Kolhapur Keshavrao Bhosle Theater agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Keshavrao Bhosle Theater : केशवराव भोसले नाट्यगृहासह खासबाग मैदानाचे मंचही भीषण आगीत बेचिराख

Khasbag Maidan Fire : आग नाट्यगृहाच्या प्रेक्षक गॅलरीत पसरली होती. येथील आसनांसह शाहूकालीन खासबाग मैदानाचा मंचही पेटला.

sandeep Shirguppe

Kolhapur Khasbag Maidan Fire : कोल्हापूरच्या कलेचे दालन असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल(ता. ०८) रात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत बेचिराख झाले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आज (ता. ९) असताना झालेल्या या दुर्घटनेने नाट्यरसिकांसह तमाम कोल्हापूरकर हळहळले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्घटनेत नाट्यगृहाचे सुमारे ५० कोटींचे नुकसान झाले. घटनास्थळी आलेल्या अनेक कलाकारांसह करवीरवासीयांना अश्रू अनावर झाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यगृहाची पुन्हा उभारणी करण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. साडेनऊच्या सुमारास खासबाग मैदानाकडून लागलेली आग अवघ्या अर्धा तासात प्रेक्षक गॅलरीकडून पसरत गेली. आगीचे लोट छतापर्यंत पोहोचून सर्व छत क्षणार्धात कोसळले.

यासोबतच दोन्ही बाजूच्या भिंतींना तडे गेले. जनरेटरचा स्फोट झाल्याने एकच धावपळ उडाली. अग्निशमन दलाच्या सर्व विभागांचे बंब घटनास्थळी बोलाविण्यात आले. विमानतळावरील फायर फायटरनाही पाचारण करण्यात आले. लाकडी साहित्य, आसने, रंगमंचाने पेट घेतल्याने आगीचे लोट हवेत उंचावर पोहोचले होते.

ही बातमी वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरताच चारही रस्ते गर्दीने भरून गेले. परिणामी अग्निशमन दलाच्या कामात अडथळे आले. पोलिसांना लाठीमार करून जमाव पांगवावा लागत होता. राज्य शासनातर्फे संगीतसूर्य केशवराव भोसले जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. ९) सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत या कार्यक्रमाची तयारी महापालिका प्रशासन व नाट्यगृह कर्मचाऱ्यांकडून सुरू होती. साडेआठच्या सुमारास मंचावरील सर्व तयारी झाल्याने कर्मचारी बाहेर पडले होते.

रात्री साडेनऊच्या सुमारास शाहू खासबाग मैदानाच्या बाजूचे जनरेटर खोलीजवळ स्फोट झाल्याचा आवाज झाल्याचे खाऊ गल्लीतील तरुण धावत खासबाग मैदानाकडे आले. त्यांना खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने आग नाट्यगृहाच्या गॅलरीपर्यंत पोहोचल्याचे दिसले. आरडाओरडा करत त्यांनी बाहेरील नागरिकांना बोलावले. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पहिला बंब पोहोचेपर्यंत पंधरा मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग नाट्यगृहाच्या प्रेक्षक गॅलरीत पसरली होती. येथील आसनांसह शाहूकालीन खासबाग मैदानाचा मंचही पेटला.

साहित्य वाचविण्यासाठी धडपड

आग पाठीमागील बाजूने रंगमंचाकडे पसरत आली. आगीची माहिती मिळाल्याने नाट्यगृहाकडील कर्मचारी तातडीने घरातून घटनास्थळी आहे. समोरील दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. काहीजण ओक्साबोक्शी रडू लागले. रंगमंचामागील दरवाजा उघडून येथील काही खुर्च्या, साहित्य वाचविण्यासाठी खिडकीतून आत प्रवेश केला. हे साहित्य बाहेर काढण्यासाठी धडपड सुरू होती.

छताचा भाग कोसळला

गॅलरीतून उठलेले आगीचे लोट छतापर्यंत पोहोचू लागले. त्याने छताचा भाग जळण्यास सुरुवात झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडकी उघडण्याचा प्रयत्न करताच आगीचे लोळ बाहेर आले. आग सभागृहात पसरल्याचे लक्षात येताच जवानांनी वरिष्ठांना माहिती कळवली. दहाच्या सुमारास पाठीमागील प्रेक्षक गॅलरीचे छत कोसळून आगीचे लोळ आकाशाच्या दिशेने बाहेर पडले. बाजूच्या खिडक्यांमधून आगीसह धूर बाहेर पडू लागला होता.

सभागृहात जाण्याचा प्रयत्न

गॅलरीतील आग खालच्या मजल्यावर पसरली. आत जाणारा दरवाजा बंद असल्याने जवानांनी ते तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण आग पसरल्याने दरवाजातून आगीसह धूर बाहेर येत होता. ही धग वीस ते पंचवीस फुटांपर्यंत जाणवत होती. काही जवानांनी रंगमंचाच्या बाजूने आत प्रवेश केला. आत पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली; परंतु धुराचे लोट पसरल्याने अडथळा निर्माण झाला.

खासबागचा मंच व गॅलरी कोसळली

नाट्यगृहाच्या पिछाडीस असणारे खासबाग कुस्ती मैदानाचा मंच व गॅलरीही आगीच्या लपेट्यात आली. याचे उभे खांब एका पाठोपाठ जळून कोसळल्याने येथील कमान व गॅलरी कोसळली. मोतीबाग तालमीसह परिसरात मोठ्या संख्येने जमलेले पैलवान यावेळी पुढे जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांना विनवणी करत होते. ''साहेब आमच्याकडे पाण्याचा पाईप द्या, आमची दौलत वाचवा'' असे बोलत अनेकजण रडत होते.

स्फोटाचे आवाज अन् धावपळ

सभागृहात पसरलेली आग छतापर्यंत पोहोचून छत कोसळताच दोन वेळा स्फोटाचा आवाज झाला. सुरुवातीला नाट्यगृहाच्या आवारात आलेल्या बघ्यांची यावेळी धावपळ उडाली. पोलिसही तातडीने आल्याने त्यांना आगीचे रौद्ररूप पाहून परिसरातून सर्वांना हटकण्यास सुरुवात केली. या पाठोपाठ एसीसह आतील काही सिलिंडरचेही स्फोट झाल्याने भिंतींनाही तडे गेले.

अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावाधाव

प्रथम किरकोळ वाटणाऱ्या आगीने रौद्ररूप धारण केल्याचे समजताच अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे या प्रमुख अधिकाऱ्यांसह नाट्यगृहात काम करणारे सारे तसेच परिसरात राहणारे महापालिकेतीलही अनेक कर्मचारी घटनास्थळी जी काही मदत लागेल ते करत होते. पाण्याचे टॅंकर योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी सारे धावाधाव करत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT