Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : खरीप पेरणी ९४ टक्क्यांवर

Team Agrowon

Pune News : राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भात वगळता सर्व पिकांच्या पेरण्या आटोपल्या आहेत. येत्या पंधरवड्यात उर्वरित दहा लाख हेक्टरवरील भाताची पुनर्लागवडदेखील पूर्ण होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

राज्याच्या सरासरी १४२ लाख हेक्टर खरीप क्षेत्रापैकी २५ जुलैअखेर १३४ लाख हेक्टरवरील (९४ टक्के) पेरा पूर्ण झाला आहे. पुणे विभागात आतापर्यंत १२८ टक्के झाला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ९७ टक्के, लातूर ९८ टक्के, अमरावती ९६ टक्के, नाशिक ९२ टक्के; तर कोल्हापूर विभागात ९४ टक्के खरीप पेरा आटोपला आहे. पेरण्यांमध्ये केवळ कोकण (६७ टक्के) व नागपूर (७२ टक्के) विभाग किंचित मागे आहेत. तेथील भात पुनर्लागवडीची कामे अद्याप चालू आहेत. दमदार पावसामुळे पुनर्लागणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यात एक जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सरासरी १०७५ मिलिमीटर पाऊस होतो. त्यापैकी २०८ मिलिमीटर जूनमध्ये; तर जुलैत ३३१ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा मॉन्सूनची वाटचाल दमदार सुरू आहे. त्यामुळे वर्षभराच्या सरासरीपैकी ६१९ मिलिमीटर म्हणजेच ५२ टक्के पाऊस गेल्या ५२ दिवसांमध्ये झालेला आहे. यंदा जूनमध्ये २२१ मिलिमीटर (१०७ टक्के), तर जुलैत ३९८ मिलिमीटर (१२० टक्के) पाऊस पडला. अपेक्षेपेक्षाही जादा पावसामुळे राज्यात यंदा कुठेही पेरण्या रखडल्या नाहीत. ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या महसूल मंडलांची संख्या आताच ३१५ च्या वर गेली आहे. तसेच आतापर्यंत जवळपास ३१३ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

चांगल्या पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत राज्यात खरिपाचा एकूण पेरा ११२ टक्के म्हणजेच १३४ लाख हेक्टरपर्यंत गेला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत पेरा केवळ १२० लाख हेक्टरपर्यंत झालेला होता. कापूस, सोयाबीन, तूर, मका ही राज्याची मुख्य खरीप पिके आहेत. त्यापैकी यंदा शेतकऱ्यांनी ४८ लाख हेक्टरवर सोयाबीन; तर ४० लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा केला आहे. तुरीचा पेरा यंदा ११ लाख हेक्टरच्या पुढे; तर मका १० लाख हेक्टरच्या पुढे पेरला गेला आहे.

खरीप पेरा झालेल्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान शक्य आहे. परंतु अद्याप तशी माहिती प्राप्त झालेली नाही. पाऊस उघडल्यानंतर पंचनामे होताच तपशील हाती येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी अतिपावसाच्या कालावधीत भात पुनर्लागण करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे. वीजप्रवाह, दरडी, सरपटणाऱ्या प्राण्यांची बिळे याचा अंदाज घेत मशागतीची कामे करावीत, असे विस्तार विभागाचे म्हणणे आहे.

खरीप पेरण्यांची अंदाजे स्थिती (२२ जुलैअखेर)

पीक- सरासरी क्षेत्र- - गेल्या वर्षीचा पेरा--चालू वर्षाचा पेरा (टक्के)

धान १५०८३७४----६६३३१७-----६३१८८७ (९५)

खरीप ज्वारी २८८६१५----९०८७१-----९७०६५ (१०७)

बाजरी ६६९०८९----२०९५३५-----३८०८४३ (१८२)

नाचणी ७८१४९---१७७३४-----२९५७४ (१६७)

मका ८८५६०८----६६४३१०-----१००६१९० (१०१)

तूर १२९५५१६---९६७२२६-----११६००३५ (१२०)

मुग ३९३९५७----१३९१८५-----२२१९६१ (१५९)

उडीद ३७०२५२---१६२४०४-----३४४६९१ (२१२)

भुईमूग १९१५७५----९७५८०----१३४८९३ (१३८)

तीळ १५१६२--------३५९९-----६९८७ (१९४)

कारळे १२४६०------२६४२----१९९६ (७६)

सूर्यफूल १३७८०-----३७७-----८७६६ (२३२५)

सोयबीन ४१४९९१२–४३८७७०७–४८०५९९७ (११०)

कापूस ४२०११२८–३९७८६१०–३९८४१२७ (१००)

सर्व आकडे अंदाजे व हेक्टरमध्ये आहेत.

कंसातील आकडे गेल्या हंगामातील पेरण्यांच्या तुलनेत यंदा आतापर्यंत झालेल्या पेरणीची टक्केवारी दर्शवितात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT