
अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : जळगाव : खानदेशात कांदेबाग लागवड मागील महिन्यातच पूर्ण झाली आहे. कांदेबाग केळीचे दर यंदा टिकून होते. तसेच केळी लागवडीसाठी रोजगार हमी योजनेतून अनुदानही मिळत असल्याने लागवड यंदा काहीशी वाढली आहे. उशिराची लागवड अद्याप सुरूच आहे.
कांदेबाग केळीची लागवड रावेर, यावल, मुक्ताईनगर भागातही काही शेतकऱ्यांनी केली आहे. कांदेबाग केळीची लागवड ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरमध्येही केली जाते. डिसेंबर व जानेवारीच्या पहिल्या दोन -तीन दिवसांतही ही लागवड केली जाते. डिसेंबरमधील लागवड उशिराची मानली जाते. यंदा ऑक्टोबरमध्ये लागवड बऱ्यापैकी झाली. परंतु नोव्हेंबरमध्ये रोपांची समस्या व अन्य कारणांनी लागवड पूर्ण होऊ शकली नाही.
१० ते १२ दिवस अनेक शेतकरी लागवड करू शकले नाहीत. रोपांचा पुरवठा, कंद काढणे व वाहतूक आदी कार्यवाही रखडत सुरू होती. लागवडीवर त्या महिन्यात परिणाम झाला. डिसेंबरमध्ये लागवडीस वेग आला. या महिन्यातील लागवड ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, जळगाव आदी भागांत अधिक झाली. या महिन्यातही सुरुवातीचे तीन -चार दिवस उशिराच्या बागांची लागवड झाली आहे. कमी कालावधीत किंवा पुढे ऑक्टोबरमध्ये बागा काढणीवर याव्यात यासाठी या महिन्यातील लागवडीसाठी अनेकांनी उतिसंवर्धित रोपांचा उपयोग केला आहे.
लागवड उशिरा झालेली असली तरी काढणी मात्र ऑक्टोबरच्या अखेरीस सुरू होईल, अशी स्थिती आहे. यंदा कांदेबाग केळीची लागवड जळगाव, धुळ्यात मिळून १८ हजार हेक्टरवर झाल्याचा अंदाज आहे. ही लागवड यंदा सुमारे पाच हजार हेक्टरने वाढल्याचे चित्र आहे. जळगाव, चोपडा, जामनेरात सर्वाधिक सुमारे २० हजार हेक्टरवर कांदेबाग केळी आहे.
तसेच मुक्ताईनगर, रावेर, यावल, धुळ्यातील शिरपूर, भडगाव-पाचोरा या भागातही कांदेबाग केळी आहे. मुक्ताईनगर, रावेर, यावल भागात मृग बहर केळीसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील लागवड जून ते ऑगस्ट या कालावधीत केली जाते. परंतु या भागातही कांदेबाग केळी लागवडीस काही शेतकरी पसंती देऊ लागले आहेत. यामुळे यंदा क्षेत्रात वाढ झाली आहे.
दर होते टिकून
यंदा लागवडीत वाढ होईल, असे संकेत सुरुवातीपासूनच होते. कारण केळीचे दर स्थिर होत. कांदेबाग केळीला ऑक्टोबरमध्ये काही शेतकऱ्यांना ३३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाले. अनेकांना सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तसेच शासनाकडून केळी लागवडीसह काढणीपर्यंतच्या कार्यवाहीसाठी रोजगार हमी योजनेतून अनुदान दिले जाते. यामुळे लागवड यंदा वाढली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.