Automatic 'Layer Poultry Farm' Agrowon
ॲग्रो विशेष

Automatic 'Layer Poultry Farm' : मराठवाड्यात आधुनिक, स्वयंचलित ‘लेयर पोल्ट्री फार्म’

Layer Poultry Farm : मानवत (जि. परभणी) येथील बालाजी व कैलास या गोलाईत बंधूंनी अत्याधुनिक, स्वयंचलित तंत्रज्ञान व यंत्रणांनी युक्त सुसज्ज लेअर पोल्ट्री फार्म विकसित केला आहे.

माणिक रासवे

Poultry Farming : मानवत (जि. परभणी) येथील बालाजी व कैलास या गोलाईत बंधूंनी अत्याधुनिक, स्वयंचलित तंत्रज्ञान व यंत्रणांनी युक्त सुसज्ज लेअर पोल्ट्री फार्म विकसित केला आहे. प्रतिदिन ६० ते ७० हजार अंडी उत्पादन घेत जागेवरच बाजारपेठ तयार केली आहे. आयएसओ ९००१ हे मानांकन त्यांनी या पोल्ट्रीसाठी प्राप्त केले आहे.  

म राठवाड्यातील कापूस व कापडाची प्रमुख बाजारपेठ म्हणून मानवत शहराची ओळख आहे. जिनिंग- प्रेसिंग उद्योगाचाही विस्तार झाला आहे. शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांमधील दिगंबरराव गोलाईत हे प्रमुख नाव आहे. प्रिंटिंग प्रेस, वृत्तपत्र वितरण, हॉटेलिंग आदी व्यवसायांतील अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या कुटुंबाची १४ एकर शेती आहे. दिगंबररावांची पद्माकर ऊर्फ बालाजी व कैलास ही दोन्ही मुले घरचा उद्यमशीलतेचा वारसा पुढे चालवत आहेत.

पोल्ट्री व्यवसायातील पाऊल
गोलाईत यांच्या नातेवाइकांचा उदगीर (जि. लातूर) येथे पोल्ट्री उद्योग आहे. त्यांच्याकडून प्रेरणा व अधिक माहिती घेत बालाजी यांनी पोल्ट्री उद्योगात उतरण्याचे ठरविले. मराठवाड्यात ब्रॉयलर फार्मच्या तुलनेत लेयर (अंडी) पोल्ट्री फार्म कमी आहेत. त्यामुळे अंडी उत्पादनास वाव व मागणी लक्षात घेऊन त्यालाच पसंती दिली.

सन २०१८ च्या मार्चमध्ये मानवत येथील झरी रस्त्यावर सहा एकर जमीन घेतली. वीज- पाणी सुविधा तसेच पाचशे बाय ५० फूट आकाराचे शेड उभारत २०१९ मध्ये कैलास पोल्ट्री फार्म ॲग्रो इंड्रस्ट्रीज नावाने श्रीगणेशा केला. पहिल्या वर्षी २५ हजार पक्षांचे संगोपन सुरू केले. प्रतिदिन २० ते २१ हजार अंडी उत्पादन सुरू झाले. परभणीसह शेजारील जिल्ह्यांमध्ये विक्री सुरू केली.

लॉकडाउनमध्ये फटका व संधीही
पोल्ट्री उद्योगात अजून स्थिरस्थावर होतोय, तोच कोरोना लॉकडाउन सुरु झाला. अक्षरशः एक लाख अंड्यांचे प्रचंड नुकसान झाले. बालाजी खूप खचले. उद्योग बंद करावा असे वाटून गेले. पण कोरोना काळात अंड्यांचे महत्त्व पुढे आले. काहींनी उद्योग बंद केले तरी आपण अजून एक संधी घ्यावी अशी हिंमत व धैर्य बालाजी यांनी दाखविले.

दरम्यान, अडचणी काही संपेनात. विहीर आटली. बोअरवेलचे पाणी कमी पडू लागले. मग सहा किलोमीटरवरील झरी (ता. पाथरी) येथील तलावाजवळ विहीर खोदून पाइपलाइनद्वारे पाणी आणले. सध्या दररोज दीड लाख लिटर पाणी लागते. उन्हाळ्यात फॉगर्स बसवावे लागतात. त्या वेळी प्रतिदिन पाण्याची ३ लाख लिटरपर्यंत जाते.

उद्योगाचा विस्तार...
मानवत भागात लेयर पोल्ट्री उद्योग कमी असल्याने अंड्याची मागणी पाहता विस्ताराची भरपूर संधी होती. त्यादृष्टीने विस्ताराचे पाऊल उचलले. सन २०२२ मध्ये जवळपास आधीच्याच आकाराचे दुसरे शेड उभारले. त्यातून एकूण सुमारे ९० हजार पक्षी संगोपन क्षमता निर्माण झाली आहे. संगोपनाचे पहिले पंधरा आठवडे (ब्रूडिंग) अत्यंत महत्त्वाचे व  दक्षतेचे असतात. आतापर्यंत हे ब्रूडिंग लातूर येथून केले जायचे.

मात्र उत्पादन खर्च त्यामुळे अधिक व्हायचा. तो कमी करण्यासाठी स्वतःच ब्रूडिंगची आवश्‍यक सुविधा उभारली आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यक डॉ. रणजित लाड यांचे मार्गदर्शन मिळते. बालाजी यांचे लहान बंधू कैलासही व्यवस्थापन पाहतात. किशन खोंड हे पर्यवेक्षक आहेत. उद्योगात महिला, पुरुष मिळून २५ जणांना वर्षभर रोजगार दिला आहे. स्वच्छता, आरोग्य, लसीकरण आदींचे काटेकोर पालन होते. त्यामुळे ज्या वेळी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूमुळे अनेक उद्योजकांचे नुकसान झाले त्या वेळी गोलाईत यांचा पोल्ट्री फार्म सुरक्षित राहिला होता.

जागेवरच विक्री व्यवस्था
उद्योगाची प्रतिदिन ९० हजार अंडी उत्पादन क्षमता आहे. मात्र मरतुक व अन्य बाबी लक्षात घेऊन प्रतिदिन ६० ते ७० हजार अंडी मिळतात.
अंड्याचे वजन ५७ ते ५८ ग्रॅम व ६० ग्रॅमच्या आत.
खरेदीसाठी व्यापारी निश्‍चित केला आहे. अंड्यांचे दर दररोज बदलतात. बाजारपेठेत घोषित दरापेक्षा पाच पैसे जास्त दराने त्यास विक्री.
मानवतमध्ये स्वतःचे थेट विक्रीचे आउटलेटही.
स्वतःकडील एक कोटी व बँक ऑफ बडोदाकडून दीड कोटी रुपयांची गुंतवणूक.
सुरुवातीला असलेली वार्षिक एक ते दीड कोटी रुपये उलाढाल आता सात- आठ कोटींवर.

मानांकन, गौरव  
सन २०१९ मध्ये पोल्ट्रीला आयएसओ ९००१- २०१५ मानांकन.
जिल्हास्तरीय उत्कृष्ट पोल्ट्री उद्योजक म्हणून बालाजी यांचा सन्मान.  
पद्माकर यांची मुले प्रसाद व प्रमोद ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत आहेत.

स्वयंचलित, अत्याधुनिक पद्धत
पोल्ट्री उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांकडून एकदिवसीय पक्षी आणले जातात.
पहिले १५ आठवडे मुक्त, त्यानंतर चार आठवडे पिंजऱ्यात (केज) अंडी न देण्याच्या अवस्थेत व त्यानंतर पुढील आठवडे अंडी देणारे पक्षी (केजमध्येच) अशी एकूण ८० ते १०० दिवसांची बॅच.
कॅलिफोर्नियन पद्धतीची त्रिस्तरीय मजले (थ्री टायर) पिंजऱ्यांची व्यवस्था.  
सुमारे ८० टक्के यंत्रणा स्वयंचलित व आधुनिक पद्धतीची.
खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने दहा टन खाद्यनिर्मिती क्षमतेची आधुनिक फीडमिल. खाद्य साठविण्यासाठी सायलेज.
स्वयंचलित पॅन फीडिंग पद्धतीने दररोज प्रति पक्षी दोन्ही वेळचे मिळून ११० ग्रॅम खाद्य.
निपल पद्धतीने पिण्याचे पाणी.
अंडी ट्रेममधून वाहनापर्यंत नेण्यातही स्वयंचलित पद्धत.

 पद्माकर ऊर्फ बालाजी गोलाईत,
 ९९७५०५६७७७
 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT