Medicinal Plants Agrowon
ॲग्रो विशेष

Medicinal Plants : गणेशपत्रींचे औषधी महत्त्व

Ganesh Patri : अनादि काळापासून मानव निसर्गाची विविध रूपांत पूजा व उपासना करीत आला आहे. श्रीगणेशपूजन हेही निसर्ग पूजेचेच प्रतीक आहे. परंपरेने पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या फुले, पाने (पत्री) यामागे आयुर्वेदिक विचार आणि वैज्ञानिक आधार आहे.

Team Agrowon

डॉ. मधुकर बाचूळकर
भाग १
Ganesh Festival : अनादि काळापासून मानव निसर्गाची विविध रूपांत पूजा व उपासना करीत आला आहे. श्रीगणेशपूजन हेही निसर्ग पूजेचेच प्रतीक आहे. परंपरेने पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या फुले, पाने (पत्री) यामागे आयुर्वेदिक विचार आणि वैज्ञानिक आधार आहे. पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या या पत्रीद्वारे लहान मोठे आजार बरे करू शकतो.

अशा पूजांच्या निमित्ताने पारंपरिक वनौषधींची माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते. गणेश चतुर्थीप्रमाणे हरितालिका, ऋषिपंचमी, जेष्ठागौरी पूजन यामध्येही अशा पत्रींचा वापर केला जातो. त्यांचे महत्त्व आणि औषधी उपयोग जाणून घेऊ.

गणेशपत्रीमध्ये ज्या २१ पत्री वापरल्या जातात, त्यांची नावे पुढील प्रमाणे -
वृक्षवर्गीय ः पिंपळ, अर्जून, शमी, बेल, हादगा, डाळिंब, बोर, देवदार व केवडा
झुडूपवर्गीय वनस्पती ः जाई, मधुमालती, रुई व कण्हेर
रोपवर्गीय वनौषधी ः डोर्ली, आघाडा, विष्णुक्रांता, दूर्वा, तुळस, धोतरा, माका व मरवा.

पिंपळ :
शास्त्रीय नाव ः फायकस रिलीजीओसा, कुळ ः मोरेएसी
यास बोधिवृक्ष, अश्‍वत्थ अशीही नावे आहेत.
औषधी गुणधर्म ः पिंपळाची साल, पाने व फळे औषधी आहेत. साल स्तंभन, रक्तसंग्राही व पौष्टिक असून, पाने आनुलोमिक, रेचक व स्तंभन गुणधर्माची आहेत. फळे पाचक, संकोचविकास प्रतिबंधक व रक्तशुद्धी करणारी आहेत.
उपयोग ः कोवळी पाने दुधात उकडून परम्यात देतात. पाने व बोळ मधातून रक्तसांकळ फांकण्यास देतात. पिकलेले पान विड्याच्या पानातून काविळीत देतात. सालीची राख पाण्यात कालवून, पाणी निवळल्यानंतर दिल्यास उचकी व उलटी बंद होते. सालीच्या राखेने चट्टे लवकर भरून येतात. सालीचा फांट त्वचा रोगात देतात. शोथ बसण्यास सालीचा लेप करतात. भगंदरात सालीचे चूर्ण भरतात. कोवळी अंतर्साल अस्थिभंगावर उपयोगी आहे. पिंपळाचे फळ वांतरोधक आहे. दात, हिरड्या टणक बनविण्यासाठी कोवळी पाने चावून खातात. कोवळी पाने भाजी करण्यासाठी वापरतात. या भाजीने त्वचा रोग कमी होतात, कावीळ कमी होते.

अर्जून :
शास्त्रीय नाव ः टर्मिनालिया अर्जूना, कुळ ः कॉम्ब्रेटेएसी
नैसर्गिकपणे अर्जूनाचे वृक्ष नदी, नाले व ओढ्याच्या काठावर वाढतात. याला नदीसर्ज, अर्जून सादडा, सदुरा अशीही नावे आहेत.
औषधी उपयोग ः अर्जूनाची साल व पाने औषधात वापरतात. हृदयाच्या शिथिलतेवर खोडाची साल अत्यंत गुणकारी आहे. आंतरसालीचे चूर्ण गूळ व दुधात उकळून घेतल्यास रक्तवाहिन्यांचे संकोचन होऊन रक्ताभिसरणाचा दाब वाढतो आणि हृदयाची क्रिया सुरळीत सुरू होते. हृदयास उत्तेजन येते. हृदयास बळकटी आणणारे ‘अर्जूनारिष्ट’ हे औषध अर्जूनाच्या सालीपासून तयार करतात. हाडे सांधणारी मौल्यवान वनस्पती म्हणूनही अर्जून वृक्ष सुप्रसिद्ध आहे. सालीची दुधात केलेली खीर तूप व खडीसाखर घालून घेतल्यास व साल ठेचून मोडलेल्या हाडावर बांधल्यास, मोडलेले हाड लवकर सांधते. अंगातील चरबी कमी करून, वजन कमी करण्यासाठी सालीचे चूर्ण उपयुक्त आहे. जखमा लवकर भरण्यासाठी सालीच्या काढ्याने जखम धुतात. पानांचा रस कानदुखीत कानात घालतात.

शमी :
शास्त्रीय नाव ः प्रोसोपिस सिनेरारिया, कुळ ः मायमोसिएसी म्हणजेच बाभळीच्या कुळातील आहे.
या वृक्षास सौंदड व खेजडी अशीही नावे आहेत. शमीचे वृक्ष उष्ण, कोरड्या हवामानात कमी पाऊस पडणाऱ्या ठिकाणी, दुष्काळी भागात तसेच वाळवंटी प्रदेशात आढळतात. शमी वृक्षास धार्मिक महत्त्व असून, तो पवित्र मानला जातो. महाभारतात शमीचा उल्लेख आहे. वृक्षतोडी विरोधात राजस्थानमधील बिष्णोई गावकऱ्यांनी केलेले चिपको आंदोलन हे याच वृक्षांना वाचविण्यासाठी केले होते.
औषधी उपयोग ः दमा, कुष्ठरोग आणि पांढऱ्या कोडावर शमीची साल वापरतात. शमीच्या पानांची व शेंगांची भाजी करतात. शमी वृक्षाचा पाला, कोवळ्या फांद्या व शेंगांचा, उंट, शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा म्हणून वापर करतात.

बेल :
शास्त्रीय नाव ः एगल मार्मेलोस, कुळ ः रूटेएसी म्हणजे लिंबूच्या कुळातील.
या वृक्षाला बिल्व व शैल अशीही नावे आहेत. बेलाचे वृक्ष कमी पाऊस पडणाऱ्या, पर्णझडी जंगलांत आढळतात. अनेक ठिकाणी बेलाची लागवड केलेली आढळून येते. हा वृक्ष व पाने शंकराला प्रिय आहेत.
औषधी गुणधर्म ः बेल हा दशमूळवर्गीय औषधी वनस्पतींपैकी महत्त्वाचा वृक्ष आहे. बेलाची पाने पाचक व ज्वरनाशक असून, शोथ, बहिरेपणा, नेत्रभिष्यंद यात उपयुक्त आहेत. बेलाचे मूळ विषमज्वर, मूत्रविकार, निद्रानाश, वात, पित्त, व कफ यांवर उपयोगी आहे. फुले तृषारोगात व वांतीमध्ये उपयुक्त असून, कच्चे फळ आमांशात वापरतात. पिकलेले फळ पौष्टिक, भूक वाढविणारे, ज्वरनाशक, पित्तवर्धक व त्रिदोषकारी आहे.
औषधी उपयोग ः बेल हृदय व मेंदूसाठी उपयुक्त आहे. पाने वाटून लेप व्रणावर लावतात. पानांचा काढा सर्दीवर देतात. पानांचा रस काळ्या मिऱ्यांबरोबर काविळीत देतात. कच्च्या फळांचा काढा व पिकलेल्या फळांतील गर मूळव्याधीवर वापरतात. गर सौम्य, रेचक आहे.

