Chhatrapati Sambhajinagar : शेतीतून अधिक उत्पादन येणे हे अपेक्षितच असते. परंतु त्यासोबतच शाश्वत उत्पादन घेणे आवश्यक आहे. आज जमिनीच्या आरोग्याकडे शेतकरी बांधवांना दुर्लक्ष करून जमणार नाही. दर्जेदार व शाश्वत उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीचे आरोग्य अबाधित ठेवणे आवश्यक आहे, असे मत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी व्यक्त केले.
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने बुधवारी (ता. १) आयोजित शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ. झाडे बोलत होते. डॉ. ते म्हणाले, की जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सुरुवात ही माती परीक्षणापासून करणे गरजेचे आहे. यावरून आपणाला जमिनीच्या आरोग्याची माहिती मिळते आणि त्यानुसार आपण शिफारशीत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो.
हिरवळीची खते, पिकांचे अवशेष जमिनीतच कुजवणे, गांडूळखत व इतर सेंद्रिय खतांचा योग्य व शिफारशीत वापर जमिनीचे आरोग्य सुधारण्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. यासोबतच पिकाच्या आवश्यकतेनुसार अन्नद्रव्य, पाणी यांचा पुरवठा केला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जमिनीच्या आरोग्यानुसार परिणाम करू शकतात. यासोबत पीक फेरपालट, आंतरपिकांची लागवड यांचाही शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे
यासोबतच कृषी विज्ञान केंद्रानी निर्मित केलेल्या जैविक द्रवरूप जिवाणू संघ व जैविक कीड व रोगनाशके बायोमिक्स याचा अवलंब करावा. कृषी विज्ञान केंद्राद्वारे आयोजित या कार्यक्रमात विषय विशेषज्ञ डॉ. संजुला भावर, डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. अनिता जिंतुरकर, कृषी महाविद्यालय, गेवराई तांडा येथील सहायक प्राध्यापक डॉ. योगेश पाटील व शेतकरी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
डॉ. भावर म्हणाले, की मराठवाड्यात मिरची लागवडीसाठी परभणी तेजस परभणी मिरची, पी बी एन सी-१७, पीबीएनसी-१६, पुसा ज्वाला, अर्का हरिता, अर्का मेघना या वाणांची निवड करावी. लागवडीपुर्वी १०-१२ टन प्रतिएकरी शेणखत टाकावे. लागवडीपासून ३० दिवसांमध्ये १९:१९:१९ ६ किलो हे तीन समान विभाजीत पिकास विभागून द्यावे.
नंतर ३०-४५ दिवसांत १२:६१:०० हे ०६ किलो तीन समान हप्यात विभागून द्यावे. ४५-६० दिवसामध्ये १३:४०:१३ हे. ६ किलो हे तीन समान हप्त्यात विभागून द्यावे. तसेच मॅग्नेशिअम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट, फेरस सल्फेट प्रत्येकी ५ किलो प्रतिएकरी हे मिरची पिकास फुलोरा अवस्थेत द्यावे. तसेच बोरॉन प्रतिमहिना २५० ग्रॅम/एकर फुलोरा सुरू झाल्यानंतर द्यावे.
लागवडीसाठी ३०-५० मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर वापरावा तसेच कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. विषय विशेषज्ञ डॉ. अनिता जिंतुरकर यांनी सद्यःस्थितीतील पशुधन व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. प्रास्ताविक व आभार डॉ. बस्वराज पिसुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी जयदेव सिंगल, जयदीप बनसोडे, सचिन हुड यांनी नियोजन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.