Pune News : ‘‘आषाढी पालखी सोहळ्यातील नोंदणीकृत दिंड्यांना प्रत्येकी २० हजार निधी देण्याचा निर्णय राज्य शासनाने मागील वर्षी घेतला आहे. तोच निर्णय यावर्षीही लागू असून, गेल्यावर्षी ३१ कोटी रुपयांचा निधी दिंड्यांना दिला होता. या वर्षी बाराशे दिंड्यांसाठी ३६ कोटींच्या निधीची तरतूद असून, ७५ टक्के निधी वाटप झाला आहे,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली
विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वतयारी आढावा बैठकीत नंतर शनिवारी (ता.१४) माध्यमांना ही माहिती दिली. दरम्यान, पालखी आढावा बैठकीत पवार म्हणाले, ‘‘वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल.
तसेच पावसाच्या पार्श्वभूमीवर विसाव्याच्या, मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करावी. दिवे घाटात पाऊस पडत असल्यास पालखी सोहळा जाण्यास अडचण येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. घाट परिसरात पालखीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रतिबंध करावा. डोंगराच्या बाजूने खोदाई सुरू असल्याने पावसाने दगड रस्त्यावर येऊन वारकऱ्यांना धोका होऊ उत्पन्न होऊ नये म्हणून बॅरिकेटिंग करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
तसेच वादळात रस्त्याच्या कडेला असलेले जाहिरात फलक खाली कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून अनधिकृत फलक तातडीने काढावेत. त्यासाठी संपूर्ण मार्गावर महसूल, पोलिस अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त पाहणी करावी. अधिकृत जाहिरात फलकांचे संरचनात्मक स्थीरता परीक्षण (स्ट्रॅक्चरल स्टॅबिलीटी ऑडिट) करून घेण्याच्या सूचना श्री.पवार यांनी दिल्या.
बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखरसिंह, पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
‘कोविडच्या पार्श्वभूमीवरवारकऱ्यांची आरोग्य तपासणी करा’
कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रमुख, दिंडीप्रमुखांशी संवाद साधून सर्दी, ताप, खोकला आदी त्रास असणाऱ्या वारकऱ्यांनी वारीत सहभागी होण्यापूर्वी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केल्या. तसेच असे आजार असलेल्या वारकऱ्यांची तपासणी, उपचार तातडीने होतील यासाठी आवश्यक ते तपासणीची व्यवस्था, औषधे पालखीमार्गावरील आरोग्य पथकांकडे ठेवावीत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
पुणे विभागातील कोविड-१९ चा आढावा
पुणे विभागातील कोविड आढावा बैठकीत ओमीक्रॉनचे जेएन, एक्सएफजी व जीएफ७-९ हे उपप्रकार आढळून येत आहेत. या प्रकारामुळे ताप, खोकला, घसा दुखणे असे सौम्य आजार होतात. फक्त रक्तशर्करा, कर्करोग आदी सहव्याधी कमी असलेले, रोग प्रतिकार शक्ती कमी असलेले नागरिक आदींना थोडा धोका जास्त आहे. अशांनी गर्दीत जाणे टाळावे. हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे. श्वसनदाह वाढल्यास त्वरित जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी व इलाज करावा, असे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.