Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : खोडवा ऊस पिकालाही देतो लागवडी इतकेच महत्त्व

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Sugarcane Farmer management :

शेतकरी नियोजन : पीक : खोडवा ऊस

शेतकरी : संतोष सदाशिव यादव

गाव : जांभळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

ऊस लागवड : तीन एकर

खोडवा क्षेत्र : एक एकर

उसाची सातत्यपूर्ण शेती करणाऱ्या संतोष यादव यांनी खोडव्याकडे अधिक लक्ष केंद्रित करत एकरी ५० टनांपेक्षाही अधिक घेत उत्पादनवाढीत सातत्‍य ठेवले आहे. कौशल्यपूर्ण बदल करत खोडव्याचे उत्पादन वाढविले आहे.

संतोष यांची एकूण तीन एकर शेती आहे. यामध्ये दोन एकरांत लागवड, तर एक एकरावर खोडवा ऊस आहे. प्रत्येक वर्षी लागवड व खोडवा असे उसाचे नियोजन असते. लागण ऊस पिकामध्ये जेवढी मेहनत घेतली जाते, तितकीच खोडव्यामध्येही घेतली जाते. त्यामुळे खोडव्याचे उत्पादनही लागण उसाच्या जवळपास येत असल्याचे संतोषराव सांगतात.

आडसाली लावणीचा खोडवा :

प्रत्येक वर्षी आडसाली लागवड केली जाते.

लागवडीसाठी मध्यम प्रतीची जमीन निवडली जाते. लागवडीसाठी उसाच्या को २६५ जातीचे बेणे वापरले जाते.

साधारण जुलै ते ऑगस्टदरम्यान लागवडीचे नियोजन असते. हा ऊस साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यांमध्ये तुटला जातो.

चार फुटी सरीमध्ये उसाचे उत्पादन घेतले जाते. दोन रोपांमध्ये दोन फूट अंतर राखले जाते.

आडसाली ऊस तुटल्यानंतर खोडवे जमिनीबरोबर तासून घेतले जातात. त्यानंतर त्यावर बुरशीनाशक फवारणी केली जाते. उसाची तोडणी झाल्यानंतर शेतातील पाचट जाळले जात नाही. त्याऐवजी एक सरी आड दाबून ठेवले जाते. यंत्राद्वारे बारीक करून ते एक सरी ठेवले जाते. त्यानंतर पाचट कुजण्यासाठी शिफारशीत घटकांचा वापरतो.

एक सरी या पद्धतीने पाचट ठेवले जाते. पाचट नसलेल्या सरीमध्ये कुळवणी केली जाते. आणि त्यानंतर पाचट दुसऱ्या सरीमध्ये टाकले जाते. ती सरी पुन्हा कुळवली जाते. त्यामुळे पाचट व माती याचे एकत्रीकरण उत्तमप्रकारे होते. आलटून-पालटून कुळवणी केल्याने खोडव्याच्या फुटवा फुटण्यास मदत होते.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

खोडव्याची फूट चांगली होण्यासाठी भरणी करताना लगेचच रासायनिक खतमात्रा दिली जाते. दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ येथील अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार रासायनिक खताचे नियोजन केले जाते. भरणीवेळी खतमात्रा दिल्यामुळे माती व खते चांगल्या पद्धतीने मिसळली जातात. त्याचा खोडव्याची वाढीस फायदा होतो, असा संतोष यांचा अनुभव आहे. त्यामुळे कोंब ही चांगले येतात. खोडवा एक ते दीड फूट उंचीवर येऊपर्यंत शिफारशीत घटकांची फवारणी केली जाते.

गरजेवेळीच पाणी

सिंचनासाठी पाटपाणी व ठिबक या दोन्ही पद्धतींचा अवलंब केला जातो. पावसाळ्यात पाट पाण्याने तर उन्हाळ्यामध्ये ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते. सिंचनाचे पाणी प्रमाणापेक्षा जास्त दिले जाणार नाही याची खबरदारी घेतली जाते. पिकास ज्या वेळी पाण्याची गरज भासते, त्या वेळी पानांमध्ये काहीसा बदल होतो. असा बदल होऊ लागला की पाणी दिले जाते. काही परिस्थितीत जादा पाणी दिले जात नाही जितकी गरज आहे तितकेच पाणी दिल्याने पिकांची वाढ चांगली होते.

पावसाळ्यातील नियोजन

पावसाळा आल्यानंतर खोडव्याचा बुडपाला काढला जातो. साधारणतः जून ते जुलै महिन्यामध्ये पावसाची संततधार सुरू झाल्यानंतर पाला काढण्याचे नियोजन केले जाते. पावसामुळे पाला भिजल्याने तो सहजासहजी निघतो. साधारणत: चार कांड्यापर्यंत पाला काढला जातो. पाला काढल्यानंतर कोंब चांगले फुटतात. याच वेळी रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. त्यामुळे कोबांची वाढ जलदगतीने होण्यास मदत होते.

उसाबरोबर हे कोंबही चांगले वाढल्याने उसाची संख्या वाढते. खोडव्याची संख्येइतकेच कोंबदेखील वाढत असल्याने एकरी उत्पादन आणि वजनातही वाढ मिळते. पाला काढल्यानंतर कोंबाच्या वाढीसाठी पुरेशी मोकळी जागा उपलब्ध होते. त्यामुळे जेवढा ऊस आहे, तेवढेच वजन कोंबऱ्यांचे होते. कोंबऱ्यांचे व्‍यवस्‍थापन योग्य पद्धतीने केल्यामुळे उसाच्या एकूण वजनात वाढ होते, असे संतोषराव सांगतात.

व्यवस्थापनाचा खर्च तुलनेने कमी

अनेक शेतकरी लागवडीच्या उसाकडे जास्त लक्ष देतात. मात्र श्री. यादव हे लागण उसाइतकेच महत्त्व आणि लक्ष खोडवा पिकाकडे देतात. एकूण व्यवस्थापन खर्च पाहिला तर खोडव्याचा व्यवस्थापन खर्च कमी येतो. लागवडीच्या उसाचे एकरी ६० टनांपर्यंत उत्पादन मिळते, तर खोडव्याचे उत्पादनही ५० टनांपेक्षा अधिक होत असल्याचे संतोष यादव सांगतात.

आगामी नियोजन

सध्यातरी मॉन्सूनच्या पावसाला चांगली सुरुवात झालेली नाही. संततधार पाऊस झाल्यानंतर उसाचा पाला काढून रासायनिक खते देण्याचे नियोजित आहे. त्या अनुषंगाने रासायनिक खतांची उपलब्धता आधीच करून ठेवली आहे. तसेच मजुरांसोबत बोलणी केली आहे. त्यामुळे सध्या फक्त संततधार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या शेतामध्ये पाला काढण्याचे काम सुरू आहे, असे संतोष यादव सांगतात.

संतोष यादव, ९७६४७१२५२१

(शब्दांकन : राजकुमार चौगुले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT