Uran News : उरण तालुक्यात खरीप हंगामात भातपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिके घेतली जात नाहीत; परंतु गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने उरण व अलिबाग तालुक्यात पांढऱ्या कांद्याची लागवड होऊ लागली आहे. औषधी समजल्या जाणाऱ्या चविष्ट पांढऱ्या कांद्याला उरणच्या बाजारात मोठी मागणी आहे.
पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या पेंटट विभागाने हे मानांकन बहाल केले आहे. त्यामुळे रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असलेल्या या कांद्याला मागणी वाढली असून दरही चांगला मिळत आहे. औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेला अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी उरणच्या बाजारात दाखल झाला आहे. या कांद्याला चांगला भाव मिळत आहे.
परराज्यांतूनदेखील या कांद्याला मागणी असून औषधी गुणधर्मयुक्त कांदा पावसाळ्यात बेगमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो. उरण बाजारपेठेतील सीटीझन हायस्कूल रस्ता, राजपाल नाका, बाजारपेठ, गांधी चौक आदी ठिकाणी कांद्याची विक्री होत आहे. औषधी गुणधर्म असलेल्या अलिबागच्या कांद्यालाही मागणी आहे.
१०० ते २८०रुपयांना माळ
उरण तालुक्यातील रानसई, चिरनेर, पुनाडे परिसरात व अलिबाग तालुक्यात प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, सागाव, मारुतीधुळे, खंडाळा नेवली कारणे, खाना उसर, तळवली या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जाते. लहान कांद्याची माळ १०० रुपयांना; तर मोठ्या कांद्याची माळ २८० रुपये दराने विकली जात आहे. ही विक्री मार्चमध्ये सुरू होऊन मे पर्यंत होते.
आरोग्याचे फायदे
पंधरा कांदा खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. यामध्ये दाहकविरोधी गुणधर्म आहेत. पांढरा कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि हृदयाच्या धमण्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यताही कमी होते. पांढऱ्या कांद्यामध्ये क्वेर्सेटिन आणि अँथोसायनिन नावाचे अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
स्थानिक पांढरा कांदा चवीला गोड असतो. यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने उरणचे नागरिक विशेषतः येथील शेतकरी पांढरा कांदा मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. आकारानुसार माळा विक्रीसाठी ठेवल्या आहेत.अमिता पाटील, कांदा विक्रेती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.