Irshalwadi Landslide agrowon
ॲग्रो विशेष

Irshalwadi Landslide : तर माळीण, तळीये, इर्शाळवाडी वाचले असते

Team Agrowon

डॉ. नागेश टेकाळे

Heavy Rain : कोकणात दरडींचा धोका असणारी ५६६ गावे आहेत. इर्शाळवाडीचा दरड प्रवण मध्ये समावेश नव्हता. यावरून हेच अधोरेखित होते की सद्य परिस्थितीत सह्याद्रीच्या कुशीत वसलेले प्रत्येक गाव, वाडीवस्ती हे दरड प्रवण क्षेत्रात मोडत आहे.

‘इ र्शाळवाडीवर मृत्यूची दरड’, ’आणखी एका गावाला डोंगर समाधी’, ’दुःखाचे डोंगर’ यासारखे वृत्तपत्रामधील ठळक मथळे वाचले की वाटते या निसर्ग घटनेमागे दोष कुणाचा असावा? डॉ. माधवराव गाडगीळ यांचा पश्चिम घाटावरील अभ्यासपूर्ण अहवाल विकासकांच्या आर्थिक वज्रमुठीच्या भीतीने केंद्र शासनाने न स्वीकारणे आणि त्यास पर्याय म्हणून डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली हवा तसा पूरक अहवाल तयार करून घेऊन तो स्वीकारणे हे अशा घटनांमागचे मुख्य कारण आहे. डॉ. गाडगीळ यांनी म्हटले होते की या सर्व वाड्यांना वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीची संरक्षण ढाल फार दिवस टिकणार नाही. त्यांच्या ५२२ पानांच्या अहवालात या वाड्यांना पुढील तीन-चार दशकांत कसे वाचवता येईल, यासाठी त्यांनी निसर्गाबरोबर घेऊन कितीतरी साध्या सोप्या उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यांच्या या सूचनांचे त्याच वेळी पालन झाले असते तर दरड कोसळल्याने उध्वस्त झालेल्या माळीण, तळीये तसेच इर्शाळवाडीवर काळरात्र ओढवलीच नसती.

इर्शाळवाडी या छोट्या आदिवासी पाड्यामधील ४० घरे मध्यरात्री ढिगाऱ्याखाली गाडली गेली. इर्शाळवाडीत ४८ कुटुंबात २२८ जण राहत होते. त्यातील २७ जणांचे मृतदेह हाती आले असून ५७ जण अजूनही बेपत्ता आहेत. आता तर शोधमोहीम देखील थांबविण्यात आली आहे. १४४ जण सुखरूप असून त्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. पश्चिम घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली विकासकामे, स्थानिक वृक्षांचे धरणीमातेस आलिंगन, पायवाटांचे पक्क्या रस्त्यामध्ये झालेले रूपांतर, धबधब्यांचे सौंदर्य लुटण्यासाठी पर्यटकांची त्यांच्या वाहनासह होणारी गर्दी, रासायनिक खतांचा अतिवापर या आणि अशा विविध कारणांनी सह्याद्रीची सेंद्रिय माती खिळखिळीत झाली. मुसळधार पाऊस या मोकळ्या मातीत सहज मुरू लागला. वृक्ष तोडीमुळे मातीला धरून ठेवणारी वृक्षमुळे शिल्लकच राहिली नाहीत. मोकळी वन जमीन शेतीने ताब्यात घेतली. त्यात डोंगर, दरडी वृक्षाविना बोडके झाले, उघड्या मातीचा चिखल झाला आणि संततधार पावसात ही माती आधाराविना सैल होऊन खालच्या बाजूने घसरू लागली, तिच्यावर वरून मोठ्या ओल्या थराचा दाब पडतोय आणि यातून होणाऱ्या भूत्खलनात गावे गडप होत आहेत.

पश्चिम घाटामधील अकरा जिल्ह्यांतील पठारावर आणि पायथ्याला असलेल्या हजारो आदिवासी पाड्यांचा डॉ. गाडगीळ यांनी त्यांच्या अहवालात संपूर्ण आढावा घेऊन त्यांना संवेदनशील म्हणून जाहीर केले होते. या भागातील वृक्षतोड थांबवणे, डोंगर फोडणे-सपाटीकरणास बंदी, कुठेही माती उघडी ठेवू नका, जेथे वृक्ष नसेल तेथे घनदाट गवत लावा, रासायनिक खते वापरू नका फक्त सेंद्रिय शेतीलाच प्रोत्साहन द्या, अशा सूचना त्यांनी आपल्या अहवालात केल्या आहेत. पण या त्यांच्या सूचनांचे कुठेही पालन झाले नाही, होत नाही. निसर्गाचा कुठेही समतोल नाही. ५०-६० फूट मुळे जमिनीत खोल जाऊन मातीस धरून ठेवणाऱ्या पारंपरिक वृक्षांना कापून त्या जागी लावलेल्या आंबा, काजू सारख्या लहान वृक्षांकडून पूर्ण डोंगराचे संरक्षण आपण कसे अपेक्षित करणार? हा सर्व भूकंप प्रवण प्रदेश आहे. त्याच्या लहानशा सौम्य धक्याने सुद्धा जमिनीस नकळत तडे जातात नंतर हे तडे मोठे होतात आणि त्याचे रूपांतर इर्शाळवाडीसारख्या घटनेत होते.

हे सर्व थांबवण्यासाठी गाव परिसरात वृक्ष लागवडीबरोबर रासायनिक शेतीस बंदी हवी, दरडी, कडे यांचा नियमित अभ्यास हवा, प्रत्येक गावात ३-४ संरक्षक भिंती उभारून त्या खचत आहेत का? त्यांना तडे जात आहेत का? ते सातत्याने पाहावे. जानेवारीच्या पुढे अचानक गाव परिसरात जमिनीत ओल अथवा पाणी आढळते का? याची पाहणी करणे सर्व जबाबदारी प्रत्येक गावातील सुशिक्षित युवकास द्यायला हवी. त्यांना याबाबत योग्य प्रशिक्षण देऊन प्रत्येक महिन्यात त्यांच्याकडून माहिती मागवून त्यावर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास होणे गरजेचे आहे. गावकरी त्यांच्या गाव परिसरात अथवा वाडी भागात खाली वर कमीत कमी ८ ते १० कि.मी. फिरत असतो. त्याचे कळत-नकळत भौगोलिक निरीक्षण सुरू असते, प्रत्येक महिन्याच्या ग्रामसभेत या अशा स्थानिक लोकांना शासन प्रतिनिधींच्या उपस्थितीत बोलके केले तर सह्याद्री घाटामधील हजारो संवेदनशील गावे सुरक्षित राहतील.

दरड प्रवण गावे निर्माण होण्यास वृक्ष संहार जेवढा कारणीभूत आहे तेवढाच पॉपलर सारखा सरळ उंच वेगाने वाढणारा वृक्ष आपणास अशा गावावर येणाऱ्या संकटाची जाणीव करून देतो. प्रत्येक गाव अथवा वाडी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी असे पाच सहा वृक्ष मापदंड म्हणून लावावे. सरळ उंच वाढत असलेला हा वृक्ष जेव्हा एका बाजूस कलंडत असेल तर ती येणाऱ्या संकटाची चाहूल समजावी. कुठलीही दरड अचानक कोसळत नाही त्यासाठी तिची पाच सहा वर्ष तयारीत जातात. तिच्याकडून अनेक सूचना संदेश दिले जातात फक्त ते समजून, अभ्यासून त्यावर त्वरित उपाय योजना करायला पाहिजेत. डोंगर कपारीत शेकडो वर्षांचा इतिहास असलेली ही गावे केवळ दरड प्रवण क्षेत्र म्हणून स्थलांतरित करणे हा त्यावरचा कायमचा उपाय नाही. गायरान जमिनीचे संवर्धन, कुऱ्हाड बंदी, डोंगरामधील खाणकाम, सपाटीकरण थांबविणे, वृक्ष लागवड, सेंद्रिय शेती, जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनास गाव परिसरात बंदी, पारंपरिक शेतीला प्रोत्साहन हे साधे सोपे उपाय प्रत्येक गावास, वाडीस पावसाळ्यात सुरक्षित ठेवू शकतात.

कोकणात दरडींचा धोका असणारी ५६६ गावे आहेत. इर्शाळवाडीचा त्यात समावेश नव्हता यावरून एक कठोर सत्य अधोरेखित होते की सद्य परिस्थितीत सह्याद्रीच्या कुशीत वसलेले प्रत्येक गाव, वाडीवस्ती हे दरड प्रवण क्षेत्रात मोडत आहे. यांना वाचवायचे असेल तर धनदांडग्यांच्या विकासात लपलेल्या त्यांच्या गावावरच्या, वाडीवरच्या नकली प्रेमास गावकऱ्यांनी विरोध करावयास हवा. निसर्गाच्या धड्यांचे वाचन करताना यापुढे आपणास पाने उलटताना माळीण, तळीये आणि इर्शाळवाडीवरील अप्रिय धडे यापुढे समोर येतील, आपण या धड्यांची पाने उलटण्यापूर्वी त्यांचा सखोल अभ्यास करावा, कारणे शोधावी यावर स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करावी, ती मनापासून सोडवावी तरच तुम्हास पश्चिम घाटाचा राग समजला, असे म्हणता येईल.

डॉ. नागेश टेकाळे, ९८६९६१२५३१

(लेखक शेती-पाणी-पर्यावरण प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT