Women Farmer
Women Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

women Farmer : कष्टकरी स्त्रियांच्या समस्या जाणून घेऊया

टीम ॲग्रोवन

आजच्या एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा सक्रिय सहभाग आहे आणि त्याचे कौतुक देखील केले जाते. यावरून पिढ्यान् पिढ्या एका क्षेत्रात स्त्रियांचा मोठा सहभाग असूनही त्यांचे विशेष समारंभपूर्वक, सर्वजणींना एकत्र बोलावून काही कार्यक्रमांतर्गत फारसे कौतुक केले जात नाही. अशा शेतकरी महिलांचा जाणीवपूर्वक सत्कार सोहळा करून भेटवस्तू देणे त्यांच्या कामाला दाद देऊन कौतुक करणे असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून केंद्र सरकारने (कृषी मंत्रालय) २०१७ मध्ये १५ ऑक्टोबर हा प्रतिवर्षी ‘राष्ट्रीय महिला शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले होते.

शेतात अधिकतर प्रमाणात महिला काम करतात. स्वतःच्या शेतात तर त्या राबतातच, शिवाय इतरांच्या शेतातही आळीपाळीने ठरवून कामाला बोलावणे येते. ते त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आहे. एक स्त्री शेतीच्या कामात कसे मोठे काम करते हे मागीलवर्षी श्रीमती राहीबाई सोमा पोपरे यांनी पद्मश्री पुरस्कार घेऊन सर्व जगाला दाखवून दिले आहे. राहीबाईंचे काम खूप मोलाचे मोठ्या कष्टाचे आणि जिकिरीचे आहे. सर्व प्रकारच्या देशी वनस्पतीच्या बियांची जपणूक करून, त्यांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनासह त्या बिया पुरवतात. त्यांचे घर म्हणजे बियांची बँक म्हटले जाते. राहीबाई यांना ‘बियांची माता’ अशी अर्थपूर्ण पदवी दिलेली आहे. जगभर त्यांची ओळख ‘सीड मदर’ अशी झालेली आहे. त्यांच्या बरोबर देखील खूप महिला काम करतात.

बायकांना खूप काही नको असते, थोडक्यात त्या आनंद मानतात. दोन वेळेचे जेवण आणि चार आपलेपणाचे शब्द तिला सुखी ठेवायला पुरतात. तिची दखल दिल्लीच्या सरकारने घेतली ही नक्कीच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. त्यातूनही स्त्रीवर्गाच्या समस्या सोडविताना अग्रेसर भूमिका घेतलेली दिसते. घरोघरी स्वयंपाकाचा गॅस आला. शौचालये बांधल्याने बायकांची होणारी कुचंबणा थांबली. किती दिलासा मिळाला असेल प्रत्येकीला याला शब्दात मांडणे अशक्य आहे.

अशाच खेडोपाडीच्या कष्टकरी स्त्रियांना त्यांचे कोडकौतुक करताना या विशेष दिनी बरेच काही करता येईल. त्यांच्या समस्या काय हे जाणून घ्यायला पाहिजेत. कशाकशाची गरज आहे, काय त्रास आहे, कशाने बरे वाटेल, असा संवाद करायला हवा, त्यावर उपचार आवश्यक आहेत. त्रासातून सुटका महत्त्वाची आहे. त्यासाठी विचारपूर्वक दिशा आखणी देखील करता येईल.

स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. त्या घरातल्या सगळ्यांचे इतके काही करतात, पण त्याचवेळी स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. म्हणून त्यासाठी विशेष डॉक्टरांना निमंत्रित करून महिलांच्या सर्वप्रकारे तपासण्या, डॉक्टरांशी संवाद आणि पुढे त्यानुसार करावयाचे योग्य उपचार हे सर्व गावातील स्त्रियांना मुलींना दिले गेले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी शेतकरी संघटना असते, पतपेढ्या, सहकार पेढी, शेती सोसायट्या अशा सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या संस्थांनी याची काही सोय केली तर उत्तमच होईल.

खेड्यातून उठून पुरुषवर्ग मोठ्या संख्येने शहराकडे येत आहे. खेड्यातील पसारा आवरायला कारभारीण बघत असते. तो मोठ्या गावात कमवून घरी पैसा धाडीत राहतो. तरुणाईला तर शहराचे आकर्षण भारी. शिक्षण त्यापाठोपाठ नोकरी मग छोकरी असे करीत संसार मोठ्या शहरात थाटला जातो. शिवाय शेतकरी पुरुषाला खेड्यात मुलगी देखील लवकर मिळत नाही, याची जाणीव झालेले तरुण लवकरच शहराची वाट धरायला बघत असतात. या चित्राला काळी किनार आहे. आपल्या काळ्या मातीची काळजी घेण्यास शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्या कितपत तयार आहेत? हा प्रश्न अनुत्तरित आहे. यामध्ये सुधारणा अत्यावश्यक तसेच प्राधान्याने विचार करण्याची निकड आहे. थोडे विचारमंथन या निमित्ताने करू शकता.

शेतकरी स्त्रियांच्या संघर्षात विविधता आहे. मूलतः शेती करणारी स्त्री कुठल्या परिस्थितीत शेती करते यावरूनही तिच्या कष्टाच्या पायऱ्या लक्षात येतील. एकटी शेती करते, नवरा नाही, तो व्यसनी आहे, वा शहरात नोकरीसाठी गेला आहे, आत्महत्या केली असेल तर आणखीन वेगळे स्वरूप तिच्या नशिबी येते. प्रत्येकीची कहाणी वेगळी असल्याने एकाच पट्टीत त्यांना मोजता येणार नाही.

शिवाय कागदोपत्री जमीन तिच्या नावावर असणे याला खूप महत्त्व असते. यासाठी ज्या स्त्रियांना सरकार दप्तरी हेलपाटे घालावे लागतात. त्यांच्या नावाने कागदपत्रे करण्यासाठी मोलाची मदत देऊ केली तर त्यांना खूप आनंद मिळेल. नावावर जमीन होण्यासारखी दुसरी मदत नाही. ती नाही म्हणून त्यांना अनेक ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागते. कर्ज प्रकरण, सरकारी अनुदान वाटप, सवलती, सबसिडी, अशा कामात अडथळे येतात. तेच नावावर जमीन झाल्यावर त्यांना बोलायला जागा मिळते.

आत्मविश्वास वाढतो, समाजात पत वाढते आणि धैर्य एकवटून ती शेतात राबते. तिची जिद्द, कष्ट, खंबीरपणा, चांगुलपणा, जिवाचा आटापिटाकरून ती घर, शेती आणि घरातली मोठी माणसे व मुलांना, गुरंढोरं, कुत्री मांजरे, अशा सगळ्यांना एकटी चांगले सांभाळते. हे कौतुकास्पद असते. अशा महिलांना पाठिंबा मदत, मार्गदर्शनाची गरज आहे. जमीन नामावर करणे हे म्हणून महत्त्वाचे आहे. यासाठी देखील महिला दिनी कार्यक्रमात जागा ठेवावी. खूप चांगले होईल.

शेतकरी उत्पन्न २०२२ मध्ये दुप्पट करायचे यासाठी सरकार दप्तरी अनेक योजना आहेत. त्या सर्वच्या सर्व योजनांचा फायदा महिला शेतकऱ्यांना मिळायला हवा. काय सुविधा आहेत यांची माहिती त्यांना यानिमित्ताने करून द्यावी. तसेच बँकांच्या विविध कर्ज योजनांची माहिती द्यावी. खरं तर, महिलांना बहुतेक सर्व बँका अर्धा ते एक टक्के इतक्या कमी दराने विशेष अशी काही कर्ज देतात.

अशीच कर्जाची सोय शेतकरी महिलांनाही हवी. कर्ज प्रकरणांत शुल्क माफी हवी, शिवाय इतर काही सवलती त्यांना देता येतील का, यावर विचार करायला हवा. एखादी विशेष योजना जरी जाहीर केली गेली खासकरून या सर्व शेतकरी स्त्रियांसाठी तर तिचे स्वागत होईल. बँकेला व्यवसाय मिळेल. एक लक्षात घ्यावे महिला कर्ज फेडतात, हे महिला बचत गटाने दाखवून दिलेले आहे.

सणासुदीला महिला फेर धरतात, गाणी गातात, झिम्मा, फुगडी तर त्यांना आवडते. असेच खेळ कार्यक्रमात खेळायला मिळावेत अशी सोय करावी संयोजकांनी. गाण्याच्या भेंड्या, भजन, कीर्तन, कविता सादरीकरण, उखाणे, नाट्यछटा, एकपात्री, रांगोळी, नृत्य, अशा एक ना अनेक गमतीजमती घेऊन आनंद लुटावा. मज्जा येईल, एकत्रित आल्याने देवाणघेवाण होईल, असे कार्यक्रम जरूर ठेवावेत. त्याचबरोबर त्यांना काही भेटवस्तू देण्यात याव्यात त्याने त्यांचा आनंद द्विगुणित होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT