Religiosity Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Religiosity : वाढीव धार्मिकता अर्थव्यवस्थेला मारक

India Economy : इ.स. १६०० मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न इंग्लंडच्या दरडोई उत्पन्नाच्या जास्तीत जास्त ६० टक्के होते. इंग्रजी राज्य स्थापन होण्याआधीच आपले दरडोई उत्पन्न घसरू लागले होते. इ. स. १७०० नंतर ही घसरण अधिक तीव्र झाली.

Team Agrowon

नीरज हातेकर

Condition of Indian Religiosity : भारत एकेकाळी सोने की चिडिया होता... ‘पूर्वी’ कधी तरी भारत म्हणजे जगातील एक प्रगत व्यवस्था होता... भारतात जगातील २५ टक्के औद्योगिक उत्पादन होत होते... वगैरे दंतकथा पसरविणाऱ्या आणि त्यांच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्या लोकांनी तथ्ये तपासून बघितली पाहिजेत. हा जो २५ टक्क्यांचा आकडा आहे; तो चीन आणि भारत यांच्या एकत्रित उत्पादनाचा आहे.

परंतु त्यातील खूप मोठा वाटा चीनचा आहे. भारतात जी उच्च कलाकुसर असलेला कपडा, उच्च मूर्तिकला वगैरे गोष्टी होत्या, त्या मूठभर लोकांसाठीच होत्या. सर्वसामान्य भारतीय माणसाचा जीवनस्तर इंग्लंडमधील सर्वसामान्य लोकांच्या जीवनस्तरापेक्षा नेहमीच कमी राहिला आहे.

बिश्नु प्रिया गुप्ता आणि स्टिवन ब्रॅडबरी (Steven Bradbury) यांनी जी काही उपलब्ध आकडेवारी आहे, त्यातून भारत आणि इंग्लंडमधील दरडोई उत्पन्नाची आकडेवारी काढली आहे. (https://ideas.repec.org/a/eee/exehis/v55y2015icp58-75.html). इ.स. १६०० मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न इंग्लंडच्या दरडोई उत्पन्नाच्या जास्तीत जास्त ६० टक्के होते. इंग्रजी राज्य स्थापन होण्याआधीच आपले दरडोई उत्पन्न घसरू लागले होते. इ.स. १७०० नंतर ही घसरण अधिक तीव्र झाली.

उलट भारतावर पूर्णधिपत्य स्थापन होण्याआधीच १८०० च्या आसपास औद्योगिक क्रांती, लोकशाही आणि आर्थिक व्यवहारांना उत्तेजन देणाऱ्या संस्थात्मक रचना, शास्त्रीय दृष्टिकोन यातून ब्रिटिश अर्थव्यवस्था ऊर्ध्वगामी झाली होती. दुसऱ्या बाजूला जातिव्यवस्था, कर्मकांडे, देवळे-मशिदी यात अडकलेला भारत मागेच पडत राहिला. त्यामुळे आजच्या काळात आपल्यासाठी काय महत्त्वाचे, प्राधान्यक्रम काय असावा ते आपणच ठरवायचे आहे.

वास्तविक सणासुदीवर होणारा खर्च किंवा एकूण धार्मिक कामांसाठी होणारा खर्च हा अर्थव्यवस्थेवर फार परिणाम करत नाही. एकूण कौटुंबिक मासिक खर्चाचा जेमतेम १ टक्का खर्च धार्मिक कारणांसाठी होतो, असे राष्ट्रीय नमुना चाचणीची आकडेवारी दाखवते. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या जास्तीत जास्त अर्धा टक्का हा खर्च असतो.

उदा. २०२२ मध्ये धार्मिक खर्च १.४३ लाख कोटी रुपये होता, तर राष्ट्रीय उत्पन्न २७३.४१ लाख कोटी रुपये. धर्माशी निगडित असलेला रोजगार असंघटित क्षेत्रातील, कमी उत्पादकता असलेला आणि अशाश्‍वत स्वरूपाचा असतो. याला दर्जेदार, चांगले आयुष्य देणारा रोजगार म्हणता येत नाही. रोजगार निर्मितीसाठी तांत्रिक विकास, पायभूत सुविधांचा विकास, उत्तम शिक्षण, चांगले आरोग्य, यातून वाढलेली श्रमाची उत्पादकता हे घटक आवश्यक आहेत. धर्म आपल्या जागी; त्याचा अर्थव्यवस्थेशी संबंध नाही.

मुळात अर्थव्यवस्था मजबूत असेल तर लोक धार्मिक वगैरे बाबींवर खर्च करतात. अर्थव्यवस्था ढेपाळली की धार्मिक अर्थव्यवस्था पण फसते. धार्मिक अर्थ व्यवहारांचे आरोग्य मूळ धर्माशी संबंध नसलेल्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्यावर अवलंबून असते. तीर्थस्थानाचा विकास करणे हा अर्थव्यवस्था सुधारायचा मार्ग नाही. तीर्थस्थान विकासाची उद्दिष्टे निराळी असतात.

रॉबर्ट बॅरो (Robert Barro) आणि मॅकलेअरी (Mccleary) यांनी २००३ मध्ये Economic Growth Among Countries नावाचे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यात त्यानी चर्चमधील हजेरी, धार्मिक विश्‍वास आणि आर्थिक वाढीचा अभ्यास केला. त्यातून त्यांचा निष्कर्ष स्पष्ट आहे. जितकी धार्मिकता जास्त, तेवढा आर्थिक वाढीचा दर कमी. धार्मिक कर्मकांड करण्यात वाया जाणारा वेळ आणि संसाधने हे कारण त्यांच्या अभ्यासातून पुढे आले. उदाहरण घ्यायचे तर भारतात धार्मिक पर्यटनासाठी दरडोई दरमाणशी होणारा खर्च शैक्षणिक कारणासाठी होणाऱ्या प्रवासापेक्षा जास्त आहे. हे आर्थिक विकासाच्या दृष्टीने मारकच आहे.

‘Does religion affect economic growth and happiness ? Evidence from Ramadan’ या २०१३ सालच्या संशोधनपर लेखात लेखक पुढील निष्कर्ष काढतात- Our results indicate that religious practices can affect labour supply choices in ways that have negative implications for economic performance, but that nevertheless increase subjective well-being among followers. तसेच Journal of Institutional Economics या नियतकालिकात २०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘Religion :productive or unproductive’ या लेखात धार्मिकता आणि उद्योजकता यांचा अभ्यास केला आहे. वाढीव धार्मिकता उद्योजकतेला मारक असते, असे या संशोधनातून सापडले आहे.

वाढीव धार्मिकता ही लोकांना क्षणिक सुख देऊ शकते, लोकांचे सामजिक भांडवल वाढवू शकते वगैरे ठीक आहे; पण आर्थिक वाढीला ही वाढीव धार्मिकता मारकच असते. वाढती धार्मिकता आर्थिक वाढीसाठी चांगली असते, असे कोणतेही संशोधन जागतिक पातळीवर उपलब्ध नाही.

गरीब राष्ट्रे अधिक धार्मिक असतात, धार्मिकतेमुळे गरिबी, जगण्याचा निम्न स्तर अधिक ‘स्वीकारार्ह’ होतो हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. भारतात गेल्या काही वर्षांत धार्मिकता वाढते आहे. अर्थव्यवस्थासुद्धा मजबूत नाहीये. देशातील ३३ टक्के कुटुंबांना किमान जगण्यासाठी आवश्यक तेवढे उत्पन्न मिळत नाही.

धार्मिक खर्च वाढला, की देश पुढे जाण्यापेक्षा कुटुंब रसातळाला जाण्याची शक्यता जास्त. म. जोतिबा फुले, गाडगे बाबा यांना हे सनातन वास्तव खूप आधीच समजले. लोक म्हणतात, की धर्म आणि अंधश्रद्धा वेगळे वेगळे असतात. पण वास्तव तसे नाही. कारण अंधश्रद्धा आणि धर्म यांची जोड लावल्याशिवाय बाबा लोकांचे धंदे चालत नाहीत. खऱ्या अर्थाने धार्मिक असणारी माणसे कर्मकांड करत नाहीत. त्यातून धंदा होत नाही. धंदा अंधश्रद्धेतून होतो. म्हणून बाबा-बुवांना उघडे पाडणाऱ्या लोकांना धर्मविरोधी ठरवले जाते, त्यांना गोळ्या घातल्या जातात. आणि खुनी सापडतच नाहीत.

‘दि प्रिन्ट’वर Ram wasn’t always top god in India. Political chaos, conflict with Turks elevated him हा अनिरुद्ध कनिसेट्टी यांनी लिहिलेला लेख १४ जानेवारी रोजी प्रकाशित झाला आहे. तो वाचनीय आहे. ज्याला आपण ‘सनातन संस्कृती’ वगैरे म्हणतो ते सगळं काळाच्या ओघात, तत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद म्हणून घडतं, घडवलं जातं, बदलतं, प्रवाही असतं. संस्कृती म्हणजे साचलेले तळे नसते. हा वाहता प्रवाह असतो. सामजिक उलथापालथी, राजकीय स्थित्यंतरे, आर्थिक गरजा, लोकसमूहाची ये-जा... यातून सतत घडत असते ती संस्कृती. भारताची पण संस्कृती अशीच विकसित झालेली आहे.

सुरुवातीला आफ्रिकेतून लोक आले, नंतर मध्यपूर्व, पूर्व आशिया, युरोप, मग सगळीकडून. गोळवलकर गुरुजींनी कितीही नाही म्हटले तरी जगातील सगळेच महत्त्वाचे सांस्कृतिक प्रवाह ‘सराई’च आहेत. यातून एक संघर्षमय पण जागतिक संदर्भ असलेला इतिहास आणि त्याचे उप-उत्पादन (by product) म्हणून अनेक पदर असलेली, गुंतागुंतीची, प्रवाही संस्कृती तयार झाली आणि अजूनही होते आहे. प्राचिन, पवित्र असे काहीच नाहीये. त्यामुळे ते पुन्हा स्थापित करण्याचा प्रश्‍नच नाहीये. काही गढूळ वगैरे झालेलेच नसेल तर स्वच्छ करणे हा विषय होऊ शकत नाही.

हल्ली भारतदेशी जे चालले आहे ते राजकीय गरज म्हणून नवीन सांस्कृतिक परिमाणे घडवणे इतकेच आहे. अर्थात, संस्कृती अशीच घडत असते. राजकीय, आर्थिक गरजा संस्कृती घडवत असतात. त्यामुळे एका अर्थाने इतिहासाने जे शिकवले, त्याला अनुसरूनच हे होते आहे.

(लेखक प्रख्यात अर्थतज्ज्ञ असून बंगळूर येथील अझीम प्रेमजी विद्यापीठात अध्यापन करतात.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT