Agriculture Technique Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technique : बागायती गव्हाचे व्यवस्थापन तंत्र

Team Agrowon

डॉ. सुरेश दोडके, डॉ. योगेश पाटील, संजय चितोडकर

खरीप पीक निघाल्यानंतर जमीन लोखंडी नांगराने १५ ते २० सेंमी खोलवर नांगरावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर शेणखत, कंपोस्ट खत पसरवून टाकावे. नोव्हेंबरच्या पहिला पंधरवड्यात पेरणी केल्यास उत्पादन चांगले येते. १५ नोव्हेंबरनंतर उशिरा पेरणी केल्यास प्रत्येक पंधरवड्यास हेक्टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे १५ डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.

दर हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी ३ ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून बियाणे वाळवल्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. जिवाणू खतांच्या बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी. वाफसा आल्यावर जमीन कुळवावी. बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळींत २० सेंमी अंतर ठेवून करावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सेंमी खोल करावी, त्यामुळे उगवण चांगली होते.

पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजून न करता एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन २.५ ते ४ मीटर रुंद व ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.

खतांचा योग्य वापर

महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात वेळेवर पेरलेल्या गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पिकास शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा देऊन पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसांनंतर पिकावर २०० ग्रॅम १९:१९:१९ या विद्राव्य खताची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

जस्ताची कमतरता असलेल्या जमिनीत पिकाचे अधिक उत्पादन तसेच धान्यातील अधिक जस्ताचे प्रमाण व आर्थिक फायद्यासाठी हेक्टरी २० किलो झिंक सल्फेट शेणखतात एक आठवडा मुरवून (१:१० प्रमाणात) शिफारस अन्नद्रव्ये खत मात्रेसोबत (१२० नत्र :६० स्फुरद :४० पालाश अधिक १० टन शेणखत प्रति हेक्टरी) पेरणीच्या वेळेस जमिनीतून दिल्यानंतर झिंक ईडीटीएच ०.२ टक्का (२० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फुटवे धरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ४०-४५ दिवस) आणि फुलोरा अवस्थेत (पेरणीनंतर ६०-६५ दिवस) फवारणी करावी.

लोहाची कमतरता असलेल्या जमिनीत हेक्टरी २० किलो फेरस सल्फेट (हिराकस) आठवडाभर शेणखतात मुरवून (१:१० प्रमाणात) शिफारस अन्नद्रव्ये खतमात्रेसोबत (१२० नत्र :६० स्फुरद :४० पालाश अधिक १० टन शेणखत प्रति हेक्टरी) पेरणीच्या वेळेस जमिनीतून दिल्यानंतर, लोह ईडीटीए ०.२ टक्का (२ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फुटवे धरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ४०-४५ दिवस), ईडीटीए ०.२ टक्के (२० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फुटवे धरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ४०-४५ दिवस) आणि फुलोरा अवस्थेत (पेरणीनंतर ६०-६५ दिवस) फवारणी करावी.

सुधारित जातींची निवड

जात कालावधी (दिवस) उत्पादन (क्विं./हे.) वैशिष्ट्ये

सरबती

फुले समाधान १०८-११२ ४५-५० बागायती वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी शिफारस, तांबेरा प्रतिकारक, अधिक उत्पादन क्षमता

एमएसीएस ६२२२ १०५-११० ४५-५० तांबेरा प्रतिकारक, बागायती वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी शिफारस.

पीडीकेव्ही- सरदार १०० ४२-४५ तांबेरा प्रतिकारक, बागायती वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी शिफारस.

एमएसीएस ६४७८ १०८-११० ५०-५५ बागायती वेळेवर पेरणीसाठी शिफारस, तांबेरा प्रतिकारक.

बन्सी

एमएसीएस ४१०० (जेजुरी) ११० ४५ जस्त ३६.० पीपीएम, लोह ३३.६ पीपीएम, तांबेरा, प्रतिकारक, शेवया, कुरड्या व पास्त्यासाठी उत्तम.

खपली

एमएसीएस२९७१ ११०-११५ ४६-५० तांबेरा प्रतिकारक, तांबडा व लांबसडक दाणा, प्रथिने १३.५ टक्के. उपयोग खीर, उपमा, पुरणपोळी आणि दलिया निर्मितीसाठी उपयुक्त.

खत व्यवस्थापन (प्रति एकर)

बागायती गव्हाच्या पिकासाठी एकरी ४ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे.

पेरणीचा कालावधी रासायनिक खत मात्रा (किलो प्रति एकर) पेरणीच्या वेळी द्यायचा खतांचा बेसल डोस (किलो / एकर)

नत्र स्फुरद पालाश सरळ खते

बागायती वेळेवर पेरणी ४८ २४ १६ युरिया ५० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट १५० किलो, म्युरेट ऑफ पोटॅश २८ किलो

तीन आठवड्यांनी

(खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी) युरिया ५० किलो

खत वापराचे समीकरण

पश्‍चिम महाराष्ट्रातील गव्हाचे उत्पादन ४५ ते ५० क्विंटल प्रति हेक्टरी साध्य करण्यासाठी जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यासाठी आणि संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी शेणखतासोबत किंवा शेणखत विरहित उत्पादन उद्दिष्ट समीकरणांचा वापर करावा.

शेणखतासोबत अपेक्षित उत्पादन समीकरण

खतामधून द्यावयाचे नत्र कि./हे. =

(७.४२ × अपेक्षित उत्पादन क्विं./हे) -(०.८८ × जमिनीतील उपलब्ध नत्र कि./हे.)- (२.४५ × शेणखत टन/हे.)

खतामधून द्यावयाचे स्फुरद कि./हे. =

(१.७९ × अपेक्षित उत्पादन क्विं / हे.) -(१.४७ × जमिनीतील उपलब्ध स्फुरद कि./हे.) - (०.३३ × शेणखत टन / हे.)

खतामधून द्यावयाचे पालाश कि./हे. =

(४.७७ × अपेक्षित उत्पादन क्विं / हे ) - (०.४७ × जमिनीतील उपलब्ध पालाश कि. / हे.) - (०.६५ × शेणखत टन/ हे.)\

शेणविरहित अपेक्षित उत्पादन समीकरण

खतामधून द्यावयाचे नत्र कि./हे. =

(८.०९ × अपेक्षित उत्पादन क्विं./हे.) - (०.९६ × जमिनीतील उपलब्ध नत्र कि./हे.)

खतामधून द्यावयाचे स्फुरद कि./हे. =

(२.२६ × अपेक्षित उत्पादन किं./हे.) - (१.८६ × जमिनीतील उपलब्ध स्फुरद कि./हे.)

खतामधून द्यावयाचे पालाश कि./हे. =

(५.५४ × अपेक्षित उत्पादन किं./हे.)- (०.५४ × जमिनीतील उपलब्ध पालाश कि./हे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT