Latur / Dharashiv News : लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील पीककर्ज वाटपावर यंदा कर्जमाफीचे सावट दिसून आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी कर्जमाफीच्या विषयावरून झालेल्या आंदोलनांमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लागली होती. मात्र, ती धुळीस मिळाली. कर्जमाफीच्या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या पीककर्जाचे नवंजुनंही केले नव्हते.
पहिल्याच शेतकऱ्यांना नवंजुनं करून कर्ज वाटपाचे उद्दिष्ट तडीस नेण्याच्या तयारी असलेल्या बँका यंदा तोंडावर पडल्या. यातच नवीन कर्ज देण्यास बँकांचा नाठाळपणा कायम राहिला. धाराशिव जिल्ह्यात गेल्यावर्षी अद्दल घडूनही बँकांनी कर्जासाठी हात आखडताच ठेवला. तर लातूर जिल्ह्यात कर्ज वाटप कमी करणाऱ्या व काहीच कर्ज न देणाऱ्या बँका जिल्हा बँकेने मोठ्या प्रमाणात केलेल्या कर्जाच्या सावलीत झाकून गेल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामातील पिके फुलोऱ्यात येऊ लागली, बँकांनी अपेक्षित पीककर्ज वितरण झालेले नाही. जुलैअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप होण्याची आशा असताना आतापर्यंत उद्दिष्टाच्या केवळ ४६.७२ टक्के कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्याचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट एक हजार ६५८ कोटी ५७ लाख रुपये असून आतापर्यंत ७७ हजार २९१ शेतकऱ्यांना ७७४ कोटी ८५ लाख २८ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे.
यातही बहुतांश नवं जुनं करणारे जुनेच कर्जदार शेतकरी असून, नवीन पीककर्ज मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांनी ठेंगा दाखविला आहे. गेल्यावर्षी बँकांनी पीक कर्जासाठी नाठाळपणा दाखवला होता. सिबील व अन्य कारणे पुढे करून कर्ज देण्यास टाळाटाळ केली होती. लोकप्रतिनिधींनी हा विषय ऐरणीवर घेतल्यानंतर बँकांनी नरमाईची भूमिका घेतली होती. यात काही बँकांविरुद्ध उद्दिष्टाच्या तुलनेत कमी कर्ज वाटप केल्याप्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले होते.
गेल्यावर्षी बँकांना अद्दल घडूनही यंदा बँकाकडून कर्ज वाटपासाठी उदासीनता कायम आहे. जिल्हा बँकेकडे नवीन कर्ज वाटपासाठी भांडवल नाही. बँकेने ३४ हजार १६२ शेतकऱ्यांकडील थकित कर्जाचे नवंजुनं करून १६३ कोटी ६० लाख २८ हजार रुपयांचे कर्ज वाटप दाखवून ५३.२७ टक्के वाटपाचे उद्दिष्ट गाठले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांवर पीक कर्जाची मदार असताना या बँकांकडूनही नवंजुनं करून थोडे वाढीव कर्ज शेतकऱ्यांच्या हाती देण्याची तयारी आहे.
या बँकांनी केवळ ३२.१९ टक्के
पीककर्ज दिले आहे. बँकांकडून १८ हजार ५२८ शेतकऱ्यांना ३३२ कोटी दोन लाख रुपयांचे पीककर्ज देण्यात आले आहे. मात्र, कर्जमाफीच्या आशेने अनेक शेतकरी नवंजुनं करण्यासाठी पुढे येत नाहीत तर नवीन शेतकऱ्यांना बँका दारात उभे टाकून देत नसल्याची स्थिती आहे.
या स्थितीत महाराष्ट्र ग्रामीण बँकांने दरवर्षीप्रमाणे यंदाही समाधानकारक कर्ज वाटप केले आहे. बँकेने उद्दिष्टाच्या ८७.२६ टक्के कर्ज वाटप करत २४ हजार ६०१ शेतकऱ्यांना २७९ कोटी २३ लाख रुपयांचे पीककर्ज दिले आहे.
लातूर जिल्ह्यात ५२ टक्के कर्ज वाटप
लातूर जिल्ह्यात पीककर्ज वाटपात यंदाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत उद्दिष्टाच्या ८७ टक्के म्हणजे ८१३ कोटी ६६ लाख ७७ हजार रुपयाचे कर्ज वाटप केले. बँकेने प्रतिकूल परिस्थितीतही पाच लाख रुपयांपर्यंतची बिनव्याजी कर्जाची योजना यंदाही कायम ठेवली असून मोठ्या संख्येने शेतकरी त्याचा लाभ घेत आहे. बँकेच्या मोठ्या प्रमाणात कर्ज वाटपामुळे जिल्ह्याचे वाटपाचे उद्दिष्ट ५२ टक्क्यापर्यंत गेले आहे.
दरम्यान राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक सुरु ठेवली असून जुले संपत आला तरी या बँकाकडून केवळ उद्दिष्टाच्या २१ टक्केच कर्ज वाटप केले गेले आहे. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांना एक हजार २५९ कोटी २७ लाखाचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ २६४ कोटी ८२ लाखाचे कर्जवाटप केले आहे.
कर्ज वाटपात महाराष्ट्र ग्रामीण बँक यंदाही दुसऱ्या क्रमांकावर असून बँकेला २६४ कोटी ८९ लाखांचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत १७५ कोटी ७६ लाखाचे वाटप करून ६६ टक्के उद्दिष्ट तडीस नेले आहे. खरिपासाठी जिल्ह्यात यंदा दोन हजार ४९२ कोटी ७६ लाख पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.