण्याचा पुनर्वापर होत असल्यामुळे अत्यंत कमी पाण्यामध्ये ही शेती शक्य होते. यासाठी उथळ टाक्या किंवा रुंद पाइपमध्ये पाणी फिरते ठेवले जाते.

त्यावर तरंगत्या स्वरूपामध्ये लहान आकाराच्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. उदा. गाजर, सलगम, मुळा, मटार, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, टरबूज, कॅनटालूप, अननस, सेलेरी, तुळस, टोमॅटो, भेंडी इ.

एअरोपोनिक्स

एअरोपोनिक्स तंत्रामुळे पिकांच्या मुळांना हवेमध्येच योग्य तितकी आर्द्रता व अन्नद्रव्ये नियमित फवारणीच्या माध्यमात दिली जातात. या पद्धतीत बटाट्यासारख्या मुळांवर कंद येणाऱ्या पिकाची लागवड करून उत्पादन घेण्याचे प्रयोग सर्वत्र यशस्वी झालेले आहेत.

पिकांना आधार देणे

वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये वेलीला योग्य पद्धतीने आधार व वळण दिल्यास पिकांची वाढ चांगली होते. उत्पादनही दर्जेदार मिळते. त्यासाठी प्रामुख्याने मंडप किंवा ताटी पद्धतीचा वापर केला जातो.

अ) मंडप पद्धत : मंडप पद्धतीने लागवड करताना दोन ओळींत २.५ मीटर, तर दोन वेलींत १ मीटर अंतर ठेवावे. शेताच्या सर्व बाजूंनी ५ मीटर अंतरावर १० फूट उंच लाकडी खांब शेताच्या बाहेरील बाजूस झुकतील, अशा प्रकारे २ फूट जमिनीत गाडावेत.

प्रत्येक खांबास तारेने बाहेरील बाजूस ताण द्यावा. चारही बाजूंचे समोरासमोरील लाकडी खांब ६.५ मीटर उंचीवर तारेच्या साह्याने एकमेकांना जोडून घ्यावेत. त्यानंतर १.५ फूट अंतरावर तार उभी आडवी ओढून घ्यावी.

त्यामुळे १.५ × १.५ फुटाचे चौरस तयार होतील. त्यानंतर वेलीच्या प्रत्येक सरीवर ८ फूट अंतरावर १० फूट उंचीचे खांब लावून घ्यावेत. ज्यामुळे मंडपाला झोल येणार नाही. मंडप तयार झाल्यानंतर सुतळीच्या साह्याने वेल तारेवर चढवावे. मुख्य वेल मंडपावर पोहोचेपर्यंत बगलफुटवे काढावेत. नंतर त्याचा शेंडा खुडावा. बगलफुटी वाढू द्याव्यात.

ब) ताटी पद्धत : या पद्धतीमध्ये लागवड १.५ × १ मीटर अंतरावर करतात. यामध्ये प्रत्येक सरीच्या दोन्ही टोकांना १० फूट उंचीचे लाकडी खांब बाहेरच्या बाजूस झुकतील, अशा पद्धतीने २ फूट खोल रोवून घ्यावेत.

त्यानंतर ७ ते ८ फूट अंतरावर ८ फूट उंचीचे खांब १.५ फूट जमिनीत गाडून उभे करावेत. मध्ये उभे केलेले खांब आणि टोकाचे खांब एका रेषेत येतील, याची काळजी घ्यावी. त्यानंतर जमिनीपासून २,४ आणि ६ फूट अंतरावर आडव्या तारा ओढून घ्याव्यात. सुतळीच्या साह्याने वेल तारेवर चढवावा. वेल २ फुटांच्या तारेपर्यंत वाढेपर्यंत बगलफूटी काढून घ्याव्यात.

डॉ. अरविंद सोनकांबळे, (विभाग प्रमुख), ९६५७७ २५८५७

(भाजीपाला शास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Late Kharif Onion : लेट खरीप कांदा लागवडी १.८२ लाख हेक्टरवर

Onion Crop Damage : शेतकऱ्याने कांद्यावर फिरविला रोटावेटर

Cotton Import : पाकिस्तान ठरला अमेरिकन कापसाचा सर्वांत मोठा आयातदार

Nafed Onion Procurement : ‘नाफेड’च्या कांदा खरेदी गैरव्यवहारांची गांभिर्याने चौकशी

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हुडहुडी

SCROLL FOR NEXT