माणिकराव खुळे
Rain Article : सप्टेंबरअखेरपर्यंत आवर्तनांनुसार घोषित तारखांना संपूर्ण हंगामात मॉन्सूनने आपली वाटचाल केलेलीच आहे. ९ ते १३ ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. १२ ऑक्टोबरपर्यंतच्या सप्ताहात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नव्हती.
परंतु अरबी समुद्रात केरळ किनारपट्टीसमोर चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून कमी दाबाचे क्षेत्र निर्मिती आणि या वाऱ्याचे किनारपट्टी समांतर उत्तरेला गुजरातपर्यंतच्या मार्गक्रमणामुळे ९ ते १३ ऑक्टोबर या काळात पूर्वघोषित पहिल्या आवर्तनामध्ये विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी एक ते दोन सेंमी दरम्यान गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेषतः रायगड, मुंबई शहर, उपनगर, ठाणे पालघर, खानदेश, नाशिक, नगर, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम उत्तर वर्धा, उत्तर नागपूर या जिल्ह्यात मात्र तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या (२ ते ४ सेंमी) पावसाची शक्यता आहे.
परतीचा मॉन्सून खोळंबला
शनिवारी (५ ऑक्टोबर) परतीच्या वाटेवरील मॉन्सून केवळ महाराष्ट्र राज्याच्या उंबरठ्यावर म्हणजे नंदुरबार पर्यंत येऊन उभा ठाकला आहे. आज चार दिवस झाले, अजून तो नंदुरबारमध्येच आहे. अर्थात, येत्या २ ते ३ दिवसांत म्हणजे १० ऑक्टोबरदरम्यान कदाचित तो महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पुढील वाटचाल करेल अशी शक्यता आहे. तसे झाले तर ऑक्टोबरच्या पहिल्या (ता. ९ ते १३) आवर्तनात संयोगातून संवहनी प्रणालीद्वारे पडणारा हा पाऊसच खरा परतीचा पाऊस ठरू शकतो.
९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान आवर्तनात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण फारसे नसले तरी या दरम्यान पडणारा पाऊस धोपटणी स्वरूपाचा, जमिनीला जाड कडक खपली आणणारा असतो. यामुळे हा पाऊस शेतजमीन पृष्ठभागाची रंध्रे बंद करतो. ऑक्टोबर हीटमुळे दिवसा तापलेल्या जमिनीतील उष्णता रात्री बाहेर पडण्यास त्यामुळे अडथळा तयार होतो.
तापलेल्या जमिनीत संक्रमित झालेली उष्णता बाहेर न पडता जमिनीतच कोंडून राहते. परिणामी, या दरम्यानच्या काळात उभ्या असलेल्या शेत पिकांना ही अवस्था अपायकारक ठरू शकते.
ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात शक्यतो ऑक्टोबरची तीव्र हीट अनुभवली जाते. परंतु या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजे कोजागरी पौर्णिमा ते नरक चतुर्दशी (बुधवार ता. १५ ते गुरुवार ता. ३१ ऑक्टोबर) दरम्यान ढगाळ वातावरण राहून वीज आणि गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील पावसाच्या दुसऱ्या आवर्तनात म्हणजे ता. २२ ते २६ ऑक्टोबर पाच दिवसांदरम्यान, या वर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाची शक्यता वाढली आहे. पावसाळी हंगामातील हे शेवटचे दुर्मीळ आवर्तन समजले जाते. हे आवर्तन ऑक्टोबरच्या दुसरा पंधरवडा कालावधीतच अंतर्भूत आहे. हे आवर्तन कदाचित नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही टिकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या वर्षी i) ‘ला-निना’चे विकसन किंवा ii) अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात, घसरणाऱ्या हवेच्या दाबातून होणारी चक्रीवादळाची बीज रोवणी किंवा iii) बंगालच्या उपसागरातून ५ ते २० अंश उत्तर अक्षवृत्त दरम्यान पूर्वेकडून तमिळनाडू, आंध्रच्या किनारपट्टीकडे वाहणाऱ्या मजबूत आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे वरील शक्यता निर्माण होताना दिसत आहे.
पिकावर होणारा परिणाम
पिकांची मुळे आणि नवीन लागवडीत रुजू घातलेल्या आणि नुकतेच अंकुरणाऱ्या प्रक्रियेतील बियाण्यांवर या पावसामुळे वेगाने घसरणाऱ्या मृदा आर्द्रतेतून परिणाम दिसतो.
पिकांना पाण्याची गरज भासू लागते. मशागत किंवा खुरपणीद्वारे जमिनीची जाड खपली फोडावी लागते, दुसरा पर्याय नाही किंवा हलक्या सिंचनाने ही जाड खपली मोकळी करावी लागेल. या पावसाद्वारे घडून येणाऱ्या आणि न समजणाऱ्या संकटापासून शेतकऱ्याची काहीशी सुटका होते. परंतु खरीप पिके काढणीलाही त्रास जाणवतो. द्राक्ष बागेत या पावसाचा परिणाम दिसू शकतो.
सध्या नुकताच आगाप पेर झालेल्या हरभरा, लाल कांद्याची रोपे, काही नवीन उन्हाळ गावठी हुळं टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या गोष्टीचा अनुभव येऊ शकतो. कारण मागील सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात टाकलेल्या कांदा रोपांचे २५ सप्टेंबर नंतरच्या पावसाने नुकसान झाले होते.
नवीन उन्हाळी गावठी कांदा रोपे करणाऱ्यांनी शक्यतो १२ ते १३ ऑक्टोबर नंतरच बी पेरावे. कारण १३ ऑक्टोबरनंतर जरी किरकोळ पाऊस झाला, तरी रोपे उताराला विशेष अपायकारकता जाणवणार नाही, असे वाटते. अर्थात, शेवटी निर्णय शेतकऱ्यांनी स्वतःच घ्यावा, कारण पुढे वेळेतील कांदा लागवड आणि पिकाला थंडीचा पुरेपूर फायदा घ्यावयाचा असेल तर कांदा बियाणे वेळेत टाकणे या स्थितीत तितकेच महत्त्वाचे आहे. उघडिपीची वाट बघणे आणि नंतर वाफशाचा अभाव किंवा कडक जमिनीमुळे दुबार मशागत या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
विदर्भ, उर्वरित मराठवाडा क्षेत्रात पडणारा पाऊस हा आजमितीला किरकोळ स्वरूपाचाच जाणवतो. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी परिस्थितीनुसार शेतीकामाचा निर्णय घ्यावा.
माणिकराव खुळे,
९४२३२१७४९५. (ज्येष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.