Dharashiv News : जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांतील एकूण पाणीसाठा ४६.१२ टक्क्यांवर पोहोचला असून उपयुक्त पाणीसाठाही तब्बल ३६.७९ टक्क्यांवर गेला आहे. प्रकल्पांची एकूण पाणीसाठा क्षमता ८६१.८६५ दशलक्ष घनमीटर असून त्यापैकी सध्या प्रत्यक्षात ३९७.५४४ दलघमी इतका पाणीसाठा आहे. पाणीसाठ्यात झपाट्याने झालेली वाढ जिल्ह्यासाठी मोठी दिलासादायक ठरली आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा मागील आठवड्यात २८.३० टक्क्यांवर होता. त्यात आठवडाभरात ८.४० टक्क्यांची भर पडली असून उपयुक्त पाणीसाठा ३६.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय जिल्ह्यातील तब्बल १९ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.
याशिवाय १५ प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. मागील आठवड्यात सहा प्रकल्प तुडुंब झाले होते. त्यात या आठवड्यात तब्बल १३ प्रकल्पांची प्रकल्पांची भर पडली आहे. तुळजापूर तालुक्यातील सर्वाधिक ११ प्रकल्प भरले आहेत.
पाऊस सुरू झाल्यापासून गेल्या महिनाभरापासून प्रकल्पांत पाण्याची विक्रमी आवक झाली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने काहिशी विश्रांती घेतली असली तरीही प्रकल्पांत पाण्याची आवक सुरूच आहे. जोत्याखाली गेलेले प्रकल्पही त्यातून वेगाने बाहेर पडत असून त्यातही उपयुक्त पाणीसाठ्याची भर पडली आहे.
महिनाभरापूर्वी २२६ प्रकल्पांतील १५.६० टक्के असलेला एकूण उपयुक्त पाणीसाठा बुधवारी (ता. १८) ३६.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच केवळ महिनाभरातच २१.१९ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. मे महिन्यात जोरदार बरसलेल्या माॅन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला जूनमध्येच पाण्याच्या संकटातून बाहेर काढले आहे. महिनाभरापूर्वी जोत्याखाली असलेल्या ७८ प्रकल्पांची संख्य़ा आता २६ वर आली आहे.
१०० टक्के भरलेले १९ प्रकल्प
तुळजापर तालुका ः भारती, व्होर्टी, पळस निलेगाव, शहापूर, खुदावाडी, तामलवाडी, मुरटा, धोत्री, जळकोट, आलियाबाद, हंगरगा-नळ.
उमरगा तालुका ः बेनीतुरा, अचलेर, भिकारसांगवी, दगड धानोरा.
भूम ः नांदगाव.
लोहारा ः लोहारा, जेवळी, माळेगाव.
भरण्याच्या मार्गावरील प्रकल्प (कंसात उपयुक्त पाण्याची टक्केवारी)
जकापूर (७९.६०), खामसवाडी (८८.४९), राघुचीवाडी (८१.८२), चोराखळी (७५.२०), वडजी (७८.४०), मलकापूर (८३.५९ टक्के), बागलवाडी (८२.३), गिरलगाव (८५.४६), सोनगिरी (९४.१६), कडकनाथवाडी (७७.९७), सावरगाव (८४.९७), तडवळा (७९.६८), निलेगाव (८३.९९), कोळसूर (८६.८२), अचलेर सा.त.(८३.४५).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.