Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात दोन महिन्यांत बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून हे बिबटे शेतकऱ्यांच्या जनावरांचा फडशा पाडत आहेत. शेतकरी रात्री शेतात जाण्यास धजत नसून अचानक तीन बिबटे बाहेर येण्याचे कारण वन विभागाला उमजले आहे. येडशीच्या अभयारण्यात वाघ आल्याने त्याच्या भीतीने बिबटे रानशिवारात बाहेर पडल्याचा निष्कर्ष विभागाने काढला आहे.
दरम्यान येडशीच्या अभयारण्यातून वाघोबा आता कारी (नारी, ता. बार्शी) शिवारात गेला असून या भागात वाघाच्या पावलांचे ठसे वन विभागाला आढळून आले आहे. बार्शीच्या दिशेने गेलेला वाघ परत येणार नाही किंवा येईल, या बाबत वन विभागाला अजूनही अंदाज बांधता येत नसल्याची स्थिती आहे.
सध्या एका बिबट्याने तुळजापूर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वी अपसिंगा कामठा शिवारात तर बुधवारी (ता. २५) कात्री शिवारात बिबट्याने लागोपाठ दोन वासरांना ठार केल्याची घटना घडली. जिल्ह्यात चार दिवसांपासून वाघ आणि बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे शेतीशिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्यापूर्वी परंडा व भूम तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला होता. बिबट्यांनी वासरांना लक्ष्य केले होते. यामुळे शेतकरी शेतात जाण्यास धजत नव्हते. रात्रीच्या वेळीच बिबट्यांकडून वासरांवर हल्ले सुरू होते. परंडा व भुमनंतर तुळजापूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला. लागोपाठ घटनांमध्ये वासरांचा फडशा पाडला.
तुळजापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एस. पचरंडे यांच्या नेतृत्वाखालील वनविभागाच्या पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी सापळे लावत गस्तही सुरू केली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातही बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे बिबटे वनक्षेत्रातून बाहेर आलेच कसे, असा प्रश्न वन विभागाला पडला होता. येडशी अभयारण्यात वाघाचे दर्शन झाल्यानंतर वन विभागाला त्याचे उत्तर सापडले. वाघ आल्यामुळेच त्याच्या भीतीने बिबट्यांचा वावर वाढल्याचा निष्कर्ष वन विभागाने काढला आहे.
येडशी अभयारण्यातून वाघ आता सोलापूर वन विभागाच्या हद्दीत कारी शिवारात गेला आहे. त्या भागात वाघाच्या पावलाचे ठसे आढळून आले आहेत. सोलापूर वन विभाग त्याच्या हालचालीवर नजर ठेवून आहे. धाराशिव वन विभागाच्या हद्दीत पुन्हा तो येण्याची शक्यता गृहीत धरून वन विभागाने त्याच्या हालचालीवर नजर ठेवून उपाययोजना करण्याची तयारी ठेवली आहे.किशोर पोळ, विभागीय वनअधिकारी, धाराशिव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.