हादगा :
शास्त्रीय नाव ः सेस्बानिया ग्रॅन्डिफ्लोरा, कुळ ःफॅबेएसी म्हणजेच पळसाच्या कुळातील.
या वृक्षास अगस्ता, अगस्ती व अक्षस्त्य अशी विविध नावे आहेत. हादग्याची लहान झाडे मंदिराच्या आवारात, शेतातील बांधावर लागली जातात.
औषधी गुणधर्म ः पाने आनुलोमिक व शिरोविरेचन गुणधर्माची आहेत. पाने ठेचून व्रणावर बांधल्यास त्याची शुद्धी व रोपन होते. ज्वर, डोळेदुखी या विकारांत पानांच्या रसाचे नस्य करतात. छातीत भरलेला कफ पाडण्यास मुळाची साल विड्याच्या पानातून देतात. संधिशोथात मुळाचा लेप करतात. ठेचाळलेल्या भागावर पानांचा लेप करतात. फुलांची व शेंगांची भाजी करतात. अनार्तवांतात फुलांची भाजी उपयुक्त आहे. वात व पित्तदोष कमी करण्यासाठी फुलांच्या भाजीचा उपयोग होतो.

डाळिंब ः
शास्त्रीय नाव ः प्युनिका ग्रॅन्याटम, कुळ ः प्युनिकेएसी.
डाळिंबाला दाडिम, अनार अशीही अन्य नावे आहेत. डाळिंबाचे मध्यम ते लहान आकाराचे झाड असून, त्याची बागेत व शेतात लागवड करतात.
औषधी गुणधर्म ः डाळिंबाची पाने, साल, मूळ, फुले, फळे औषधी गुणधर्माची आहेत. पानांचा रस रक्तस्तंभक म्हणून वापरतात. मूळ कृमिनाशक आहे. साल हिरड्या मजबूत करण्यास व मूळव्याधीत उपयुक्त आहे. फुलांचा रस नाकातून होणाऱ्या रक्तस्रावात उपयोगी आहे. फळे भूकवर्धक व पौष्टिक असून, वांती, पित्तप्रकोप, हृदयरोग व घशातील दुखणे यात उपयोगी आहेत. फळाची साल कृमीनाशक असून, अतिसार आणि आमांशात उपयोगी आहे. फळाच्या सालीचा काढा घसा दुखण्यावर गुळण्या करण्यासाठी वापरतात. ताप आणि आजारात ताज्या फळांचा रस देतात. फळात ‘क’ जीवनसत्त्व आहे. डाळिंबाच्या पानांना ‘दाडिमपत्रे’ म्हणतात.

बोर :
शास्त्रीय नाव ः झिझिपस मायुरीटियाना, कुळ ः ऱ्हॉमनेएसी.
बोरीचे वृक्ष उघड्या कोरड्या जंगलात, पडीक जमिनीवर, खडकाळ भागात तसेच कोकण परिसरातही आढळतात.
औषधी गुणधर्म ः बोराचे मूळ, साल, पाने, फळे व बिया औषधांत वापरतात. पाने ज्वरनाशक असून, लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयोगी आहेत. पाने कृमिनाशक असून, मुखशोथ आणि हिरड्यांच्या रक्तस्रावात चांगली आहेत. जखमा व व्रण भरण्यासाठी उपयुक्त असून, दम्यात गुणकारी व यकृत तक्रारीत गुणकारी आहेत. पाने केसतूट, गळू, व काळपुळीसाठी तसेच उन्हाळे लागल्यास लेप म्हणून वापरतात. बोरीचे मूळ कडू व शीत असून, पित्तवृद्धी आणि खोकल्यात उपयुक्त आहे. मूळ आणि साल पौष्टिक आहेत. फळे शीत, शुक्रकर, विरेचक असून, पित्तप्रकोप, जळजळ कमी करतात. क्षय आणि रक्तरोगात उपयुक्त आहेत. फळे रक्तशुद्धी करणारी असून, पचनास मदत करतात. फळात ‘अ’ जीवनसत्त्व आहे. बिया डोळ्यांच्या रोगात व श्‍वेतप्रदरात गुणकारी असून, हृदय आणि मेंदूस शकतिवर्धक आहेत. बोरीच्या पानांना ‘बदरीपत्र’ म्हणतात.

देवदार :
शास्त्रीय नाव सीड्रस डेओडारा, कुळ ः पायनेसी.
देवदारचे सदाहरीत वृक्ष हिमालय पर्वतावरील वनक्षेत्रात आढळतात. देवदार वृक्ष जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमालय प्रदेश, नेपाळ, सिक्कीम, भूतान, अरूणाचल प्रदेश या ठिकाणी आहेत. या वृक्षाची पाने सुईप्रमाणे लांबट, गोलाकार असतात. या वृक्षास ‘देवदारू’, ‘केलोन’, अशीही नावे आहेत. देवदारच्या लाकडापासून तेल काढतात, त्यास ‘केलोन तेल’ म्हणतात.
औषधी गुणधर्म ः याचे लाकूड, कोवळ्या फांद्या, पाने औषधी गुणधर्माची आहेत. पण प्रामुख्याने केलोन तेल औषधात वापरतात. देवदारमध्ये स्वेदजनन, मूत्रजनन व वायुनाशी हे औषधी गुणधर्म आहेत. केलोन तेल व्रणशोधक व व्रणरोपक आहे. जुनावलेले व्रण तेलामुळे भरून येतात. लाकूड पाण्यात उगाळून डोके दुखीत कपाळावर लेप करतात. ज्वर आणि जीर्ण संधिवातात तेलाचा चांगला उपयोग होतो.

केवडा :
शास्त्रीय नाव ः पॅनड्यानस ओडोरॅटयॉसिमस, कुळ ः पॅनड्यानेएसी.
नैसर्गिकपणे केवड्याचे लहान वृक्ष समुद्र किनाऱ्याजवळ वाळूत वाढतात. केवड्याची बागेतही लागवड करतात.
औषधी गुणधर्म ः केवड्याची पाने, फळे तसेच परागकोश आणि पुष्पच्छदाचे तेल औषधात वापरतात. कुष्ठरोग, देवी, उपदंश, खरूज, शरीराची उष्णता, कोड, हृदयरोग आणि मेंदूरोग यात केवड्याची पाने उपयुक्त आहेत. परागकोश खूप खाज सुटण्यावर वापरतात. कानदुखी, डोकेदुखी, कोड, पुरळ, रक्तरोग यात परागकोश उपयोगी आहेत. केवड्याची फळे वात, कफ आणि मूत्रस्रावात उपयुक्त आहेत. पुष्पच्छाचे तेल डोकेदुखी, संधीवात, ज्वर, कानदुखी व त्वचा रोगात वापरतात.

जाई :
शास्त्रीय नाव ः जॅस्मीनम ऑरिक्युलेटम, कुळ ः ओलिएसी.
जाई ही झुडूपवर्गीय वनस्पती असून, ती नैसर्गिकपणे वनक्षेत्राप्रमाणे बागेतही लावतात. जाईच्या पानांना ‘जातिपत्र’ म्हणतात.
औषधी गुणधर्म ः जाईची पाने व फुले औषधात वापरतात. जाई शीतल, व्रणशोधन आणि व्रणरोपन गुणधर्माची आहे. तोंडातील जखमा व व्रण यावर जाईची पाने चावावयास व चघळण्यासाठी देतात. यामुळे जखमा भरून येवून, बऱ्या होतात. तोंडातील जखमा बऱ्या होण्यासाठी जाईची पाने, दारूहळद आणि त्रिफळा यांच्या काढ्याने गुळण्या करतात. कानदुखीत पानांचा अंगरस तिळाच्या तेलात उकडून ते तेल कानात घालतात. पायांच्या बोटांमध्ये पडलेल्या कात्र्यांवर याची पाने ठेचून बांधतात. जखमांवर पाने वाटून त्याचा लेप लावतात.

