Onion Rate : केंद्र सरकार करणार ५ लाख टन कांदा खरेदी ?

कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांची माती करणाऱ्या मोदी सरकारनं आता पुढच्या वर्षीही कांद्याचे दर वाढू नये, यासाठी तयारी सुरू केली आहे.
Onion
Onion Agrowon

केंद्र सरकारनं बांगलादेशला ५० हजार टन आणि युएईला १४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. त्याची अधिसूचना काढली पण त्याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही. कारण कांद्याच्या तूटपुंज्या निर्यातीला परवानगी देण्यात आलेली. कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांची माती करणाऱ्या मोदी सरकारनं आता पुढच्या वर्षीही कांद्याचे दर वाढू नये, यासाठी तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकार कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुका होईपर्यंत कांदा निर्यातबंदी उठवण्याची शक्यता नाही, असं इकॉनॉमिक टाइम्सनं सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. कारण केंद्र सरकार निवडणूक होईपर्यंत कसलीही जोखीम घेऊ इच्छित नाही. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या शक्यताही मावळ्या आहेत.

कांदा निर्यातबंदीला ३१ मार्चनंतरही केंद्र सरकार मुदत वाढ देण्याची शक्यता आहे. ग्राहक मतदार नाराज होऊ नये, यासाठी केंद्र सरकारनं कांदा दर पाडण्याचा निर्णय घेतला. रातोरात निर्यात बंदी घातली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मात्र कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं. एवढं करूनही केंद्र सरकारचं समाधान काही झालं नाही, म्हणून आता ५ लाख टन कांदा खरेदी करून त्याचा बफर स्टॉक केंद्र सरकार करणार आहे.

Onion
Onion Rate : शेतकऱ्यांनी कांदा रथ घेऊन सरकारच्या विरुद्ध दंड का थोपटले?

गेल्यावर्षी अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं ५ लाख टन कांदा स्टॉक करून ठेवला होता. त्यापैकी १ लाख टन कांदा शिल्लक आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीचं नियोजन करण्यासाठी एनसीसीएफ आणि नाफेड या एजन्सीमार्फत सरकार कांदा खरेदी करणार आहे. पण सरकारची कांदा खरेदी शेवटी शेतकऱ्यांच्या मुळावर येणार आहे. कारण केंद्र सरकारचं कांदा खरेदीचा उद्देश कांद्याचे दर पाडणे हाच आहे.

किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले की, सरकार कांद्याचा बफर स्टॉक अनुदान देऊन ग्राहकांसाठी कमी किमतीत बाजारात विकणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारची धडपड आणि त्यातून कांद्याचे दर पाडणार, असा हा केंद्र सरकारचा ठरलेला डाव आहे. म्हणजेच काहीही करून शेतकऱ्यांची माती करून ग्राहकांना मात्र खुश ठेवण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरू आहे. खरंतर केंद्र सरकारनं शेतीमालाचे दर पाडण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यात शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याची संधी सरकार सोडत नाही. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये जाहीर सभेत विद्यमान सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे कसे चांगले दिवस आलेत, असं म्हणत गोडवे गायले. हमीभावात कितीतरी पट वाढ झाल्याची शेखी मिरवली. वास्तवात मात्र शेतकऱ्यांच्या पोटावर पायच दिलाय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com