ना. धों. महानोर आणि इंद्रजित भालेराव Agrowon
ॲग्रो विशेष

Indrajit Bhalerao : महानोर रोमॅंटिक कवी होते ?

Article by Indrajit Bhalerao : महानोर यांनी लिहिलेल्या बदलत्या उद्‍ध्वस्त खेड्याची ही कविता; पण तिची कुणी फारशी दखल घेतली नाही. त्याची दोन कारणं संभवतात.

Team Agrowon

Na. Dho. Mahanor : महानोर यांनी लिहिलेल्या बदलत्या उद्‍ध्वस्त खेड्याची ही कविता; पण तिची कुणी फारशी दखल घेतली नाही. त्याची दोन कारणं संभवतात. एक तर महानोर यांच्या कवितेच्या चाहत्यांना या विषयात रस नव्हता. त्यामुळं त्यांनी या कवितेकडे ढुंकूनही पाहिलं नाही. त्यांना महानोरांच्या रोमॅंटिक कवितेची चटक लागलेली होती.

अर्थात, ती चटक महानोरांच्याच आधीच्या कवितेनं त्यांना लावलेली होती. दुसरं कारण असं सांगता येईल, की उद्‍ध्वस्त खेड्याचं आणि शेतकऱ्याचं चित्रण नंतरच्या ग्रामीण कवींनी समर्थपणे आधीच करून ठेवलेलं होतं. या वास्तववादी कवितेचे चाहते महानोर यांच्याकडं रोमँटिक कवी म्हणून आधीपासूनच दुर्लक्ष करीत होते.

तात्पर्य महानोरांनी मराठी कवितेचं बदललेलं वळण अंगीकारण्यासाठी आपली वाट सोडून दुसरी वाट धरली; पण या दुसऱ्या वाटेवर त्यांचं स्वागत झालं नाही. त्यांचे स्वागतेच्छू पहिल्या वाटेवरच उभे होते. नव्या वाटेवरचे लोक कधीच त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक नव्हते.

त्यानंतर पुष्कळ दिवस महानोरांची आणि माझी भेट झाली नाही. बोलणंही झालं नाही. दरम्यान, औरंगाबाद इथलं माझं शिक्षण संपवून मी परभणीत प्राध्यापक म्हणून लागलेलो होतो. १९८९ मध्ये माझा पीकपाणी हा कवितासंग्रह आला. १९९१ मध्ये या कवितासंग्रहासाठी मला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला.

त्याचं वितरण मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाचं संयोजन महानोरांनी केलेलं होतं. तिथं त्यांनी माझ्याकडं पाहिलंदेखील नाही. या गोष्टीचं मला फार वाईट वाटलं. त्यांचा राग अजूनही शमलेला नसावा, हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळं मीही शांतच बसून होतो. पण कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडताना एक तरुण मला भेटला.

तो म्हणाला, ‘‘मी महानोरांचा नातेवाईक आहे. शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या आमदार निवासातल्या खोलीत राहतो. तुमचा पीकपाणी हा कवितासंग्रह तिथं आहे. दादांनी तो आणलेला आहे. मी तो वाचून काढला. मला तुमच्या कविता फार आवडल्या. अधून मधून दादाही तो चाळत बसतात.’’ मला या गोष्टीचा विलक्षण आनंद झाला. महानोर मला बोलले नसले, त्यांनी माझ्याकडं पाहिलंही नसलं; तरी माझी कविता मात्र ते वाचत होते. हे ऐकून मला आतल्याआत आनंद झाला.

त्याच वर्षी मला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा अनंत काणेकर पुरस्कार मिळाला. मी तसा साहित्य क्षेत्रात नवाच होतो. या कार्यक्रमाला खूप मोठी माणसं आली होती. मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होते. चित्रलेखाचे तेव्हाचे संपादक आणि पुढे शिवसेनेचे खासदार झालेले नारायण आठवलेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

महाराष्ट्र टाइम्सच्या नीला उपाध्ये उपस्थित होत्या. त्यांनी दुसऱ्या दिवशी फार चांगला वृत्तांत लिहिला. पुरस्काराला उत्तर देताना मी केलेलं कविता वाचन त्यांना भयंकर आवडून गेलं. नारायण आठवले यांनी चित्रलेखात त्यावर एक लेखच लिहिला. त्यात त्यानी महानोरांच्या विरोधात मला उभं करण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी असं लिहिलं होतं, की काळजात घुसून बसणारा आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडणारा हा कवी आणि याउलट सत्तेचं जांभुळ पिकावं आणि आपल्याच तोंडात पडावं म्हणून जांभळाखाली आ वासून बसलेल्या कवींपैकी हा कवी नव्हे. याची जातकुळी अस्सल आहे. हा थेट महात्मा फुल्यांचा वारस शोभतो. शेतकऱ्यांचा वाली शोभतो.

हे वाचल्यानंतर महानोरांच्या मनात काय आलं असावं याची कल्पना मी करू शकतो. माझ्या कवितेचे कौतुक करणारा प्रत्येक जण इथून पुढे नकळतपणे माझ्या कवितेला महानोर यांच्या कवितेच्या विरोधात उभं करत होता. माझ्या कवितेचं हे सापेक्ष मूल्यमापन मला नेहमीच बुचकळ्यात पाडीत होतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT