
Pune News : मोगल आक्रमकांनी फारसी भाषा राजभाषा करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र हे प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज यांनी परतवून लावत आज्ञापत्राद्वारे स्वराज्याची भाषा मराठी करीत खऱ्या अर्थाने मराठी भाषेला राजमान्यता देण्याचे काम त्यांनी केले आहे. मराठी भाषेचे जगभरात संवर्धन, प्रसार आणि प्रचारासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी मराठी भाषा विभागाने प्रयत्न करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित विश्व मराठी संमेलन २०२५चे उद्घाटन शुक्रवारी (ता. ३१) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योग व मराठी भाषा विकासमंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापू पठारे, मराठी भाषा विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना ‘साहित्य भूषण’ पुरस्काराने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘मराठी माणसाने अटकेपार झेंडा फडकवला होता. मराठे भारताच्या सीमांच्या रक्षणासाठी पानिपतच्या लढाईला गेले होते. या लढाईत अहमदशहा अब्दालीने तहाचा प्रस्ताव पाठविला, यात पंजाब, सिंध आणि मुलतानचा प्रदेश मागितला होता. मात्र हा प्रदेश दिला असता तर तो अफगाणिस्तानचा भाग झाला असता. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाईची प्रेरणा दिल्याने मराठे लढले आणि सीमा सुरक्षित केल्या.’’
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा कुंभमेळा भरला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील नाणेघाटातील (ता. जुन्नर) सातवाहनकालीन शिलालेख हा महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. हा आपला गौरव असून, मराठी भाषा संवर्धनासाठी मातृभाषेतून उच्चशिक्षण देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. यामाध्यमातून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होणार आहे.’’
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘१७५८ मध्ये मराठी सैनिकांनी लाहोर मुलतान जिंकून अटकेपार झेंडा फडकवला होता. १७८८ मध्ये दिल्लीवर भगवा फडकवला होता. पानिपतमुळे आपल्या सीमा सुरक्षित राहिल्या. मराठी माणसांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवत ठेवला आहे.
यामुळे मराठी भाषा एका जातीपुरती मर्यादित नाही ती वैश्विक आहे. मात्र आता मराठी माणसांमध्ये एकप्रकारचा न्यूनगंड आला आहे. हा न्यूनगंड दूर करण्याचे काम विश्व मराठी संमेलन करत आहे. पुढील पाच वर्षांत एक तरी संमेलन परदेशात एका चांगल्या शहरात घेण्यात यावे,’’ अशी सूचना त्यांनी केली.
मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘मराठी भाषेवर आणि भाषकांवर आक्रमण होत असेल तर ते आक्रमक पद्धतीने परतवून लावले पाहिजे. या अन्यायाला आळा घालण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे.’’
दरम्यान, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, संजय नाहर आणि रवींद्र शोभणे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. मनीषा म्हैसकर यांनी प्रास्ताविक केले. अजित भुरे यांनी सूत्रसंचालन केले, तर श्यामकांत देवरे यांनी आभार मानले.
‘जेवण करून आलाच असाल...’
या कार्यक्रमाला विविध देशांमधून मराठी माणसं उपस्थित आहेत. त्यांचा चांगला पाहुणचार करा. नाहीतर आपण जेवण करूनच आला असाल... चहा घेऊनच आला असाल... असे मिश्कीलपणे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजकांना चिमटा काढला. पवार यांच्या या मिश्कील मिमिक्रीला उपस्थितांनी दाद देत हशा पिकला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.