Cotton Bollworm Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Jalna News : नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जालना, जळगावसह देशभरातील पाच जिल्ह्यांत कापूस पिकामध्ये कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना तालुक्यातील कचरेवाडी येथील शेतकरी जगदीश जाधव यांच्या शेतावर केंद्रीय कापूस संशोधन संस्था आणि खरपुडी कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान प्रयोगाचा प्रारंभ करण्यात आला.

या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांच्यासह कचरेवाडीचे सरपंच प्रवीण ससाणे, कृषी विज्ञान केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मिटकरी, प्रयोगशील शेतकरी रामदास कचरे, जगन गोविंदराव कचरे, मीना जगदीश जाधव आदी उपस्थिती होते.

या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक भारतातील पाच जिल्ह्यांमध्ये घेण्यात येत आहेत. कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञानामुळे गुलाबी बोंड अळी कशा प्रकारे नियंत्रित होते आणि हे तंत्र पर्यावरणपूरक कसे आहे याबाबत डॉ. अजय मिटकरी यांनी मार्गदर्शन केले.

कचरेवाडी येथील २४ शेतकऱ्यांच्या ६३ एकर कापूस लागवड क्षेत्रावर कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कचरेवाडी येथील राजू कचरे, राम ढोकळ, जगदीश जाधव, विष्णू ठोकळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी कचरेवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राजू कचरे यांनी मानले.

...असे आहे कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

कृषी विज्ञान केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मिटकरी म्हणाले, की हे तंत्रज्ञान म्हणजे नर-मादीच्या मिलनात अडथळा निर्माण करून गुलाबी बोंड अळीचे प्रजनन रोखणारे प्रभावी, वापरण्यास सोपे तसेच पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान खासगी कंपनीने विकसित केले आहे. यामध्ये मलमाच्या स्वरूपात फेरोमोन तयार करण्यात आला आहे. नेहमीच्या फेरोमोनपेक्षा तो प्रभावी आणि अधिक कार्यक्षम आहे. नर पतंग मादीकडे आकर्षित न होता, या फेरोमोनकडे आकर्षित होऊन गोंधळून जातो.

त्यामुळे नर व मादी पतंगाच्या मिलनात अडथळा येतो. त्यामुळे गुलाबी बोंडअळीची पुढील पिढी तयार होत नाही आणि नुकसान टळते. प्रति एकरी १२५ ग्रॅम फेरोमोन तंत्रज्ञानावर आधारित हे मलम पुरेसे आहे. साधारणतः पाते लागले, की या मलमाचा वापर सुरू करावा लागतो. म्हणजे पहिल्यांदा ३० ते ३५ दिवसांत आपल्या शेतातील झाडांच्या संख्येनुसार दहा फुटाच्या अंतराने एका झाडाला याप्रमाणे एकरी किमान ४०० ते ५०० झाडांवर हे मलम लावणे गरजेचे आहे.

झाडाच्या शेंड्यापासून १० सेंटिमीटर अंतर सोडून येणारी मुख्य फांदी व उप फांदीच्या बेचक्यात हरभऱ्याच्या दाण्याएवढे हे मलम लावावे. हा फेरोमोन महिनाभर कार्यरत राहतो. त्यानंतर पुन्हा ६० ते ६५ दिवसांनी आणि त्यानंतर पुन्हा एकदा ९० ते ९५ दिवसांनी असे तीन वेळा या फेरोमोनचा वापर केल्यानंतर आपल्याला चांगले परिणाम दिसून येतात. गरज असेल तर चौथ्यांदा १२० ते १२५ दिवसांनी या फेरोमोन मलमचा वापर करू शकतो. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात हे तंत्रज्ञान किती प्रभावी ठरते, याचे प्रयोग देशभर कापूस उत्पादक पट्यात घेतले जात आहेत. या प्रयोगाचे निष्कर्ष राष्ट्रीय पातळीवर तपासण्यात येणार आहेत.

कापूस पिकातील शाश्वत उत्पादनासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाची गरज आहे. एकरी झाडाची संख्या वाढवल्यास कापसाचे उत्पादन वाढण्यास मदत होते. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या मदतीने कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक प्रयोग घेण्यात येत आहे. त्याचा फायदा गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कशा पद्धतीने होते, हे तपासण्यात येणार आहे.
- डॉ.एस.व्ही.सोनुने, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

Weather Update : नक्षत्र बदलले; वातावरणात वाढला उन्हाचा चटका

SCROLL FOR NEXT