Maize Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Sowing : देशात मका लागवड १५ टक्क्यांनी वाढली

Maize Cultivation Maharashtra : गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पेरणीपेक्षा यंदा १५ टक्के जास्त क्षेत्रावर पेरा झाला. सर्वच प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये यंदा पेरणीचे चित्र चांगले दिसते.

Team Agrowon

Pune News : देशपातळीवर खरीप हंगामात मक्याला शेतकऱ्यांची चांगली पसंती मिळत आहे. कृषी विभागाकडील २१ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार ७१ लाख हेक्टरवर मक्याची पेरणी झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पेरणीपेक्षा यंदा १५ टक्के जास्त क्षेत्रावर पेरा झाला. सर्वच प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये यंदा पेरणीचे चित्र चांगले दिसते.

कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशात मका पेरा वाढला आहे. खरिपात मका लागवडीत कर्नाटक आघाडीवर असते. कर्नाटकात मक्याची लागवड जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात १५ लाख २३ हजार हेक्टरवर पोहोचली होती. गेल्या हंगामात याच काळात जवळपास १४ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. राजस्थानमध्येही मक्याचा पेरा वाढून ९ लाख ३४ हजार हेक्टरवर पोहोचला.

तेलंगणात गेल्या वर्षीच्या ३ लाख हेक्टरवरून यंदा साडेचार लाख हेक्टरवर मका पेरणी झाली आहे. महाराष्ट्रातही मक्याचे क्षेत्र अडीच लाख हेक्टरने वाढून जवळपास १३ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. तर गुजरातमध्ये मका लागवड काहीशी कमी झालेली दिसते.

मागील दोन वर्षांत सोयाबीन, कडधान्य आणि कापसाचे भाव नरम राहिले. तर दुसरीकडे मक्याला चांगला उठाव राहिला. त्यामुळे मक्याचे भाव तेजीत होते. परिणामी, सोयाबीन आणि कडधान्य उत्पादक राज्यांमध्ये यंदा मक्याला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. काही अभ्यासकांच्या मते, यंदाच्या खरिपातील मका लागवड क्षेत्र विक्रमी पातळीवर पोहोचल्यास आश्चर्य वाटणार नाही.

लागवड आणि उत्पादनात वाढ

गेल्या वर्षी खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामातही मक्याची लागवड आणि उत्पादन वाढले होते. खरीप २०२४ मध्ये मक्याची लागवड ८४.३० लाख हेक्टरवर पोहोचली होती. तर रब्बी हंगामातील क्षेत्र २७ लाख हेक्टर होते. उन्हाळी हंगामातही ८.४ लाख हेक्टरवर मक्याची लागवड झाली होती. त्यामुळे २०२४-२५ च्या हंगामात मका उत्पादन ४२२ लाख टनावर पोहोचले होते. त्याआधीच्या हंगामात (२०२३-२४) मका उत्पादन ३७६ लाख टन होते.

विक्रमी उत्पादनानंतरही आयात

देशात गेल्या दहा वर्षात मक्याचे उत्पादन दुप्पट झाले. मक्याचे विक्रमी उत्पादन होऊनही देशाला मक्याची आयात करावी लागली. कारण देशात मक्याला इथेनाॅल, पशुखाद्य आणि स्टार्च उद्योगाकडून चांगली मागणी राहिली.

त्यामुळे एकेकाळी मका निर्यात करणारा भारत मक्याचा आयातदार बनला आहे. २०२४-२५ च्या हंगामात देशात ९.७ लाख टन मक्याची आयात झाली. ही आयात आधीच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल सहा पट अधिक होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Paddy Procurement: चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट मर्यादित

Pomegranate Orchard Damage: वादळी वाऱ्यासह गारपीट; डाळिंब बागांचे नुकसान

Declining Water Storage: लघु प्रकल्पात १८ टक्के, तर मध्यम प्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा

Tractor Cultivation Charges Hike: शेती मशागतीचे दर २०० रुपयांनी वाढले

Drip Irrigation Project: ढिवरवाडी सिट्रस इस्टेटमध्ये अखेर लागणार ड्रीप

SCROLL FOR NEXT