Sugarcane Management Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Nutrient Management : पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

Sugarcane Management : पूर्वहंगामी उसाचा कालावधी १३ ते १४ महिन्यांचा असून, उत्पादकता ही जास्त असते.

Team Agrowon

डॉ. प्रीती देशमुख, डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अशोक कडलग

Integrated Nutrient Management : पूर्वहंगामी ऊस हा गाळप हंगामाच्या अत्युच्च साखर उतारा हंगामात गाळपास येत असल्यामुळे या लागवडीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा ऊस १३ ते १४ महिन्यांत म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या थंडीच्या महिन्यात गाळपास येतो. त्यामुळे या पिकाचा साखर उतारा जास्त मिळतो.

ऊस वेळेत तुटल्यामुळे खोडवा पीकही चांगले घेता येते. तसेच पिकावर सुरुवातीच्या काळात खोडकिडीचा येणारा प्रादुर्भावही कमी होतो. पूर्वहंगामी ऊस लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधी मध्येच करावी. नोव्हेंबरनंतर लागण झाल्यास थंडीमुळे उसाच्या उगवणीवर विपरीत परिणाम होतो. तसेच फुटव्यांची संख्या अपेक्षित येत नाही.

सेंद्रिय खत व्यवस्थापन ः

- पूर्वहंगामी ऊस लागवड करण्यापूर्वी जमिनीची उभी आडवी खोल नांगरट करून सेंद्रिय खतांचा वापर करावा. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात शोषली जातात.
- सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, जलधारणाशक्ती, सुपीकता वाढण्यास मदत होते. जमिनीची जडणघडण सुधारते. त्यामुळे हवा व पाणी यांचे संतुलन राखले जाते. निचरा प्रणाली सुधारते.
- जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ‘व्हीएसआय ह्युमिक’ची निर्मिती केली आहे. हे खत लागणीवेळी आणि मोठ्या बांधणीवेळी ठिबक सिंचनाद्वारे १ लिटर प्रति २०० लिटर पाणी प्रति एकर या प्रमाणात मिसळून द्यावे. ठिबक संच नसल्यास एकरी १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून लागणीवेळी आणि मोठ्या बांधणीवेळी आळवणीद्वारे द्यावे.
- लागणीपूर्वी ताग, धैंचा ही हिरवळीची पिके वाढवून जमिनीत गाडल्यास सेंद्रिय पदार्थांचा अधिक पुरवठा होतो.
- सेंद्रिय खतांद्वारे कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये तसेच लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन व मॉलिब्डेनम ही सूक्ष्म अन्नद्रव्ये काही प्रमाणात उपलब्ध होतात.

सेंद्रिय खतांतील अन्नद्रव्यांचे प्रमाण ः
सेंद्रिय खते---अन्नद्रव्यांचे प्रमाण (टक्के)---एकरी प्रमाण (टन)
००---नत्र---स्फुरद---पालाश---००
शेणखत---०.५ ते ०.८---०.४ ते १.८---०.५ ते ०.९---१०
कंपोस्ट---०.५ ते १.५---०.५ ते १.४---१.४ ते १.६---१०
कोंबडीखत---३ ते ४.५---४ ते ५---२ ते २.५---१.५ ते २
मासळीखत---८ ते ९---२.८---०.२ ते १.५---१
लेंडीखत---०.५ ते ०.६---०.८ ते १.८---०.५ ते १.२---१

रासायनिक खतांचा वापर ः
- रासायनिक खतांचा वापर किफायतशीर होण्यासाठी खतांचे योग्यप्रकारे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. खतांची योग्य निवड, योग्य वेळी योग्य मात्रा आणि खते देण्याची पद्धत इ. गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
- पूर्वहंगामी उसाचा कालावधी १३ ते १४ महिन्यांचा असून, उत्पादकता ही जास्त असते. त्यामुळे पिकाची अन्नद्रव्यांची गरजही जास्त असते. पिकास नत्र ३६ किलो आणि स्फुरद व पालाश प्रत्येकी ६८ किलो प्रति एकर प्रमाणे देण्याची शिफारस आहे. मात्र माती परीक्षण करून खतमात्रेत योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. माती परीक्षणामुळे जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश यासह सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण यांची माहिती मिळते. त्यानुसार रासायनिक खतमात्रा ठरविणे अधिक सोयीचे होते.
- उसाच्या को-८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. या जातीला नत्र, स्फुरद आणि
पालाशयुक्त खतांची मात्रा २५ टक्के अधिक म्हणजेच १६० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश प्रति एकर या प्रमाणे द्यावे.

- रासायनिक खतांचा पहिला हप्ता म्हणजेच १० टक्के नत्र लागवडीवेळी मुळांच्या व अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी, स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के देणे फायदेशीर ठरते.
- लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी पिकास फुटवा येण्यास सुरुवात होते. फुटव्यांची वाढ जोमदार होण्यासाठी नत्र खताची ४० टक्के मात्रा युरियामधून उसाच्या बुडात द्यावी. त्यानंतर अवजाराच्या साह्याने बाळबांधणी करावी. बाळबांधणीमुळे खतमात्रा मातीमध्ये मिसळून पिकाला मातीची हलकी भर दिली जाते. त्याचा फुटवा चांगला आणि जोमदार फुटण्यासाठी फायदा होतो.

- पीक १२ ते १४ आठवड्यांचे झाल्यानंतर उसास कांड्या सुटण्यास सुरुवात होते. त्या वेळी नत्रयुक्त खताचा तिसरा हप्ता म्हणजे शिफारशीच्या १० टक्के नत्राची मात्रा युरियामधून द्यावी. अवजाराच्या साह्याने हातपेरणी करावी किंवा खत उसाच्या बुडाला देऊन तीन दातेरी अवजार चालवावे. म्हणजे खत मातीआड होऊन जमीन मोकळी होईल.
- लागणीनंतर १४ ते १६ आठवड्यांनी उसाची पक्की बांधणी करून घ्यावी. पक्की बांधणी करताना प्रथम नत्रयुक्त खताची ४० टक्के, स्फुरद व पालाशची उर्वरित प्रत्येकी ५० टक्के मात्रा देऊन तीन दातेरी अवजार चालवावे. त्यानंतर रिझरच्या साह्याने मोठी बांधणी करावी. म्हणजे उसाला चांगली भर लागेल.

ठिबकद्वारे खतांचा वापर ः
विद्राव्य खतांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे केल्यास खतांची कार्यक्षमता वाढते. तसेच खतांची ४० टक्क्यांपर्यंत बचत होते. पिकाच्या मुळांजवळ खत दिल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते.


खत देण्याचे वेळापत्रक ः
खते देण्याची वेळ---खतांचा वापर (किलो प्रति एकर)
००---युरिया (नत्र)---फॉस्फोरिक आम्ल (स्फुरद)---म्युरेट ऑफ पोटॅश (पालाश)---व्हीएसआय मायक्रोसोल
लागणीच्या वेळी---२---१---१---००
२ आठवड्यांनी---४---१---१---००
४ आठवड्यांनी---४---१---१---२.५
६ आठवड्यांनी---७---३---१---००
८ आठवड्यांनी---११---४---२---२.५
१० आठवड्यांनी---११---४---३---००
१२ आठवड्यांनी---१५---६---३---००
१४ आठवड्यांनी---१५---६---४---००
१६ आठवड्यांनी---१५---६---५---२.५
१८ आठवड्यांनी---१६---६---३---००
२० आठवड्यांनी---१६---६---३---००
२२ आठवड्यांनी---१८---७---६---००
२४ आठवड्यांनी---१६---६---६---००
२६ आठवड्यांनी---११---४---६---२.५
२८ आठवड्यांनी---७---३---५---००
३० आठवड्यांनी---५---२---५---००
३२ आठवड्यांनी---४---१---५---००
३४ आठवड्यांनी---४---१---४---००
३६ आठवड्यांनी---२---१---४---००
(टीप ः वरील खतमात्रा ही उदाहरणादाखल दिली आहे. माती परीक्षण करूनच ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर करावा.)

गंधकाचा वापर ः
राज्यातील ऊस लागवडीखालील जमिनीत गंधकाची कमतरता लक्षात घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने शाश्‍वत उत्पादकतेसाठी गंधकयुक्त खतांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी लागवडीवेळी २४ किलो प्रति एकर प्रमाण मूलद्रवी गंधक द्यावे. त्यामुळे ऊस उत्पादनात १० ते २४ टक्के आणि १५ ते ३० टक्के साखर उत्पादनात वाढ झालेली दिसून येते.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व ः
पिकाच्या वाढीसाठी मुख्य, दुय्यम अन्नद्रव्यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील आवश्यकता असते. याकरिता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटद्वारे मल्टिमायक्रोन्यूट्रियंट द्रवरूप खत तयार केले आहे. यामुळे ऊस उत्पादनात एकरी ६ ते ८ टनांपर्यंत वाढ मिळाल्याचे दिसून आले आहे.
- व्हीएसआय निर्मिती मल्टिमायक्रोन्यूट्रियंट आणि मल्टिमॅक्रोन्यूट्रियंट या द्रवरूप खताची
पहिली फवारणी लागणीनंतर ६० दिवसांनी,
प्रत्येकी २ लिटर २०० लिटर पाणी या प्रमाणात एकत्रित करावी.
- दुसरी फवारणी लागणीनंतर ९० दिवसांनी,
प्रत्येक ३ लिटर द्रवरूप खत प्रति ३०० लिटर पाणी या प्रमाणात करावी.

सूक्ष्म अन्नद्रव्ये युक्त खतांचा वापर ः
खत---अन्नद्रव्ये घटक---खतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण (टक्के)---मात्रा (किलो प्रति एकर)
फेरस सल्फेट---लोह---१९---१०
झिंक सल्फेट---जस्त---२१---०८
मँगेनीज सल्फेट---मँगेनीज---२६---१०
बोरॅक्स---बोरॉन---११---२
सोडिअम मॉलिब्डेट---मलिब्डेनम---३९---१
कॉपर सल्फेट---तांब---२४---५
(टीप ः माती परीक्षण करून कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर करावा.)

हितकारक अन्नद्रव्ये ः
ऊस पीक जमिनीमधून ५०० ते ७०० किलो सिलिकॉन शोषूण घेते. जमिनीत सिलीकॉनचे प्रमाण जास्त असले तरी ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या संशोधनानुसार एकरी १६० किलो सिलिकॉन बगॅसची राख आणि १ लिटर सिलिकॉन उपलब्ध करून देणारे जिवाणू ऊस लागणीवेळी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. पूर्वहंगामी ऊस वाढीच्या अवस्थेप्रमाणे सेंद्रिय आणि रासायनिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्यास ऊस व साखर उत्पादन वाढीबरोबर जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
---------------------------------------------
- डॉ. प्रीती देशमुख, ९९२१५४६८३१
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT