Marathi Mother Tongue Agrowon
ॲग्रो विशेष

Marathi Language : मातृभाषेत शिका, बहुभाषकही व्हा

Marathi Mothertongue : नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला आहे. याच धोरणात इंग्रजी, संस्कृत व भारतीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन देऊन बहुभाषिकतेला देखील महत्त्व दिले आहे.

Team Agrowon

शिवाजी काकडे

Learn Marathi Language : सध्या देशात पेरणीपूर्व कामांची लगबग सुरू आहे. तशीच शाळापूर्व तयारी देखील सुरू आहे. शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे दिवस आहेत. पीक चांगले यावे यासाठी शेतकरी कृषिनिविष्ठा निवडताना काळजी घेतो. आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल घडावे यासाठी मुलांची शाळा आणि माध्यम निवडताना पालक काळजी घेतात. आपल्याकडे जर दोन पैसे असतील तर मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष नको म्हणून पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल वाढत आहे.

ज्ञानभाषा, उच्चशिक्षण व रोजगाराची संधी यामुळे पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे ओढा आहे. परंतु मुलांना ना धड इंग्रजी येते ना मराठी. गणितातही प्रगती नाही. अशी काहीशी मुलांची परिस्थिती आहे. त्यामुळे इंग्रजी शाळेतून मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांचीही संख्या वाढत आहे. मुलांच्या शाळेचे माध्यम कोणते असावे यावरून पालकांमध्ये बराच गोंधळ आहे.

शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे की इंग्रजी यावरून कुटुंब, शेजारी आणि समाजपातळीवर चर्चा, वादविवाद सुरू आहेत, वेगवेगळे मतप्रवाहही आहेत. ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे महत्त्व कितीही असले, तरी प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतूनच झाले पाहिजे, असे संशोधनाचे निष्कर्ष सांगतात.

मातृभाषेतून शिक्षण, प्रगतीचे लक्षण
नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला आहे. किमान पाचवीपर्यंत मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून शिक्षण उपलब्ध करून द्यावे आणि शक्य झाल्यास आठवीपर्यंत असे शिक्षण उपलब्ध करावे, अशी शिफारस धोरणात केली आहे. याच धोरणात इंग्रजी, संस्कृत व भारतीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन देऊन बहुभाषकतेला देखील महत्त्व दिले आहे.

एखादी भाषा शिकविण्यासाठी आणि शिकण्यासाठी ती शिक्षणाचे माध्यम असणे आवश्यक नाही. भाषेतून शिकणे आणि भाषा शिकविणे यात लोक घोटाळा करतात. यातून मग मुलांचे इंग्रजी सुधारावे यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचे हा विचार पुढे येतो. परंतु इंग्रजी भाषा येण्यासाठी संपूर्ण शिक्षणच इंग्रजीतून घेण्याचा घाट घालणे कितपत व्यवहार्य आहे हेही तपासणे गरजेचे आहे.

मातृभाषेचे आपल्या जीवनातील स्थान खूप महत्त्वाचे आहे. ही भाषा संपादनाचा प्रवास गर्भापासून सुरू होतो. ती नैसर्गिकपणे शिकली जाते. त्यामुळे ती सहजशिक्षणाचे माध्यम आहे. मुलांचे स्वभाषेतून आकार घेणारे विश्व आणि शाळेतून मिळणाऱ्या ज्ञानाचे विश्‍व यांचा सांधा जुळला पाहिजे. यासाठी स्वभाषेतून शिक्षण आवश्यक आहे. मुलांमध्ये उपजत जिज्ञासू वृत्तीतून शिकण्याची, विचार करण्याची क्षमता असते. मुलांची बोलण्याची, विचार करण्याची व शिकण्याची भाषा एकच असेल तर शिकणे आनंददायी होते.

ज्ञान घेण्याची ओढ उत्पन्न करणे आणि ज्ञान ग्रहण करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी मातृभाषेतील शिक्षण उपयोगी ठरते. विचार करणे, विश्‍लेषण करणे, निर्णय घेणे या क्षमता विकसित होतात. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने मुलांची आकलनशक्ती विकसित व मजबूत होते. विचार, कल्पना, व भावना नैसर्गिकपणे मांडल्याने सहज शिक्षण होते. मातृभाषेतून मिळणारे शिक्षण हृदयापर्यंत पोहोचते तर अन्य भाषेतील फक्त मेंदूच्या पातळीपर्यंत राहते. अनेक इंग्रजी शाळेत मातृभाषेतून बोलण्यास बंदी असते.

यातून मुलांचा भावनिक विकास खुंटतो. मातृभाषेतून मुले अधिक चांगल्या प्रकारे आपल्या भावना, विचार, अभिव्यक्त करू शकतात. केवळ इंग्रजी शिक्षणातून कोरड्या मनाची, कोरड्या हृदयाची पिढी तयार होत आहे. अशी मुले ना उत्तम संवाद साधू शकतात ना लेखन करू शकतात. मुलांमध्ये संवाद कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांचे शिक्षण स्वभाषा, स्थानिक भाषा यातून होणे गरजेचे आहे. जी मुले मातृभाषेतील भाषिक कौशल्य चांगल्या प्रकारे आत्मसात करतात ते मुले इतरही भाषा चांगल्या प्रकारे शिकू शकतात.

प्रेम, आपुलकी, राग, विचार, कल्पना, भावना व्यक्त करण्यासाठी मातृभाषा हेच प्रभावी माध्यम असते. ज्ञानार्जनाचे साधनच भाषा आहे. शिक्षण ही जग समजून घेण्याची, स्वतःला अर्थपूर्ण रीतीने अभिव्यक्त करण्याची प्रक्रिया असेल तर भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उत्तम भाषिक विकास असणारे विद्यार्थी वेगाने शिकणारे विद्यार्थी म्हणून नावारूपाला येत असतात. शैक्षणिक यशापयशातही भाषा महत्त्वाची असते. म्हणून शैक्षणिक अपयश हे मूलतः भाषिक अपयश आहे असे म्हटले जाते. यासाठी अगोदर मातृभाषेचा पाया पक्का हवा.

परिसरातील विविध घटकांचा मुले मातृभाषेतून विचार करतात. इतिहास, भूगोल, विज्ञान, गणितीय क्रिया मुलांना मातृभाषेतून चटकन कळतात. ‘फाइव्ह फायजा ट्वेन्टीफाय’ म्हणण्यापेक्षा मुले पाचा पाचा पंचवीस लवकर शिकतात. इंग्रजीतील कठीण शब्द, संकल्पना यांचा मुलांच्या मनावर ताण येतो. बऱ्याचदा मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. मुले चिडचिड करतात. याउलट मातृभाषेत शिक्षण असेल तर मुलांचा आत्मविश्‍वास उंचावतो. आई- वडिलांना इंग्रजी येत नसेल तर ते मुलांना अध्ययन प्रक्रियेत मदत करू शकत नाहीत.

मुलांनाही स्वयंअध्ययनाला मर्यादा येतात. महाराष्ट्रात बहुसंख्य लोक मराठी भाषा बोलणारे आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांबरोबर मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षणही मुलांसाठी उपयोगी आहे. फॅशन म्हणून किंवा केवळ सामाजिक प्रतिष्ठा म्हणून पालकांनी मुलांचा विचार न करता सरसकट इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणे ही एक गंभीर चूक ठरू शकते. मातृभाषेतील शिक्षण हे पुढील शैक्षणिक प्रगतीत अडथळा नाही तर पूरक आहे. पालकांनी आपल्या मुलांचा नक्कीच मराठी शाळेत प्रवेश घ्यावा. जगभरात मातृभाषेतील शिक्षण हे प्रतिष्ठेचे आणि प्रगतीचे लक्षण समजले जाते.

बहुभाषकही व्हा

आंतरराष्ट्रीय दळणवळण, तंत्रज्ञान यामुळे जग हे ग्लोबल खेडे झाले. परदेशातील शिक्षण, नोकरी, परदेश प्रवास, आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार, राजकीय, सामाजिक संबंध यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आपले मूल हे केवळ भारताचे नागरिक नाही तर ते जन्मतःच जगाचे देखील नागरिक आहे. जागतिक स्वीकार्यता मिळविण्यासाठी बहुभाषक होणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणाच्या संधी इंग्रजी भाषेतून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. तंत्रयुगात इंग्रजीचे महत्त्व नाकारता येणार नाही.

त्यामुळे इंग्रजी भाषा शिकण्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. मराठी शाळांनी इंग्रजीकडे तर इंग्रजी शाळेने मराठी शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे. याबरोबरच भारत हा बहुभाषक देश आहे. भारतीय भाषाही मुलांनी शिकाव्या. संस्कृत, पाली या भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान उपलब्ध आहे.

पालकांनी, शाळांनी या भाषाही आपल्या मुलांना याव्यात यासाठी प्रयत्न करावे. यू-ट्यूब, भाषेची ॲप याच्या साह्याने अनेक उपक्रमशील जिल्हा परिषद शाळा मुलांना जपानी, स्पॅनिश व वेगवेगळ्या परदेशी भाषा शिकवत आहे. आपल्या मुलांची आवड, क्षमता पाहून शाळांनी, पालकांनी मुलांना बहुभाषक होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. मातृभाषेत शिक्षण घेऊन बहुभाषक व्हा. शिक्षणाचे माध्यम, बोर्ड निवडताना पालकांचा उडणारा गोंधळ थांबविण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढाकार घ्यावा.

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT