Amla Processing  Agrowon
ॲग्रो विशेष

Amla Processing : आवळ्यापासून जॅम, गर, सरबत

Team Agrowon

कृष्णा काळे, राणी दुपडे

आ वळा हे तुरट व आंबट चवीचे हिरव्या रंगाचे औषधी फळ आहे. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे. आवळा गराचा उपयोग बहुतांश औषधांच्या निर्मितीसाठी केला जातो. आवळा फळ सुकविले, शिजविले तरी त्यातील उपयुक्त जीवनसत्त्वे किंवा औषधी गुणधर्म कमी होत नाही.

आवळा फळाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य गरामध्ये ६०० मिलिग्रॅमपर्यंत ‘क’ जीवनसत्त्वे असतात. याशिवाय खनिजद्रव्ये आणि तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. आवळा फळ चवीला जास्त तुरट असल्यामुळे ताजा आवळा खाणे अवघड जाते. याकरिता आवळ्यावर प्रक्रिया करून आवळा कॅण्डी, मुरंबा, आवळाकाठी, चिफळा चूर्ण, तेल, ज्यूस, चटणी, गोळ्या, चकल्या, पापड, सरबत, गुलकंद, बर्फी असे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्याचे मूल्यवर्धन करता येते.

आवळ्याचे औषधी गुणधर्म

आवळ्यामध्ये जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण मुबलक असते. संत्रा फळापेक्षा दहा टक्के अधिक जास्त प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ आवळ्यामध्ये आढळते. आवळा हा पाचक, ज्वरनाशक आणि दात मजबुतीसाठी उपयुक्त असतो. केसाच्या आरोग्य चांगले राखण्यासाठीही गुणकारी आहे. आवळ्यामध्ये असणारी औषधी गुणधर्म हृदयाची समस्या बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. त्यामुळे हृदय तंदुरुस्त राहते.

आवळ्यामध्ये कोमियम तत्त्व मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते.

पोटातील गॅस, ॲसिडिटी, आंबट ढेकर या सारख्या समस्या दूर करण्यासाठी आवळा लाभदायी ठरतो. आवळ्याचे लोणचे, ज्यूस, चूर्ण आदींचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम असते. त्यामुळे हाडांचे आरोग्य उत्तम राहते. हाडे मजबूत होऊन हाडांच्या समस्यांपासून आराम मिळतो.

आवळ्याचे सेवन डोळ्यांसाठी आरोग्यदायी मानले जाते. आवळा रसाच्या सेवनामुळे डोळ्यांचे आजार दूर ठेवण्यास मदत होते.

वजन नियंत्रित ठेवण्यास आवळ्याचे सेवन फायदेशीर ठरते.

आवळ्याची साठवण

पक्व आवळे सामान्य तापमानाला ७ ते ८ दिवस चांगले राहतात.

साधारण २ महिन्यांपर्यंत साठवणूक करण्यासाठी २.५ ते ६ अंश सेल्सिअस तापमानात आवळे ठेवावेत.

एक लिटर पाण्यामध्ये १५० ग्रॅम मीठ घालून द्रावण तयार करावे. या द्रावणामध्ये सामान्य तापमानाला आवळ्यांची साठवण ७० ते ८० दिवसांपर्यंत करता येते.

प्रक्रियायुक्त पदार्थ

जॅम

एक किलो आवळे स्वच्छ धुऊन २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाला १० ते १२ मिनिटे वाफवून घ्यावेत. त्यानंतर आवळ्याच्या बिया वेगळ्या काढून घ्याव्यात. आवळा गर मिक्सरमध्ये फिरवून लगदा तयार करावा. तयार गर एका पातेल्यात घेऊन त्यात ७५० ग्रॅम साखर मिसळून मंद आचेवर शिजवण्यास ठेवावे. मिश्रण शिजत असताना सतत ढवळत राहावे. जेणेकरून करपणार नाही. मिश्रणाचा टीएसएस ६८५ ब्रीक्स आल्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यास ठेवावे. तयार जॅम निर्जंतुक काचेच्या बाटलीत भरून थंड जागी साठवणूक करावी.

आवळा गर

आवळे स्वच्छ धुऊन बी काढून त्याचे तुकडे करावेत. हे तुकडे १५ ते २० मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्यावे. त्यानंतर मिक्सरमध्ये १ किलो आवळ्यामध्ये १ लिटर इतके पाणी घेऊन बारीक करून घ्यावे. तयार गर एका स्टीलच्या पातेल्यात घेऊन ७८ अंश सेल्सिअस तापमानावर गरम करून घ्यावे. तयार गरामध्ये सोडिअम मेटाबायसल्फेट मिसळून घ्यावे. तयार गर हवाबंद बाटलीमध्ये भरून थंड ठिकाणी साठवणूक करावी.

सरबत

एक किलो आवळे वाफवून घ्यावेत. त्यानंतर बिया काढून गर काढावा. त्यामध्ये ५०० ग्रॅम साखर, ५ ग्रॅम मीठ, ५ ग्रॅम मिरेपूड व २ ग्रॅम आले घालून पल्प तयार करावा. तयार रसामध्ये लिंबू रस ५ मिलि आणि ८०० मिलि पाणी घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे. तयार सरबत गाळणीने गाळून काचेच्या बाटलीमध्ये हवाबंद करून ठेवावा.

- कृष्णा काळे, ८८०५९६८५३६

(लेखक अन्नप्रक्रिया विषयातील तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीच्या दरात सुधारणा; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत आजचे केळीचे दर?

Voter List : अहिल्यानगरमध्ये पाच वर्षांत वाढले पावणेतीन लाख मतदार

Animal Feed : दुभत्या जनावरांसाठी अंजनचा पाला खाद्य

Woman Farmer Award : ‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार’ देण्याची घोषणा

Excise Department : सोलापुरात उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र-कर्नाटकची समन्वय बैठक

SCROLL FOR NEXT