Micro Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Water : सिंचनाच्या पाण्यातील क्षार कमी करण्याचे उपाय

Team Agrowon

Measures to Reduce Salinity in Irrigation Water : सिंचनाचे पाणी कठीण असल्यास ते मृदू करण्यासाठी त्यातील क्षारांचे प्रमाण कमी करावे लागते. विशेषतः पाण्यातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमची संयुगे काढून टाकून त्यांचा प्रभाव कमी करावा लागतो. सिंचनाचे पाणी मृदू करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही उपाययोजना आणि उपचारांची माहिती घेऊ.

१) भूजल पुनर्भरण :
आपल्या जितक्या अधिक खोलीच्या कूपनलिका तितकेच त्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण हे लक्षात घेतले पाहिजे. अशा खोलवर असलेल्या पाण्यात खडकातले क्षार विरघळून ते पाणी अधिक कठीण बनत जाते.

पावसाच्या पाणी सामान्यतः क्षाररहित असते. ते मातीवर पडल्याने त्यात खूपच कमी क्षार असू शकतात. असे कमी क्षार असलेले पावसाचे पाणी विहिरी किंवा कूपनलिकांमध्ये पुनर्भरणासाठी वापरले पाहिजे.

म्हणजे पाण्यातील एकूण क्षारांचे प्रमाण कमी होते. विहिरी आणि बोअरवेलमधील भूजल पुनर्भरणासाठी ओढे नाले, नदीवर बंधारे बांधणे, जलस्रोतातील गाळ काढणे, रिचार्ज शाफ्ट, शोषखड्डे, शेतातच पाणी जिरवण्यासाठीचे विविध उपाय करता येतात. यामध्ये बोअरवेल पुनर्भरण हा सर्वांत प्रभावी ठरणारी उपाययोजना आहे.

२) कमी क्षार असलेले व क्षारयुक्त पाणी एकत्र मिसळूनही क्षारांची पातळी कमी करता येते. असे पाणी पिकांना देता येते.

३) क्षारांचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीमध्ये वारंवार हिरवळीची पिके घेऊन ती गाडावीत. कारण ताग, धैंचा, शेवरी यांसारखी पिके फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडल्यामुळे अनेक फायदे होतात. जमिनीत सेंद्रिय घटक मिसळले जातात. मातीची संरचना सच्छिद्र होते. परिणामी मातीमध्ये हवा खेळती राहते. क्षारांचा निचरा होण्यास मदत होते.

४) मल्चिंग : क्षारांचे प्रमाण अधिक असलेल्या शेतामध्ये सेंद्रिय मल्चिंगवर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतातील किंवा अन्य आजूबाजूंच्या पिकांचे अवशेष, पालापाचोळा यांचे आच्छादन करावे. त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन ओल टिकून राहते. जमिनीला भेगा पडून बाष्पीभवन होताना वर येणाऱ्या पाण्यासोबत क्षार वर येणेही कमी होते. सेंद्रिय आच्छादनासाठी वापरलेले घटक काही काळात कुजून त्यातून जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढत जाते. त्याचा फायदा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी होतो.

५) पीक पद्धतीचे नियोजन : पिकांचे नियोजन करताना क्षार सहनशील पिकांची निवड करावी. ऊस, कापूस, गहू, पालक, शुगर बीट, कोबी, फ्लावर, मका अशी काही पिके ही मध्यम क्षारयुक्त जमिनीत येतात.

६) काही रसायनांच्या वापरातून पाण्यात विरघळलेल्या कॅल्शिअम व मँगेनीजची विविध संयुगे काढून टाकता येतात. या प्रक्रियेसाठी अमोनिया, बोरॅक्स, सोडिअम कार्बोनेट, कॅल्शिअम हायड्रॉक्साइड अशा रसायनांची वापर होतो. मात्र त्यासाठी आवश्यक यंत्रणा, रसायने यांचा खर्च अधिक असतो. प्रक्रिया झाल्यावर उरलेल्या घटकांची विल्हेवाट लावणे हे कामही जिकिरीचे ठरते.

पाणी मृदू करण्यासाठी चुंबकीय क्षेत्र प्रक्रिया :

पाण्यामध्ये सामान्यतः सोडिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम असे चार प्रकारचे क्षार असतात. त्यातही सोडिअम व पोटॅशिअम या क्षारांचा नैसर्गिक गुणधर्म न चिकटण्याचा व निष्क्रिय असे आहेत.

मात्र कॅल्शिअम, मॅग्नेशिअम यांना चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला आहे.त्यामुळे ते पाण्यामध्ये सक्रिय राहतात. पाण्यातील कॅल्शिअम व मॅग्नेशिअममुळे अन्य पदार्थाची विरघळण्याची क्षमता कमी होते.

पाण्यामध्ये जमिनीतील क्षार विरघळून निचरा होण्यामध्ये अडचणी येतात. क्षारयुक्त पाणी सिंचनासाठी वापरल्यामुळे मातीच्या दोन कणांमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम यांचे बंध तयार होतात. परिणामी, माती चिकट आणि घट्ट होते. पिकांच्या मुळांभोवती हवा खेळती न राहिल्याने त्यांची कार्यक्षमता कमी होते.

इस्राईल देशातील शास्त्रज्ञांनी क्षारयुक्त पाण्यापासून चुंबकीय पद्धतीने मृदू पाणी मिळवण्याची पद्धत तयार केलेली आहे. त्याला मॅग्नेटिक सॉफ्टनर कंडिशनर म्हणतात. इजिप्त, स्पेन व अन्य युरोपीय देशामध्ये सिंचनाच्या पाण्यासाठी या प्रणालीचा वापर सर्रास झाला आहे.

आपल्याकडे अलीकडे याचा वापर सुरू झाला आहे. या मॅग्नेटिक सॉफ्टनर कंडिशनर उपकरणांमध्ये शेतापर्यंत पाणी नेणाऱ्या पाइपलाच तांब्यासारख्या अन्य धातूचा पाइप (लोखंड व प्लॅस्टिक सोडून) जोडलेला असतो. त्याच्या बाहेर दोन्ही बाजूंनी दोन शक्तिशाली चुंबक (शा. नाव ः neobiuudim iron boron) बसविलेले असतात.

ते पाण्याभोवती मोठ्या प्रमाणात चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात. या पाइपमधून वाहणाऱ्या पाण्याची दिशा चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे वाहणारी राहील, याची काळजी घेतली जाते. या सर्व प्रक्रियेसाठी विद्युत ऊर्जा फारच कमी लागते. घरगुती विजेवर काम चालते.

त्यासाठी स्वतंत्र (तीन फेज वगैरे) विद्युत प्रवाहाची गरज पडत नाही. या प्रक्रियेमध्ये पाण्याचे रासायनिक गुणधर्म बदलत नाहीत. मात्र यामध्ये चुंबकीय ऊर्जेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या कंपनांद्वारे क्षारयुक्त पाण्याच्या रेणूचे समान सहा भागांमध्ये परिवर्तन केले जाते. पाण्यातील कणांची रचना आणि गुणधर्म बदलतात.

म्हणजेच पाण्याचे रेणू व विविध खनिजांच्या क्षारांचे रेणू यांच्यापासून तयार झालेले मोठ्या पुंजक्यांचे छोट्या पुंजक्यांमध्ये रूपांतर होते. पाण्यामधील क्षार पाण्यातून वेगळे न काढता केवळ त्यांचे रूपांतर सूक्ष्म अशा खनिज रेणूंमध्ये होते. परिणामी, हे पाणी काही काळासाठी (साधारण ६५ ते ७० तासांसाठी) मृदू होते.

(ॲग्रो विशेष)

यामुळे पाण्यातील कॅल्शिअम, मॅग्नेशिअम क्षारांतील चिकटण्याची क्षमता नाहीशी होते. ते झाडांच्या मुळांवर जमा होण्याचे प्रमाण कमी होते. नवीन पांढरी मुळी जोमात वाढते. नव्या पांढऱ्या मुळांमुळे पिकांचे पोषण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. या तंत्रामध्ये क्षार काढून टाकण्याऐवजी केवळ त्याचे नकारात्मक गुणधर्म बदलले जातात. टीडीएस बदलत नसला तरी उपयुक्तता वाढते.

सध्या भारतीय बाजारपेठेमध्येही या तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळे मॅग्नेटिक सॉफ्टनर कंडिशनर उपलब्ध आहेत. मात्र त्यांची निवड ही पंपाच्या क्षमतेनुसार आणि अन्य वापरणाऱ्या शेतकऱ्यांची अनुभव जाणून मगच करावी.

यासाठी एकदाच गुंतवणूक करावी लागते. पुढेही तांत्रिक देखभालीची फारशी आवश्यकता नसते. कारण उपकरणाचा आणि पाण्याचा थेट संपर्क कधीच होत नाही. ते चालविण्यासाठी विद्युत ऊर्जेचीही आवश्यकता नसते. उत्तम दर्जाच्या उपकरणाचे आयुष्य किमान २० वर्षे व त्यापेक्षा अधिक असू शकते.

संपर्क ः सतीश खाडे, ९८२३०३०२१८
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT