Banana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Orchard Protection : थंडीपासून केळी बाग संरक्षणासाठी उपाय

Banana Farming : सद्यःस्थितीत थंडीची तीव्रता वाढली असून दिवस व रात्रीच्या तापमानात मोठी घट होत आहे. कमी झालेल्या तापमानाचा विविध फळझाडांवर विपरीत परिणाम होतो.

Team Agrowon

अंजली मेंढे, डॉ. विजयराज गुजर

Banana Farming Management : सद्यःस्थितीत थंडीची तीव्रता वाढली असून दिवस व रात्रीच्या तापमानात मोठी घट होत आहे. कमी झालेल्या तापमानाचा विविध फळझाडांवर विपरीत परिणाम होतो. तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास केळी पिकाच्या वाढीवर परिणाम दिसून येतो. सध्या जून लागवडीच्या मृगबागा शाकीय वाढीच्या, तर ऑक्टोबर लागवडीच्या कांदेबागेतील झाडे स्थिरावून जलद शाकीय वाढीच्या अवस्थेत आहेत.

काही ठिकाणी फेब्रुवारी- मार्च महिन्यांत लागवड केलेल्या बागा घड तयार होण्याच्या अवस्थेत आहेत. तापमान कमी होईल तसे केळी झाडावर नवीन पाने येण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे झाडाच्या वाढीवर परिणाम होतो. थंडीच्या काळात केळी पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बागेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

कमी तापमानाचे होणारे परिणाम

मुळांच्या अन्न व पाणी शोषण्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्याचा पीक वाढीवर परिणाम होतो.

पाने निघण्याचा वेग मंदावतो.

नवीन येणाऱ्या पानाची पुंगळी उलगडण्यास वेळ लागतो. पुंगळीच्या बाहेरील बाजूवर चट्टे पडतात.

झाडांची वाढ मंदावते. वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास विलंब होतो.

अन्नद्रव्यांचे शोषण व वहन योग्यरीत्या न झाल्याने पाने पिवळसर दिसू लागतात.

कमी तापमानामुळे केळी घड अडकतात.

करावयाचे उपाय

केळी लागवडीवेळी बागेभोवती सजीव कुंपण उभे करणे अत्यंत आवश्यक असते. संजीव कुंपण नसल्यास बागेभोवती ज्वारी, बाजरी किंवा मका कडबा यांचा झापा करून लावावेत किंवा हिरवी शेडनेट बागेभोवती लावावी.

झाडाच्या खोडाभोवती सेंद्रिय पदार्थांचे (उसाचे पाचट, सोयाबीनचा भुस्सा) आच्छादन करावे.

पीक वाढीच्या अवस्थेनुसार पाणी पुरवठा करावा. शक्यतो रात्री व पहाटे सिंचन करावे.

केळी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार शिफारशीत रासायनिक खताची मात्रा द्यावी. पालाश या अन्नद्रव्याची कमतरता पडणार नाही याची काळजी घ्यावी.

नत्राचा अतिरिक्त वापर टाळावा. नत्राच्या अतिरिक्त वापरामुळे करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

निसवण सुरू असलेल्या बागेतील घडातील फण्या पूर्ण उमलल्यानंतर केळफूल कापावे. ८ ते ९ फण्या ठेवून शेवटच्या फण्या कापाव्यात.

घडाच्या योग्य वाढीसाठी व गुणवत्तेसाठी घडावर सल्फेट ऑफ पोटॅश (२ टक्के) २० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दोन वेळा फवारणी करावी. पहिली फवारणी केळफूल व शेवटच्या फण्या काढल्यानंतर लगेच करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी करावी.

दुसरी फवारणी केल्यानंतर घड २ टक्के सच्छिद्रता असलेल्या १०० गेज जाडीच्या पॉलिथीन पिशव्यांनी झाकून घ्यावेत.

तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास बागेत पहाटेच्या वेळी ओला काडीकचरा जाळून धूर करावा.

नवीन कांदेबागेस प्रति झाड २०० ग्रॅम, तर मृग बागेस ५०० ग्रॅम निंबोळी पेंड पावडर या प्रमाणे जमिनीतून द्यावी.

करपा रोग नियंत्रण

अनुकूल हवामानामुळे यावर्षी केळी बागांमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत आहे. व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे उपाय करावेत.

बागेतील करपा रोगग्रस्त पाने किंवा रोगग्रस्त भाग बागेबाहेर नेऊन नष्ट करावा.

रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ मिलि अधिक मिनरल ऑइल १ मिलि याप्रमाणे प्रति १ लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.

फवारणी करताना पानाच्या वरील भागासोबतच खालील भागाही व्यवस्थित व्यापला जाईल या प्रमाणे फवारणी करावी.

(ॲग्रेस्को शिफारस)

- अंजली मेंढे ९४२११ ४९६९५

(अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar: विनंती करतो, जनतेला हेलपाटे मारण्यास लावू नका: अजित पवार

Indian Politics: देशात पैसा, तंत्रज्ञान भरपूर; पण कमतरता इमानदारांची: नितीन गडकरी

Gorakshak Terror: गोरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?

Kharif Crop Insurance: खरीप पीकविमा अर्जासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

US Import Duty: भारतापेक्षा बांगलादेश, पाकिस्तानवर शुल्क कमी

SCROLL FOR NEXT