Pune News : राज्यासह देशात लोकसभा निवडणूका होत आहेत. राज्यातील ४८ जागांसाठी मतदानाच्या तारखा घोषित झाल्या असून सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. यादरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक (PSI) संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या तारखांत बदल केला. यापाठोपाठ आता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणखी दोन परिक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलल्या आहेत. आयोगाने राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि नियोजित समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब च्या परिक्षा पुढे ढकलल्या आहेत.
आयोगाचे म्हणणे...
आयोगाच्या म्हणण्यानुसार, काही जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र यावर निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. तर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियमानुसार नव्याने आरक्षणाची निश्चिती करावी लागणार आहे. याप्रमाणे शासनाच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांकडे मागणीपत्र पाठविण्याबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे.
कोणत्या परिक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या?
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ साठी आयोगामार्फत २७४ पदांकरीता २९ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात देण्यात आली होती. तर ही परिक्षा २८ एप्रिल, २०२४ रोजी घेण्यात येणार होती. मात्र सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबरोबरच १९ मे, २०२४ रोजी नियोजित समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या देखील परिक्षां पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्य शासनातील विविध विभागांकडून मागणीपत्र मागविण्यात येणार असून याला किती कालावधी लागेल याची निश्चिती नाही. यामुळे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि नियोजित समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब परिक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करता येणार नाही. तर मागणी पत्र मिळाल्यानंतर संघ लोकसेवा आयोग व कर्मचारी चयन आयोगामार्फत सुधारित तारखा जाहीर केल्या जातील, असेही आयोगाने म्हटले आहे.
पीएसआयच्या शारीरिक चाचणीची परिक्षा वेळापत्रकात बदल
आयोगाकडून याआधी पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. तर हा बदल लोकसभा निवडणुकांमुळे करण्यात आला आहे. पीएसआय संवर्गाच्या शारीरिक चाचणीची परिक्षा ही १५ ते २७ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार होती. मात्र यात आयोगाने बदल करत नव्या तारखा जाहीर केल्या आहे. आता १९, २६ आणि २७ एप्रिल रोजी होणारी शारीरिक चाचणीची परिक्षा ही २९, ३० एप्रिल आणि आणि ०२ मे २०२४ रोजी पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे होणार आहे. ही माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात आली आहे.
शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला सुनावले
यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुण्यात “अस्वस्थ तरुणाईशी संवाद” कार्यक्रमात स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात पवार यांनी, विद्यार्थ्यांच्या मनातील खदखद ऐकूण घेत लोकसभा निवडणुकीवरून बदलल्या परिक्षांच्या तारखावरून निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर टीका केली. पवार यांनी, एमपीएसची-यूपीएससी परिक्षेच्या तारखा पुढे ढकलण्याआधी निवडणूक आयोगाने शहाणपणाने निवडणुकांचा कार्यक्रम आखायला हवा होता, असे म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.