क्षेत्र कमी होत असताना बैल (bull) सांभाळणे परवडत नाही. पूर्वापारपासून बैलांद्वारे केली जाणाऱ्या कामांसाठी शेतकऱ्यांची मोठी अडवणूक होते. यावर मार्ग काढण्याचा ध्यास घेतला तो सोनाली वेलीजाळी आणि तुकाराम सोनावणे या अभियंते असलेल्या दांपत्याने. त्यांनी बॅटरीवर चालणारे, प्रदूषण विरहित, आकाराने लहान असे बहुउद्देशीय असे यंत्र तयार केले. हे यंत्र पेरणी, खते देणे अशा कामांसोबतच तण काढणी, फवारणी (Spray) करणे अशी कामे अत्यंत कमी खर्चात करू शकते.
सतीश कुलकर्णी
कोरोना टाळेबंदीच्या काळात सोनाली वेलजाळी- सोनावणे आणि तुकाराम सोनावणे हे सहकुटुंब स्वतःच्या गावी आंदरसूल (ता. येवला, जि. नाशिक) येथे गेले. सलग सहा महिने राहण्याची संधी मिळाली. गेल्या २५-३० वर्षांमध्ये गावातील (Village) अनेक गोष्टी नक्कीच बदलल्या असल्या तरी शेती क्षेत्रातील पारंपरिक पद्धतीनेच कामे होत असल्याचे जाणवले. उलट पूर्वीच्या तुलनेमध्ये अनेक समस्या वाढलेल्या दिसत होत्या. गावामध्ये पूर्वी बैलाचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असे, तो आता कमी झाला होता. शेती क्षेत्राचा आकार कमी होत चालल्याने बैल सांभाळणे अवघड होत आहे. त्याऐवजी ट्रॅक्टरचा (Tractor) वापर वाढला आहे. अनेक लहान शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणेही दुरापास्त आहे. तसेच पिकाच्या सुरुवातीच्या मशागतीसाठी भाड्याने ट्रॅक्टर वापरला जात असला तरी पूर्वी बैलांच्या साह्याने केलेली आंतरमशागतीसाठी मनुष्यबळ किंवा बैल उपलब्ध होत नाहीत. शेतकऱ्याकडे आज फार पर्यायच राहिलेले नाहीत.
१) वाढत्या कुटुंबासोबत क्षेत्र कमी होत आहे.
२) विभागलेल्या कुटुंबामुळे घरातील माणसे कमी झाली.
३)मजुरांची उपलब्धता कमी झाल्याने मजुरीही वाढली आहे.
४) परवडण्यासारख्या नगदी पिकांचे पर्यायही कमी होत आहेत.
५) पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचे कष्ट यांत्रिकीकरणामुळे थोडे कमी झाले असले तरी खर्चात वाढ होत चालली आहे. अशा अनेक समस्या सोनावणे दांपत्याला डोळ्यासमोर दिसत होत्या. परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा चालू होती. त्यावर सुरू झाली विचार प्रक्रिया आणि त्यातून ‘कृषीगती’!
येथे त्यांचा अभियांत्रिकीमधील शिक्षण, (Education) अनुभव कामी आली. त्यातून त्यांनी पहिले प्रारूप बनवले. ही बाब कळाल्यानंतर अनेक शेतकरी (Farmer) आपल्या समस्या, त्यांचे प्रत्यक्ष काम करतानाचे अनुभव आणि सूचना घेऊन त्यांच्यापर्यंत स्वयंप्रेरणेने येऊ लागले. त्यांच्या अनुभवावर आधारित सूचना, मते लक्षात घेऊन यंत्रामध्ये बदल करण्यात आले. त्यातून पूर्ण यंत्र आकाराला आले. त्याच्या चाचण्या व सुधारणा यांचा सिलसिला सुरू झाला. हे यंत्र अपेक्षेप्रमाणे कामे करू लागले.
‘असाध्य ते साध्य| करिता सायास || कारण अभ्यास| तुका म्हणे ||’ या अभंगाचा प्रत्यय आला.
