Farming Guide AgrowonAgrowon
ॲग्रो विशेष

Farming Guide: शेत पडीक पडू दे पण आता सालगडी नको...

स्वत:हून काहीच काम करण्याची या सालगड्यांची तयारी नाही. कामासाठी आपण पैसे घेतोय, ही जाणीव नाही. तुमच्याकडं नोकरी करतोय, म्हणजे जणू उपकार करतोय ही भावना.

Team Agrowon

- महारूद्र मंगनाळे

शेत पडीक पडलं तरी हरकत नाही; पण आता सालगडी नको, असं मला वाटू लागलंय. अधिक मजुरीबद्दल माझी कधीच तक्रार नव्हती, आजही नाही. माझा मुद्दा वेगळा आहे.

शेतीत कामासाठी राहणाऱ्या कुटुंबाला (Family) जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. संडास, बाथरूम, गोबरगॅस, आम्ही राहतो तशीच पत्र्याची खोली, सुरक्षितता पुरवतो.

सालगडी व्यसनांच्या आहारी जाऊ नयेत, त्यांच्या लेकरांना किमान चांगलं शिक्षण (Education) मिळावं, असाही आमचा प्रयत्न असतो. त्यांच्या अडी-अडचणींना मदत करतो.

आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो. आमच्या तोंडून कधीच शिवी किंवा चुकीचा शब्द बाहेर पडत नाही... तरीही सालगड्याकडून आमच्या किमान अपेक्षा पूर्ण होत नाहीत. स्वत:हून काहीच काम करण्याची या सालगड्यांची तयारी नाही. कामासाठी आपण पैसे घेतोय, ही जाणीव नाही.

तुमच्याकडं नोकरी करतोय, म्हणजे जणू उपकार करतोय ही भावना. सोबत वावरताना किमान सभ्यता पाळायला हवी, हे सुध्दा कळत नाही. भीक नको,कुत्रा आवर... अशी ही परिस्थिती आहे.

ही माझी एकट्याची अवस्था नाही. कोणाही शेतकऱ्याशी बोला, तो हेच रडगाणं गाईल. काम करण्याची मानसिकताच नाही. प्रत्येक गोष्ट सांगावी लागते.

मालकाच्या फायद्या-तोट्याशी या सालगड्यांना काहीच देणंघेणं नाही. मी प्रत्यक्ष शेती करायला सुरू करून आता तब्बल बारा वर्षे होत आलीत. शेतात कामासाठी आता बाहेरचा माणूसच नको,अशा मताला आलोय.

सुदैवाने माझ्याकडं नरेश शिंदे हा एक चांगला पर्याय आहे. तो आमच्या चार चाकीसह शेतातील ट्रॅक्टर, विडरसह सगळी वाहनं चालवतो आणि शेतीतील कामात मदतही करतो. अतिशय प्रामाणिक, विश्वासपात्र आहे. त्याला येऊन आठ वर्षे झालीत.

त्याचा छोटा मुलगा गबरू उर्फ राजवीर चांगल्या इंग्रजी शाळेत जातोय. आम्ही त्याचं भविष्य घडावं यासाठी सर्वतोपरी मदत करू .कारण तो या सगळ्यासाठी पात्र आहे. नरेशवर सगळं सोपवून आम्ही निवांत जाऊ शकतो. पण १७-१८ एकर वहिती शेतीसाठी दुसरा एक माणूस लागतोच

खरं तर दुसरा माणूस लागतो तो जनावरांसाठी. मी म्हशीपालनाचे यशस्वी प्रयोग केले. गतवर्षी ४० जनावरं होती. आता आठ आहेत. आता पशूपालन शक्य नाही, या मताला आलोय. पुढच्या महिनाभरात सगळी जनावरं काढून फक्त दुधाची एक म्हैस ठेवणार आहे.

शेतीत सोयाबीन शिवाय दुसरं काहीच पीक घ्यायचं नाही, या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केलीय. फळबाग आवडीने केलीय. ती जगण्याची सोबती आहे. तिथंही नफ्या-तोट्याचा विषय नाही.मग दुसऱ्या माणसाची गरजच काय? सव्वा लाख कशासाठी मोजायचे?

आम्ही कितीही चांगलं वागलो तरी त्यांच्यावर परिणाम शून्य! एकेका सालगड्यावरची वास्तव स्टोरी केली तर, माझ्यावर मजूरविरोधी, सरंजामी वृत्तीचा वगैरे शिक्के सहज बसतील.

त्याची चिंता मला नाही. पण कोळसा उगाळून उपयोग काय? समोरच्या व्यक्तीला त्याचं भलंबुरं कळत नसेल तर आपण काय करणार?

नरेशही म्हणतोय की, आपण एक वर्ष सालगड्याशिवाय शेती करू! सगळं मशीनने तर होतंय...खरिपाचे तीन महिने मी शेतीत काम करू लागलो तर काहीच अडचण येणार नाही...बाकी सगळी कामं गुत्तं देऊन करायची...थोडे अधिक पैसे मोजायचे...

मी बांधावरचा नाही तर प्रत्यक्षात कसणारा शेतकरी आहे, तसाच शेतमजूरही आहे. मी शेतीतील सगळी कामं करतो. तेव्हा मी शेतमजूरच असतो.

त्यामुळं मी स्वतःला शेतकरी आणि शेतमजूर, या दोघांचाही प्रतिनिधी मानतो. मी सालगड्यांबद्दल जे लिहिलंय ती टीका नाही,वास्तव आहे. पण यावर उपाय काय, याचं कोणाकडंच उत्तर नाही.

मी परवा एका मित्राला म्हटलं की, माझ्या सालगड्याकडून फार कमी अपेक्षा आहेत. तो दारू पिणारा नसावा (पित असला तर ते आम्हाला कळायला नको), त्यानं पगारापेक्षा दुप्पट उचल मागायला नको, त्याला किमान सभ्यता कळावी, त्याला शेतीचं किमान ज्ञान असावं आणि तो मनाने काम करणारा असावा.

मित्र म्हणाला, तुला असा सालगडी मिळणं शक्यच नाही.
मी म्हटलं, किमान या अपेक्षा पूर्ण करणारा सालगडी मिळाला तरच मी ठेवेन. नाही तर मी सालगडी ठेवणार नाही.

माझ्यासाठी शेती नफ्याचा विषय नाहीच. मी आनंदासाठी शेती करतो. सालगडी हा जर या आनंदात विरजण ठरत असेल तर, या सालगड्याला कायमची सुट्टी. आमची शेती आम्हाला जशी होईल, जशी जमेल तशी करू.

तो दिवस फार दूर नाही की, काम करायला माणूस मिळत नाही म्हणून शेती ओस पडलीय, असं चित्र दिसेल. त्याची सुरुवात झालीच आहे. पण व्यवस्थेलाही त्याशिवाय जाग येणार नाही.

शेती मोठ्या प्रमाणात ओस पडल्याशिवाय शेतीला बरे दिवस येण्याची शक्यता नाहीच.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

SCROLL FOR NEXT