US Tariff On Indian Export : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांना, ट्रम्प यांना पाहिजे तशाच, व्यापार करारावर सह्या करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत १ ऑगस्ट रोजी संपली. ‘मला शरण या’, ‘मी म्हणतो तसेच करा’ हा ट्रम्प यांचा हट्टाग्रह आहे. बाकी टेबलावर होणाऱ्या वाटाघाटीच्या चर्चा म्हणजे औपचारिकता आहे.
अमेरिका- भारत व्यापार कराराच्या वाटाघाटींच्या पाच फेऱ्या झाल्या. सहावी फेरी या महिन्याच्या मध्यावर सुरू होईल. करारावर कधी स्वाक्षऱ्या होतील माहीत नाही. अशा वेळी अचानक ३१ जुलै रोजी ‘माय फ्रेंड’ डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयात कर आणि त्याशिवाय दंडाचा बॉम्ब टाकला.
भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या इलेक्ट्रिकल मशिनरी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, हिरे आणि सोन्याचे दागिने, तयार कपडे अशा वस्तूंच्या मागणीवर याचा नक्कीच गंभीर परिणाम होऊ शकतो. याचे भारताच्या निर्यातीवर, भारताच्या जीडीपी वर, परकीय चलन मिळकतीवर, रुपया- डॉलर विनिमय दरावर काय परिणाम होतील याबद्दल विविध मते व्यक्त होत आहेत. ती खचितच भारतासाठी चिंता वाढवणारी आहेत.
पण यासंदर्भात आणखी दोन वेगळ्या मुद्यांकडे मी लक्ष वेधू इच्छितो. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे गेल्या काही आठवड्यांत एकामागून एक देश ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकवताना दिसत आहेत. आतापर्यंत ब्रिटन, जपान, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपिन्स यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सर्वांत मोठा मासा गळाला लागला आहे तो युरोपियन युनियनचा. दक्षिण कोरिया आणि तैवान व्यापार करार अंतिम करण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. बाकी छोटे देश बरेच आहेत.
एखाद्या देशावर अमेरिकेने किती आयात कर बसवला यापेक्षा तो आयात कर त्या देशाच्या स्पर्धक देशांवर लावलेल्या आयात करापेक्षा जास्त आहे की कमी हा महत्त्वाचा मुद्दा असतो. साहजिकच अमेरिकेबरोबर व्यापार वाटाघाटी सुरू असताना भारतासकट अनेक देश अमेरिकेने इतर देशांवर लावलेल्या आयात करांचा मागोवा सतत ठेवत आहेत. याचा अर्थ एखाद्या देशाने अमेरिकेबरोबर व्यापार करार अंतिम केल्यानंतर त्याच्या स्पर्धक देशांवर प्रचंड दडपण वाढते.
पाकिस्तानने अमेरिकेबरोबर व्यापार करार अंतिम केल्याची बातमी आली आहे. आपल्यासाठी याचे परिणाम फक्त व्यापारावर नाही तर भू-राजनैतिक असणार आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आयात कराराचे अस्त्र बिगर व्यापारी, बिगर आर्थिक अशा राजकीय उद्दिष्टांसाठी वापरत आहेत. उदा. भारताची केस घ्या. ट्रम्प यांना धडा शिकवायचा आहे रशियाला. त्यासाठी रशियाबरोबर मोठ्या प्रमाणावर व्यापार करणाऱ्या भारताला थप्पड लगावली जात आहे.
भारत रशियाकडून संरक्षण सामग्री आणि मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करतो, हे कारण दिले गेले आहे. भारताने रशियाकडून नाही तर अमेरिकेकडून संरक्षण सामुग्री आणि ऊर्जा विकत घ्यावी हा संदेश आहे. याच प्रकारचे दुसरे उदाहरण आहे ब्राझीलचे. ब्राझीलचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष लुला हे ब्राझीलचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष बोलसानारो यांना त्रास देतात, असा आरोप ट्रम्प करतात. बोलसानारो फॅसिस्ट आणि ट्रम्प यांचे भक्त आहेत. म्हणून ट्रम्प ब्राझीलवर अधिक आयात कर लावू इच्छितात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नक्की किती आयात कर लावले हा मुद्दा महत्त्वाचा आहेच. त्यापेक्षा गंभीर मुद्दा म्हणजे ट्रम्प आता सोकावणार आहेत. त्यांना रक्ताची चटक लागली आहे. आपल्या हात पिरगाळण्याच्या टॅक्टीजमुळे समोरचा वाकतो म्हटल्यावर भविष्यात ते सतत तो मार्ग अवलंबणार आहेत.
भारतावर लावलेले २५ टक्के आयात शुल्क आणि दंड म्हणजे व्यापार करारावर सुरू असलेल्या वाटाघाटींमधली एक चाल आहे. त्या दडपणाला बळी पडून अमेरिकेकडून शेती आणि डेअरी माल आयात होऊ लागला तर शेती, डेअरी उद्योगाशी संबंधित कोट्यवधी कुटुंबावर गंभीर परिणाम होणार आहेत.
‘दोस्त दोस्त ना रहा,’ असं काही नाही. तर ‘दोस्त कभी दोस्त था ही नहीं.’ बळेच गळ्यात पडून आणि मिठ्या मारून आणि स्वतःला स्वतःच विश्वगुरू घोषित करून आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणी दोस्त बनत नाही. त्यासाठी परिपक्व मुत्सद्देगिरीची आवश्यकता असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.