मधुमालती/चमेली :
शास्त्रीय नाव ः जॅस्मिनम ग्रॅन्डिफ्लोरम, कुळ ः ओलिएसी.
मधुमालती हे नाव अन्य काही वनस्पतींसाठीही वापरले जाते. त्यामुळे या वनस्पतीस ‘चमेली’ हे नाव जास्त योग्य आहे. चमेलीचे मोठे आरोही झुडूप असते.
औषधी गुणधर्म ः चमेलीची पाने व फुले औषधी गुणधर्माची आहेत. पाने कडू व तुरट चवीची असतात. पाने शीतल, व्रणशोधन, व्रणरोपण, कुष्ठघ्न, तर फुले मूत्रजनन, आर्तवजनन आणि वाजीकर गुणधर्माची आहेत. त्वचेच्या रोगात पानांचा उपयोग करतात. तोंडातील जखमा व दातदुखीत पाने चघळण्यास देतात. कानातून पू येत असल्यास, पानांचा रस तिळाच्या तेलात उकडून ते तेल कानात घालतात. बोटांमध्ये ओलसर चिकट पाणी वाहत असल्यास, तसेच पांढरट व्रणावर पानांचा लेप करतात. फुले ठेचून ओटीवर बांधल्यास, लघवी सुटते, विटाळ साफ पडतो. नेत्ररोगात फुलांचा लेप लावतात. डोकेदुखीत फुलांचे तेल लावतात.

रुई :
जांभळट रंगाची फुले देणाऱ्या रूईचे शास्त्रीय नाव कॅलोट्रॉपिस प्रोसेरा, तर पांढऱ्या रंगाची फुले देणाऱ्या रुईचे शास्त्रीय नाव कॅलोट्रॉपिस जायजांशीया असे आहे. (कुळ ः अ‍ॅस्कलपिडिएसी.) रुईची झुडपे कोरड्या, पडीक जागेत सर्वत्र आढळतात.
औषधी गुणधर्म ः दोन्ही प्रजाती औषधी असून, गुणधर्म समान आहेत. रुईची पाने, साल, फुले व चीक औषधात वापरतात. रुई वनस्पतीस मंदार, अकंद, अर्क, क्षीरपर्णी अशीही इतर नावे आहेत. रुईची पाने हनुमानास वाहतात. पाने गरम करून पोटीस म्हणून वापरतात. पक्षाघात झालेल्या भागास, सूज आलेल्या व दुखणाऱ्या सांध्यावर तसेच जखमेवर पाने ठेचून बांधतात. जलोदर व पोट फुगणे यावर पाने उपयुक्त आहेत. खंडित तापात पानांचा अर्क देतात. वाळलेल्या पानांचे चूर्ण खोकला, दमा, व्रण यांवर वापरतात. मुळाची साल स्वेदकारी असून, दमा व उपदंशात उपयोगी आहे. साल वांतीकारक, स्वेदकारी व रेचक गुणधर्माची आहे. आमांश व पोट फुगल्यावर गुणकारी आहे. फुले वेदनाशामक व तुरट तसेच पाचक असून, सर्दी, खोकला व कफ यावर उपयुक्त आहे. फुले जंतुनाशक व कृमीनाशक असून, पटकी व मलेरियात वापरतात. चीक कुष्टरोग, खरूज, गजकर्ण, पुरळ, फोड, दमा, प्लिाहावृद्धी यामध्ये गुणकारी आहे. रुईच्या पानांना ‘अर्कपत्र’ म्हणतात.

डॉ. मधुकर बाचूळकर, ०९७३०३९९६६८
(निवृत्त प्राचार्य व वनस्पती व पर्यावरण तज्ज्ञ, कोल्हापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT