Pune News : आगामी काळात कांद्याला चांगले दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहे. लेट खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पीक बदल केला आहे. लेट खरीप कांद्याच्या बऱ्यापैकी लागवडी झाल्या आहेत.
राज्यात एक लाख ८२ हजार ३८४ हेक्टरवर लागवड झाली असून सर्वाधिक लागवड पुणे, नाशिक विभागांत झाली आहे. त्यामुळे कांद्याचे चांगलेच उत्पादन होण्याची शक्यता आहे, कृषी विभागाने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांची लागवड केली जाते. खरिपात म्हणजेच पावसाळी हंगामात कांद्याची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते. कांद्याची राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये लागवड केली जाते. राज्यात तीन हंगामांमध्ये शेतकरी कांदा लावतात.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याला बऱ्यापैकी चांगले दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर पिकांऐवजी कांदा पिकांकडे मोर्चा वळवला आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी कांदा, फळभाज्या, भाजीपाला पिके घेण्यावर भर दिला आहे. खरीप, लेट खरीप कांदा तीन ते चार महिन्यांत काढणीस येतो.
पाण्याचा ताण पडला, तरी हातात काहीतरी प्रमाणात उत्पादन हाती येईल या उद्देशाने अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळाले आहेत. शेतकरी वर्षभरामध्ये खरीप, लेट खरीप, रब्बी (उन्हाळी) हंगामात कांद्याची लागवड करतात. खरीप लेट खरीप हंगामातील कांदा लागवड ही जून ते ऑक्टोबर या कालावधीत केली जाते. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात नोव्हेबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये कांद्याची लागवड केली आहे.
राज्यात सर्वाधिक कांद्याची लागवड नाशिक जिल्ह्यात झाली आहे. सुमारे ५३ हजार ५४८ हेक्टरवर लागवड झाली आहे. तर नगर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाची लागवड झाली आहे. यामध्ये ५२ हजार ४९९ हेक्टरवर लागवड झाली आहे. यामध्ये श्रीगोंदा, कोपरगाव, राहुरी, नेवासा, कर्जत, राहाता, अकोले, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, नगर, पारनेर या तालुक्यांत कमीअधिक प्रमाणात कांदा लागवड झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, खेड तालुक्यांत बऱ्यापैकी लागवड झाली आहे. तर सोलापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी लागवड झाली असून बार्शी, मोहोळ, माढा, उत्तर, दक्षिण सोलापूर, करमाळा या तालुक्यांत बऱ्यापैकी कांदा लागवडी झाल्या आहेत. कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती विभागांत कमीअधिक लागवड झाली आहे.
जिल्हानिहाय झालेली कांदा लागवड, हेक्टरमध्ये :
नाशिक ५३,५४८, धुळे ५७५६, नंदुरबार १६७, जळगाव ४३२२, अहिल्यानगर ५२४९९, पुणे १६,५७४, सोलापूर २२,४१८, सातारा २२३७, कोल्हापूर २९, छत्रपती संभाजीनगर २२८८, जालना ३६०, बीड १०,६७५, लातूर ४४९, धाराशिव २०,४२९, परभणी ११९, हिंगोली १३, नांदेड २३७, बुलडाणा १२१, अकोला ५६, वाशीम ७७, चंद्रपूर ०.८०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.