Chhatrapati Shivaji Maharaj Sahitya Nagari, Talkatora Stadium, Delhi : ‘‘अन्य भाषिक व्यक्तीशी किंवा वेगळ्या संस्कृतीतील जोडीदारासह संसार करताना काही अडीअडचणी येतातच. मात्र प्रेम हे भाषा आणि संस्कृतीच्या पल्याडचे आहे. त्यामुळे प्रेमाचा धागा जुळल्यावर संसार सुखाचा होतो,’’ अशी भावना ‘मराठीचा अमराठी संसार’ या परिसंवादात मान्यवरांनी शनिवारी व्यक्त केली.
मराठी साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी झालेल्या या परिसंवादात राजदीप सरदेसाई-सागरिका घोष, डॉ. ज्ञानेश्वर मुळे-डॉ. साधना शंकर, रेखा रायकर-मनोज कुमार आणि डॉ. मंजिरी वैद्य-प्रसन्न अय्यर ही चार दांपत्ये सहभागी झाली होती. अस्मिता पांडे आणि बाळ कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी आमदार डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते.
कौतुकाचे बोल
सरदेसाई यांनी मिस्कील शैलीत पत्नीच्या पहिल्या भेटीची आठवण सांगत ओळख करून दिली. माझ्या लिखाणाचे पहिले समीक्षण सागरिकाच करते, याचा त्यांनी कौतुकाने उल्लेख केला. घोष यांनी ‘आमच्या घरात बंगाल आणि महाराष्ट्र यांचे द्वंद सुरूच असते’, असे सांगत ‘बातमी ही जणू माझी सवतच आहे’, अशी प्रेमळ तक्रारही केली.
शब्दांविनाही संवाद
‘‘साधना या उत्तम कलाकार आणि लेखिका आहे. माझी ओढ अजूनही गावच्या मातीत रुजलेली आहे तर साधना उच्च शिक्षण घेतलेल्या शहरी वातावरणात वाढलेली आहे. तरीही ती खेड्यात रमते,’’ असे मुळे यांनी सांगितले. ‘आम्हाला संवाद साधताना भाषेची कधीही अडचण आली नाही. कारण प्रेम असल्यावर शब्दांविनाही संवाद साधता येतो’, असे साधना यांनी सांगितले.
पतीची भक्कम साथ
‘‘बिहारी कुटुंबात रुळताना मला निश्चितच अडचणी आल्या. पण पतीची भक्कम साथ लाभल्यामुळे हे बदल स्वीकारणे सुकर झाले,’’ असे रेखा रायकर यांनी नमूद केले. ‘भाषा, संस्कृती याचा प्रत्येक व्यक्तीला अभिमान असणे आवश्यक आहे. मराठी बोलता येत नसली, तरी मला मराठी चित्रपट आणि नाट्यकृती पाहायला मनापासून आवडते’, असे मनोजकुमार यांनी सांगितले.
सूर सहज जुळले
डॉ. मंजिरी वैद्य म्हणाल्या, ‘‘मुलांचे संगोपन करताना भाषाभेद न ठेवता योग्य वयात मुलांवर भाषेचे उत्तम संस्कार केल्यास ते बहुभाषक बनतात. बहुभाषक असल्यामुळे व्यक्तीमध्ये विविध संस्कृतीचा मिलाफ होतो.’’ अय्यर म्हणाले, की मी तमीळ असलो तरी माझी जडण-घडण महाराष्ट्रातच झाल्याने थोडाफार फरक वगळता आमच्यावर फारसे भिन्न संस्कार झालेले नाहीत. त्यामुळे आमचे सूर सहजतेने जुळले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.