Maharashtra Rain Alert : पुढच्या पंधरवड्यात पाऊस कसा राहील? उद्यापासून राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज

Rain Forecast : राज्यात १२ ऑक्टोबरपर्यंतच्या सप्ताहात पावसाची शक्यता नव्हती. परंतु अरबी समुद्रात केरळ किनारपट्टीसमोर चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीतून कमी दाबाची क्षेत्र निर्मिती झाली.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात १२ ऑक्टोबरपर्यंतच्या सप्ताहात पावसाची शक्यता नव्हती. परंतु अरबी समुद्रात केरळ किनारपट्टीसमोर चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीतून कमी दाबाची क्षेत्र निर्मिती झाली. तसेच त्याची किनारपट्टी समांतर उत्तरेला गुजरातपर्यंतच्या मार्गक्रमणामुळे ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

श्री. खुळे म्हणाले की, विशेषतः ९ व १० ऑक्टोबरला संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात तर १० व ११ ऑक्टोबरला खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अश्या १० जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकणात व मराठवाडा अश्या १५ जिल्ह्यात मात्र तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाचीच शक्यता जाणवते.

Rain
Return Monsoon : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; माॅन्सूनचा परतीचा प्रवास दोन दिवसांपासून पुन्हा थबकला

परतीच्या माॅन्सूनविषयी बोलताना श्री. खुळे म्हणाले की, शनिवारी ५ ऑक्टोबरला परतीच्या वाटेवरील माॅन्सून केवळ महाराष्ट्र राज्याच्या उंबरठ्यावर म्हणजे नंदुरबारपर्यंत येऊन उभा ठाकला. आज ५ दिवस झाले अजुन तो नंदुरबारमध्येच उभा आहे. अर्थात येत्या २-३ दिवसांत कदाचित तो महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाटचाल करेल असे वाटते. तसे झाले तर ९ ते १३ ऑक्टोबरच्या आवर्तनात संयोगातून संवहनी प्रणालीद्वारे पडणारा हा पाऊसच खरा परतीचा पाऊस ठरु शकतो.

या आवर्तनात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण फारसे नसले तरी पडणारा पाऊस धोपटणी स्वरूपाचा व जमिनीला जाड कडक खपली आणणारा असतो. ह्यामुळे शेतजमीन पृष्ठभागाची रंद्रे बंद होते. ऑक्टोबर हिटमुळे दिवसा तापलेल्या जमिनीतील उष्णता रात्री बाहेर पडण्यास त्यामुळे अटकाव तयार होतो. तापलेल्या जमिनीत संक्रमणित झालेली उष्णता बाहेर न पडता जमिनीतच कोंडून राहते. परिणामी, ह्या दरम्यानच्या काळात उभ्या असलेल्या शेत पिकांना ही अवस्था अपायकारक ठरु शकते.

Rain
Maharashtra Rain Forecast : पावसाचा जोर कमीच राहणार; माॅन्सूनचा परतीचा प्रवास आजही थबकलेला

उभ्या असलेल्या पिकांची मूळे व नवीन लागवडीत रुजू घातलेल्या व नुकतेच अंकुरणाऱ्या प्रक्रियेतील बिजांनां ह्या पावसामुळे वेगाने घसरणाऱ्या मृदा आर्द्रतेतून शेतपिकांना आघात पोहचतो. शेतपिकांना पाण्याची गरज भासू लागते. मशागत अथवा खुरपणी द्वारे ही जमिनीची जाड खपली फोडावीच लागते. किंवा हलकेशा सिंचनाने ही जाड खपली ढिली करावी लागते. तेव्हाच ह्या पावसाद्वारे घडून येणाऱ्या व न समजणाऱ्या संकटापासून शेतकऱ्याची काहीशी सुटका होते. परंतु खरीप पिके काढणीलाही त्रास जाणवतो. फ्लॉवरिंग मधील द्राक्षे बागांची झड व पोंग्यातील बागांतील कोंबांना ह्या झोडपणी पावसामुळे इजा पोहोचू शकते.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात शक्यतो ऑक्टोबरची तीव्र हिट अनुभवली जाते. परंतु ह्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ते नरक चतुर्दशी अर्थात १५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ढगाळ वातावरण राहून वीजा व गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

त्यातही ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील पावसाच्या दुसऱ्या आवर्तनात म्हणजे दि. २२ ते २६ ऑक्टोबर पाच दिवसादरम्यान पावसाची शक्यता वाढली आहे. पावसाळी हंगामातील हे शेवटचे दुर्मिळ आवर्तन समजले जाते. आणि हे आवर्तन ही ह्याच ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवडा कालावधीतच अंतर्भुत आहे. हे आवर्तन कदाचित नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही टिकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारण ह्या वर्षी i)'ला-निना' चे विकसन किंवा ii)अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात, घसरणाऱ्या हवेच्या दाबांतून होणारी चक्रीवादळाची बीज रोवणी किंवा iii) बंगालच्या उपसागरातून ५ ते २० डिग्री उत्तर अक्षवृत्त दरम्यान पूर्वेकडून तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे वाहणाऱ्या मजबूत आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे ही शक्यता निर्माण होताना दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com