स्टार्टअपचा प्रवास... पुरस्कारांपर्यंत
लहान शेतकऱ्यांना परवडेल, अशा प्रकारे यंत्राच्या निर्मितीसाठी (manufacture of machinery) त्यांची धडपड सुरू होती. पुढे पुण्यात आल्यानंतर त्यांचा प्रवास सुरूच राहिला. त्यातून १९ एप्रिल २०२१ रोजी कृषीगती प्रा. लि. कंपनीची स्थापना केली. ही नोंदणी स्टार्टअप म्हणून विविध शासकीय उपक्रमांतर्गत करण्यात आली. या तयार केलेल्या यंत्राला २०२१ ते २०२२ या काळात सात शासकीय खुल्या आव्हानात्मक स्पर्धांमध्ये विजेते म्हणून घोषित झाले. त्यामुळे त्या अंतर्गत नोंदणीसह काही प्रमाणात निधी उपलब्ध झाला. त्यानंतर यंत्राच्या निर्मितीला वेग आला. मागणी वाढू लागली. यामुळे जागा कमी पडू लागली. ऑगस्ट २०२१ पासून कारखान्यासाठी भोसरी येथील एमआयडीसी (MIDC) मध्ये पाच हजार वर्ग फूट इतकी जागा सध्या भाडेकराराने घेतली. मग १ ऑक्टोबर २०२१ रोजी कार्यालयासाठी शासनाकडून जागा उपलब्ध झाली. कृषीमंत्री, पर्यावरण मंत्री व अन्य शासकीय व निमशासकीय मान्यवरांच्या नजरेत आमचे उत्पादन भरले. हे यंत्र शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकेल, याचा अंदाज आल्यामुळे विविध शासकीय योजनांसाठी शिफारस करण्याचे
आश्वासन दिले. आजवरच्या यंत्र निर्मिती व त्या पुढील प्रवासामध्ये अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाले.
इलेक्ट्रिक बैल (Electric bull)
- एका माणसाने सहज हाताळण्याजोगे शेतीपयोगी बहुउद्देशीय बॅटरीचलित यंत्र.
- हे एक ॲक्सलरहित यंत्र असून, बॅटरीकडून उपलब्ध होणाऱ्या डि.सी. पुरवठ्यावर चालते.
- एकदा चार्ज केले की तीन ते चार तास विनासायास काम करते.
- यामध्ये व्हायब्रेशन्स अजिबात होत नाहीत, यामुळे पॉवर टिलर किंवा अन्य मनुष्यचलित यंत्र काम करण्यास सोपे.
- आकार लहान असल्याने दोन ओळी, दोन झाडांमध्येही सहज काम करू शकते.
- हलकी पूर्वमशागत, पेरणी व आंतरमशागतीची कामांसाठी उपयुक्त.
- प्रदूषण शून्य, कर्ब व अन्य हानिकारक वायूंचे उत्सर्जन शून्य. त्यामुळे पर्यावरणपूरक.
संस्थापकांविषयी थोडेसे
१) सौ. सोनाली वेलजाळी- सोनावणे (संस्थापिका आणि मुख्य कार्य अधिकारी)
बी.ई. (इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग), विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये १० वर्षांचा अनुभव.
२) तुकाराम सोनावणे (सहसंस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी)
एमई ( मेकॅनिकल इंजिनिअरिंग), सध्या पीएच. डी. सुरू. प्रमाणित उद्योजकता शिक्षक (NEN).
समस्या आणि अडचणी...
बहुतांश अन्नधान्य पिकांमध्ये बियांचे पेरणी व ओळीतील अंतर हे कमी ( ६ ते ११ इंच) असते. अशा पिकांमध्ये (Crop) आंतरमशागतीची कामे करण्यात ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरला अडचणी येतात. २०२० च्या आर्थिक आणि संख्याशास्त्र संचलनालयाच्या अहवालानुसार सध्या भारतातील अन्नधान्य पिकांखालील क्षेत्र हे १२५ दशलक्ष हेक्टरपर्यंत विस्तारलेले आहे. भाजीपाला पिकामध्येही आंतरमशागत, फवारणी अशा कामांमध्ये अडचणी येतात. म्हणजेच इतक्या मोठ्या क्षेत्रावरील शेतकरी आजही आंतरमशागतीसाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागते.
नावीन्यपूर्ण यंत्राची वैशिष्ट्ये व तुलना
१) दोन पिकाच्या सरीमध्ये सहा ते ११ इंच अंतर असेल, तर केवळ बैल व मनुष्यचलित यंत्रे कार्य करू शकतात. अशा पिकांमध्ये त्यावरच अवलंबून राहावे लागते. या नव्या यंत्राची चाकाची रुंदी ४ इंच असून, या सर्व सऱ्यामध्ये ते सहजपणे जाऊ शकते.
२) पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टरने एकाच वेळी एकापेक्षा आंतरमशागत करताना त्या दरम्यान येणारे पीक मोडायचा धोका असतो. यामुळे ही यंत्रे वापरण्यात अडचणी येतात. या नव्या यंत्रामध्ये ॲक्सल नाही. त्यामुळे पिकांची (Crop)उंची दोन ते अडीच फूट होईपर्यंत हे यंत्र शेतात नेऊन आंतरमशागत करणे शक्य होते.
३) एका वेळेस दोन कामे (उदा. मशागतीवेळी फवारणी किंवा आंतरमशागती वेळी फवारणी) करता येत नाहीत. ही कामे वेगळी करावी लागत असल्यामुळे इंधन व वेळ अधिक खर्च होते. या नव्या यंत्रामुळे एकावेळी दोन्ही करणे सोपे जाते.
४) सध्या पूर्वमशागत ते सर्व प्रकारची आंतरमशागत (उदा. खुरपणी, डवरणी, माती लावणे, फवारणी, माती भुसभुशीत राहण्यासाठी पाळी देणे इ.) करण्यासाठी हेक्टरी खर्च सुमारे ५० ते ६० हजार रुपये येतो. तो नव्या यंत्रामुळे फक्त पाच हजार येतो. एका वेळी चार्जिंगसाठी एक ते दोन युनिट वीज लागते. दिवसभरात दोनवेळा जरी चार्ज केले तरी एका कामासाठी चार युनिट वीज वापरली जाईल. प्रति युनिट साधारणपणे ३ ते ६ रुपये वीजदर धरला तरी पाच हजारापेक्षा खर्च कमीच येतो.
५) आंतरमशागतीसाठी पॉवरटिलर व ट्रॅक्टरसोबत अन्य काही उपकरणे, यंत्रे घेण्यापेक्षा हे नावीन्यपूर्ण यंत्र घेतल्यास हे यंत्र अनेक दृष्टीने स्वस्त पडते.
६) ‘कृषीगती’ च्या ‘इलेक्ट्रीक बैल’ या नावीन्यपूर्ण यंत्राची किंमत सध्या २.७५ लाख रुपये आहे.
शेतकऱ्यांनीच सुचवले नाव
एका तीन दिवसाच्या प्रदर्शनामध्ये शेतकरी (Farmer) कृषीगतीच्या दालनाला भेट होते. ‘हे काय आहे’, या त्यांच्या प्रश्नाला बहुउद्देशीय बॅटरीवरील यंत्र वगैरे सांगत होतो. पण ती माहिती आणि यंत्राची वैशिष्ट्ये असे बरेच काही सांगितल्यानंतर शेतकऱ्यांना यंत्राचे महत्त्व समजे. साधारणपणे तिसऱ्या दिवशी एका शेतकरी गटाला समजावताना तुकाराम सोनावणेच्या तोंडातून निघून गेले, ‘‘हा आहे इलेक्ट्रीक बैल!’’ लगेच समोर असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चमक आली. ते स्वतःच म्हणाले, ‘‘म्हणजे हे यंत्र कोळपणी, पाळी मारणे अशी कामे करते तर!’’ पुढे अधिक काही समजावण्याची गरजच राहिली नाही. हे आपुलकीचे वाटणारे नाव शेतकऱ्यांमध्ये चांगलेच ‘क्लिक’ झाले.
शेतकरी प्रतिक्रिया
सुभाष चव्हाण यांची स्वतःची शेती नगर जिल्ह्यात (Nagar District) असली तरी गेल्या काही वर्षापासून इंदुरी (ता. मावळ जि. पुणे) येथे विजय कृष्णाजी मांडे यांच्या शेतात काम करतो. या शेतामध्ये मालकांच्या परवानगीने आम्ही तुकाराम सोनावणे यांच्या ‘इलेक्ट्रीक बैल’ (Electric bull) या यंत्राची चाचणी घेतली. आमच्या इथे असलेल्या एक एकर सोयाबीन पिकांमध्ये (Soybean Spray) फवारणीचे काम केवळ दीड तासांमध्ये पूर्ण झाले. या कामासाठी सुमारे ५०० रुपयांची मजुरी गेली असती. त्याच प्रमाणे ज्वारीमध्येही या यंत्राची चाचणी केली. एक एकर क्षेत्रावरील ज्वारी पिकाच्या दोन ओळीतील तण काढणी, डवरणी आणि मावा किडीसाठी कीडनाशकाची फवारणी अशी तिन्ही कामे एकाच वेळी करता आली. या शेताच्या खुरपणीसाठी १२ महिला व सुमारे चार हजारापर्यंत मजुरी लागली असती. तसेच डवरणीसाठीही बैल शोधण्यापासून काम करावे लागले असते. त्यासाठी वेगळे कष्ट आणि खर्च आला असता. त्याच प्रमाणे एक एकर क्षेत्र फवारणीसाठी मजूर साधारणपणे पाचशे रुपये घेतो. या कामांसाठी एक ते दोन दिवस लागले असते.ही कामे दीड तासांमध्ये पूर्ण झाली. आता पहिल्याप्रमाणे शेतकामासाठी मजूर मिळत नाहीत. तसेच शेती लहान झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे पहिल्याप्रमाणे बैलही (Ox) राहिलेले नाहीत. त्यामुळे मशागतीसारखी मोठी कामे ट्रॅक्टरने करता येत असली तरी अशा छोट्या छोट्या कामांसाठी शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात. ही कामे करण्यासाठी हे यंत्र खूप उपयोगी वाटले.
तुकाराम सोनावणे, ८०८७३२३१४६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.