World Mental Health Day Agrowon
ॲग्रो विशेष

World Mental Health Day : मानसिक आरोग्य समस्यांबाबत जागरूक होऊयात...

Team Agrowon

विनायक हेगाणा

Mental Health Day October 10 : जागतिक मानसिक आरोग्य संघटनेने १९९२ साली सुरू केलेल्या जागतिक मानसिक आरोग्य दिवसाचा उद्देश मानसिक आजारांबद्दलची जागरूकता वाढवणे, त्याचबरोबर या समस्यांना कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा प्रचार करणे हा आहे. मानसिक आजारांच्या संदर्भातील भीती आणि गैरसमज दूर करून, लोकांना या समस्यांवर उघडपणे बोलण्यास प्रेरित करणे हा या दिनाचा उद्देश आहे.

भारतामध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी अनेक सरकारी आणि खासगी संस्थांमार्फत विविध कार्यक्रम राबवले जातात. भारतीय समाजामध्ये अद्याप मानसिक आजारांना स्वीकारण्याची कमी तयारी असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. भारतात मानसिक आरोग्यासाठी असलेल्या सेवांचा अभाव आणि लोकांमध्ये असलेल्या गैरसमजामुळे मानसिक ताण तणावाच्या समस्या वाढत आहेत.

मानसिक आरोग्याचे महत्त्व

मानसिक आरोग्य हे शेती व्यवसायाच्या यशस्वितेवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. मानसिक आजारांमुळे शारीरिक श्रमांची कमी क्षमता, निर्णय घेण्यातील त्रुटी आणि शेतीतील उत्पन्न कमी होऊ शकते. यामुळे लोकांची मानसिक स्थिरता टिकवणे आवश्यक आहे.

मानसिक आरोग्य हे सामाजिक, आर्थिक, आणि शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तणावग्रस्त लोकांना मानसिकदृष्या सशक्त करण्यासाठी तणाव व्यवस्थापनाचे तंत्र शिकवणे, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे, आणि सामाजिक पातळीवर एकत्र येऊन चर्चा करणे महत्त्वाचे आहे. सरकार आणि विविध संस्था या समस्येला गांभीर्याने घेतील, तेव्हा लोकांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येतील.

ग्रामीण भागांत आत्महत्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. याचे मुख्य कारण आर्थिक संकट, अपुऱ्या पावसामुळे कमी झालेली शेती उत्पादकता आणि कर्जबाजारीपणा. सरकारच्या अनेक योजना आणि प्रयत्न असूनही लोकांमध्ये मानसिक ताण कमी झालेला नाही. महाराष्ट्रात मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकार, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला आहे.

तणाव व्यवस्थापनाचे तंत्र शिकविण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी शिबिरे घेऊन लोकांच्यामध्ये तणाव कमी करण्याच्या अन्य पद्धती शिकवल्या पाहिजेत. ग्रामीण भागात मानसोपचार तज्ज्ञांची सेवा पुरविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक संस्था एकत्र काम केले पाहिजे. शेतकऱ्यांना शाश्वत मदतीच्या विविध योजना राबवून शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

शेतकऱ्यांना पीकविमा, अनुदान आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जागरूक केले जात आहे. या योजनांचा योग्य प्रकारे वापर करून शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होऊ शकतो, ज्यामुळे मानसिक स्थिरता राखता येते.

ग्रामीण भागात सामाजिक समर्थन गट तयार करून त्यांना त्यांच्या समस्या एकमेकांशी वाटून घेण्याची संधी दिली जाते. सामूहिक चर्चा केल्यामुळे मानसिक ताण कमी होतो.

शिवार फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु झालेली शिवार हेल्पलाइन ही शेतकऱ्यांसाठी आत्महत्येच्या प्रतिबंधासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांनी आजतागायत मदत, मार्गदर्शन, सल्ला,समुपदेशनासाठी प्रश्न सुटण्यासाठी विविध पद्धतीने संपर्क साधून त्यांच्या वैयक्तिक जीवनात सुधारणा केली आहे. या हेल्पलाइनद्वारे शेतकऱ्यांना तत्काळ मानसिक पाठबळ मार्गदर्शन व तज्ज्ञांचा सल्ला दिला जातो, जेणेकरून तणावग्रस्त व्यक्ती आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाकडे न जाता मदत मिळवू शकते.

सेंटर फॉर फार्मर्स मेंटल हेल्थ

हे केंद्र शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांवर लक्ष केंद्रित करते. हे केंद्र शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासह कृषी क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी उपाय शोधण्यासाठी संशोधन, धोरणे, आणि अंमलबजावणी आधारित उपाय सांगण्याचा प्रयत्न करते. या केंद्राची स्थापना महाराष्ट्रामध्ये करण्यात येत असून नंतर हे केंद्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारले जाण्याचे उद्दिष्ट आहे.

संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेशी सहकार्य करून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्य आणि कल्याणावर काम करणे हा या केंद्राचा उद्देश आहे. हे केंद्र ग्रामीण भागातील प्रश्नांकडे शेती, सामाजिक प्रश्न आणि मानसिक आरोग्य या त्रिसूत्रीतून पहात आहे.

मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता

जगभरातील शेतकरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. अनेक देश, विशेषत: ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशात शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्याची गंभीर समस्या ओळखून, त्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. शेतकऱ्यांचे जीवन हे प्रचंड तणावपूर्ण आहे. नैसर्गिक आपत्ती, उत्पन्नाच्या असुरक्षा, आर्थिक कर्जे, कमी उत्पादकता आणि समाजातील उपेक्षा यामुळे मानसिक ताणतणाव वाढत असतो. विशेषत: आत्महत्या हा शेतकऱ्यांमध्ये एक गंभीर मुद्दा आहे, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

मानसिक आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नैसर्गिक आव्हाने, बाजारभावातील चढ-उतार, कर्जबाजारीपणा, आणि सरकारी योजनांच्या लाभाची अनुपलब्धता यामुळे शेतकरी गंभीर मानसिक आरोग्य समस्यांना तोंड देतात.

सध्या मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विविध संस्था काम करत आहेत. ग्रामीण भागात तज्ज्ञांचे सल्ला व उपचार मिळण्यासाठी केंद्र उघडले जात आहेत, तसेच मानसिक तणाव व्यवस्थापनासाठी ग्रामीण भागातील लोकांना विशेष मार्गदर्शन दिले जाते. भारतातील काही राज्ये, जसे की महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर विशेष कार्यक्रम राबविले जात आहेत.

ऑस्ट्रेलियासारख्या देशात ग्रामीण भागातील लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबविले जातात.यामध्ये शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी खास तज्ज्ञांचा सल्ला दिला जातो. अमेरिकेत ‘फार्म एड' सारख्या संस्थांनी शेतकऱ्यांच्या तणावावर जागरूकता आणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

विनायक हेगाणा, ७३७८७९९७११ (लेखक ‘सेंटर फॉर फार्मर्स मेंटल हेल्थ’संस्थेचे संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

Crop Insurance : शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा

Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT