Maharashtra Politics Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics: सभ्यतेचा न्याय कुणाकुणाला लावणार?

Kokate Controversy: सभ्यतेचा न्याय लावला तर कृषिमंत्री कोकाटे यांना जावे लागेल. हाच न्याय लावायचे म्हटले तर ४२ जणांच्या मंत्रिमंडळात रांग भली मोठी लागेल. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ या न्यायाने अनेक जण पदावर आहेत.

बाळासाहेब पाटील

Political Discussion: अधिवेशन संपता संपता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेच्या सभागृहात जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे प्रचंड बहुमतात असतानाही बदनामीला पावलोपावली सामोरे जाणारे सरकार तोंडावर पडले. एका बाजूला आर्थिक चणचणीचे दृश्य परिणाम राज्यासमोर येत असताना हिंसक आणि राज्याला लाज आणेल अशा कृत्यांनी सरकार पुरते बदनाम होत आहे. एकमार्गी सत्ताबळ असतानाही राज्यात इतके अस्थिर वातावरण का, असा प्रश्‍न महाराष्ट्रातील सुजाण नागरिक एकमेकांना सध्या विचारत आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार मागील अडीच वर्षांपासून धुमाकूळ घालत आहेत. त्याचा मासलेदार नमुना आमदार निवासातील उपाहारगृहात वेटरला मारहाण करून संजय गायकवाड या आमदाराने दाखवला. दुसरे मंत्री संजय शिरसाठ यांनी पैशांच्या भरलेल्या बॅगांचे दर्शन अख्ख्या महाराष्ट्राला घडविले. तसे त्यांना आपल्या श्रीमंतीचे दर्शन आणि प्रदर्शन करण्याचा मोह आवरत नाही. पावसाळी अधिवेशन काळात हे दोन व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले आणि शिंदे गटाला लोकलज्जेस्तव का असेना तोंड लपवावे लागले.

अखेर त्यांच्या मदतीला भाजपचे बोलभांडगिरी करणारे आमदार गोपीचंद पडळकर धावले. त्यांनी थेट विधान भवनाच्या लॉबीचा आखाडा केला. हे प्रकरण भाजपची नाचक्की करणारे ठरले असले, तरी मूळ भाजपवासीयांना आतून उकळ्या फुटल्या होत्या. परक्यांना घरात घेऊन घरातल्यांना कोनाड्यात नव्हे, तर परसदारातही बसू न देण्याची सध्या दिल्लीपासून मुंबईपर्यंत पक्षात संस्कृती रुजली आहे. त्यामुळे मूळ भाजपवासीय आता उघड बोलू लागले आहेत, हा भाग वेगळा! तर पडळकरांनी केलेल्या उठवळ कृतीमुळे भाजपची छी थू झाली, पण महायुतीलाही टीकेला सामोरे जावे लागले.

दोन पक्ष टीकेने हैराण झाले असताना त्यांच्या मदतीला धावले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे. भर सभागृहात मोबाइलवर पत्ते कुटणारे कोकाटे टीकेचे धनी झाले आणि सोबत राष्ट्रवादीलाही फटके सहन करावे लागले. या कृतीचा बचावात्मक सामना करावा लागणार हे पक्षाला माहीत होते. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर समजूतदारपणा येत होता, मात्र अलीकडे सत्तेची हवा डोक्यात भरलेल्यांकडे तो शहाणपणा दिसत नाही.

कोकाटे यांच्या प्रकरणावरून सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीमुळे या प्रकरणावर कळस चढविला. तो कमी होता म्हणून की काय, तर खुलाशाच्या पत्रकार परिषदेत कोकाटे यांनी सरकारच भिकारी आहे, असे सांगून त्यावर सोन्याचा मुलामा दिला. कोकाटे यांनी पदभार घेतल्यानंतर आधी विभाग समजून घेण्याचा प्रयत्न केला. विभागवार बैठका घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्‍न समजून घेत त्यावर काम सुरू केले. विभागातील सर्वच पातळ्यांवर कुठे त्रुटी आहेत हे समजून घेत त्यावर काम करण्यास त्यांनी दिलेले प्राधान्य कृषी विभागासाठी समाधानाची बाब आहे.

कोकाटे यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार कृषी आयुक्तांना दिल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कृषी विभागाचे विमान इंधन भरून उड्डाण करण्याच्या तयारीत असते, त्याच वेळी कृषिमंत्री असे काहीतरी बोलतात, की विमानाने उड्डाण भरण्याऐवजी ते आकस्मित लॅंड करावे लागते. त्यांनी केलेल्या काही चांगल्या कामांवर देखील तोंडाळ स्वभावामुळे पाणी फिरले गेले आहे.

कोकाटे फटकळ आहेत, स्पष्टवक्ते आहेत, हे सर्व मान्य असले, तरी त्यांनी आता आपण मंत्री झालोय हे समजून काम करणे गरजेचे आहे.सध्या सरकारमध्ये अधिकारी वरचढ आहेत. त्याचे प्रत्यंतर पावलोपावली जाणवते. अधिकारी सादरीकरण करतात आणि गुलाबी चित्र उभे करतात. त्यापलीकडे जाऊन मंत्र्यांनी स्वतःच्या आकलनाने विभाग चालवायचा असतो. मात्र अनेक मंत्री अधिकाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेत की काय, अशी शंका येते.

सध्या मंत्री कार्यालयांमध्ये ऊठबस पाहिली तर कंत्राटदारांचा राबता नजरेत भरण्यासारखा आहे. लोकांना काय हवे हे जाणून धोरणे आखण्यापेक्षा सोईची धोरणे आखली जात आहेत. त्यातील अनेक अंगलटही येत आहेत. या काळात कोकाटे यांनी राज्यभर फिरून शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या असतील तर ते कौतुकाचे आहे. मात्र हे सगळे निरर्थक ठरविण्यात त्यांचा वाचाळपणा कारणीभूत ठरतो आहे.

दिल्ली दौरा का फिस्कटला?

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचे उद्‍घाटन गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार जाणार होते. मात्र शिंदे पंढरपूर आणि अजित पवार मंत्रालयात होते.

पवार यांना महत्त्वाची कामे होती, तर एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान होणार होता. दोघांनीही ही कारणे देत दिल्ली दौरा टाळला. सर्व विभागांवर नजर ठेवणे आणि प्रत्येक फाइल मुख्यमंत्री कार्यालयातून पाठविण्याचे निर्देश, हेच नाराजीचे कारण आहे. एका बाजूला भाजपचे सर्वाधिक आमदार असतानाही शिंदे-पवार गट जड होत आहेत. त्यामुळे त्यांना काहीही करून आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा आटापिटा फडणवीस करत आहेत. तर या कचाट्यातून सुटून स्वतंत्र कारभार करण्याची धडपड या दोन्ही घटक पक्षांची सुरू आहे.

पवार गटाची कोंडी

धनंजय मुंडे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला बळी घेण्यात आला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मुंडे यांना भोवले. त्यानंतर आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अन्य घटकांनी मुंडे यांच्यावर कृषी विभागाशी संबंधित आरोप केले होते. हे आरोप आर्थिक गैरव्यवहाराचे होते, तसेच बदल्या आणि विभागातील काही संवेदनशील बाबींवर होते.

त्यामुळे मुंडे नव्हे तर त्याबरोबर राष्ट्रवादीचा अजित पवार गट पुरता बदनाम झाला. हा गट पुरेसा जेरीस आल्यानंतर मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. आताही तसेच घडत आहे. कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीची पुरती बदनामी होत आहे. दोन पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा होत असताना आणि रोहित पवार यांचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढली आहे अशी चर्चा असताना रोहित पवार यांनीच व्हिडिओ बाहेर काढला.

त्यामुळे अजित पवार यांना माध्यमांपासून दोन दिवस लांब राहावे लागले. कोकाटे यांचा राजीनामा घेतल्यास किंवा त्यांचे खाते बदलले तर ती राष्ट्रवादीची सरकारमधील पीछेहाट असेल. सध्या पक्षात दोन गट आहेत. एक गट राजीनाम्यासाठी तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे राजीनामा न देण्यावर आग्रही आहेत. जर कोकाटे यांनी राजीनामा द्यायचा तर तोच न्याय शिंदे गट आणि भाजपलाही लावला पाहिजे असा युक्तिवाद केला जात आहे.

: ९२८४१६९६३४

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: नियतीनेच तोडला थुट्टे कुटुंबाचा ‘भरवसा’

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढला

Kharif Sowing: खरीप पेरण्यांत बारामती उपविभाग अव्वल

Maharashtra Agriculture Minister: कृषिमंत्री कोकाटे खानदेश दौरा अर्धवट सोडून परतले

Agri Officers Support: कृषिमंत्र्यांच्या समर्थनासाठी कृषी अधिकारी सरसावले

SCROLL FOR NEXT