Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : परभणी जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वर्षांनुवर्षे कागदावरच

कालव्याच्या टोकाकडील शेतकरी सिंचनापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वर्षानुवर्षे केवळ कागदावरच दिसत आहे.

माणिक रासवे

parbhani irrigation News : जिल्ह्यात जायकवाडी, माजलगाव, सिद्धेश्वर, निम्न दुधना या मोठ्या प्रकल्पांसह मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या पाणी वितरण प्रणाली अंतर्गत कालवे, वितरिका, शेतचाऱ्यांची जागोजागी तुटफुट झाली आहे. त्यात झाडे, झुडपे वाढली आहेत. गाळ साचला आहे.

वहन क्षमता कमी झाली आहे. देखभाल दुरुस्तीअभावी पाणी वाया जात आहे. निम्न दुधना तसेच माजलगाव प्रकल्पाची कामे रखडत चालली आहेत. परिणामी धरणात पुरेसा पाणीसाठा (Water Stock) असूनही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही.

कालव्याच्या (Canal) टोकाकडील शेतकरी सिंचनापासून (Irrigation) वंचित राहत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वर्षानुवर्षे केवळ कागदावरच दिसत आहे.

परभणी जिल्ह्यातील लागवडी योग्य ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी प्रकल्पांचे एकूण लाभक्षेत्र २ लाख ५४ हजार ६१० हेक्टर आहे. जायकवाडीच्या डाव्या मुख्य कालव्याची परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा या तालुक्यांतील लांबी ८६ किलोमीटर आहे.

लाभक्षेत्र ९७ हजार ४०० हेक्टर आहे. या कालव्याव्दारे सिंचनास सुरुवात झाल्यापासून जेमतेम ४५ ते ४७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. २००६-०७ मध्ये ६२ हजार ४८३ हेक्टर क्षेत्र भिजले.

परंतु त्यानंतर कालवे, वितरिका, शेतचाऱ्यांमध्ये जमा झालेला गाळ, वाढलेली झाडे-झुडपे तसेच अतिक्रमणामुळे बुजलेल्या चाऱ्या, कालव्याच्या खोलगट भागात मोठ्या प्रमाणावर जमा झालेला गाळ आदींमुळे शेवटच्या टोकाच्या शेतापर्यंत योग्य दाबाने पाणी पोहचत नसल्याची स्थिती आहे.

२०२१-२२ मध्ये खरिपात ६ हजार ९८९ हेक्टर, रब्बीत ४३ हजार ५४८ हेक्टर, उन्हाळ्यात २५ हजार ४८७ हेक्टर क्षेत्र भिजले. माजलगाव धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड, पालम तालुक्यातील ५८ हजार ३८५ हेक्टरचा समावेश होतो.

येलदरी- सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याचे पाणी पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळते. निम्न दुधना प्रकल्पांचे लाभक्षेत्र ३४ हजार ४३८ हजार हेक्टर आहे. परंतु या प्रकल्पाचे काम रखडत चालले आहे.डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे परंतु उजव्याचे अपूर्ण आहे.

अनेक ठिकाणी चाऱ्या,वितरिकांची कामे पूर्ण नाहीत.निवळी (ता.जिंतूर) करपरा मध्यम प्रकल्पाचे लाभक्षेत्र २ हजार १४१ आहे.या धरणाच्या २४ किलोमीटर लांबीच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.

या धरणात गाळ साठल्यामुळे कालव्यात कमी दाबाने पाणी येत असल्याने उन्हाळी हंगामातील क्षेत्र घटले आहे. मासोळी (ता.गंगाखेड) मध्यम प्रकल्पांचे सिंचनक्षेत्र २ हजार ५९६ हेक्टर आहे. २२ लघू सिंचन तलावाचे लाभक्षेत्र ८ हजार ९४६ हेक्टर आहे.

परंतु अनेक तलावाच्या वितरिकांची दुरवस्था झाल्यामुळे अल्प क्षेत्राला पाणी मिळते. गोदावरी नदीवरील ढालेगाव, मुद्दगल, मुळी, डिग्रस उच्चपातळी बंधाऱ्यामुळे ८ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.

जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोन अंतर्गतची अर्ध्याहून अधिक पदे रिक्त आहेत. वितरण प्रणालीचे व्यवस्थापन करण्यासाठी तोकडे मनुष्यबळ आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसुली, पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी अडचणी येत आहेत.

सर्व प्रकल्पांवरील पाणी वाटप संस्थांचे सक्षमीकरण करून ‘टेल टू हेड’ सिंचनाचे नियोजन करावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष्य केले जात आहे.

दरवर्षी थातूर मातूर पद्धतीने गाळ काढण्यावर खर्च केला जातो. त्याचा फारसा उपयोग होत नाही. परिणामी धरणात पाणी असूनही त्याचा शेतकऱ्यांना लाभ होत नाही. योग्य व्यवस्थापन करून कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण क्षमतेने सिंचनाचा लाभ कधी मिळणार, असा सवाल शेतकरी करत आहेत.

२०२१-२२ रब्बी मधील सिंचित क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)

प्रकल्प - खरीप हंगाम - रब्बी हंगाम - उन्हाळी हंगाम - एकूण हेक्टर

मोठे प्रकल्प ६९८९ ४३५४८ २५४८७ ७६०२४

मध्यम-लघु प्रकल्प ३५ ४६८९ २४०४ ७१२८

जायकवाडी मुख्य कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आहे. झाडे-झुडपे वाढली आहेत. अनेक जागची फरशी निघाली आहे. या कालव्याची वहन क्षमता कमी झाली आहे. कमी दाबाने पाणी मिळते. कालव्याची दुरुस्ती करून वापराचे नियोजन करावे.
माणिकराव सूर्यवंशी, शेतकरी, सिंगणापूर, ता. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT