Commodity Market Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Commodity Market : हळद, तूर, मक्याच्या भावात वाढ

डॉ. अरुण कुलकर्णी

फ्युचर्स किमती : सप्ताह- ११ ते १७ मे, २०२४

यावर्षी मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा ६ टक्के अधिक पडेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. १५ मे च्या अंदाजानुसार केरळमधील त्याचे आगमन एक दिवस अगोदर, म्हणजे ३१ मे रोजी होईल. (यात ४ दिवस पुढे-मागे होऊ शकते.)

गेल्या वर्षी, म्हणजे २०२३ मध्ये, मॉन्सून पाऊस सरासरीपेक्षा ५.६ टक्के कमी झाला. कमी पावसाबरोबरच महिनावार पावसामधील विषमतासुद्धा गेल्या वर्षी अधिक होती. जूनमध्ये तो त्या महिन्यातील सरासरीपेक्षा ९ टक्क्यांनी कमी होता;

त्यानंतर जुलै व सप्टेंबर मध्ये तो १३ टक्क्यांनी अधिक झाला, ऑगस्ट मध्ये मात्र तब्बल ३६ टक्के कमी पाऊस पडला. गेल्या १०० वर्षात ऑगस्ट महिन्यात इतका कमी पाऊस पडला नव्हता. थोडक्यात, पाऊस किती पडतो या बरोबरच तो केव्हा व कुठे पडतो हे आता अधिक महत्त्वाचे झाले आहे.

शेतीमालाच्या एकूण आवकेत उतरता कल आहे; परंतु मध्य प्रदेश व महाराष्ट्रात या आठवड्यात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. १७ मे रोजी संपलेल्या सप्ताहात हळद, तूर व मका यांच्या दरात वाढ झाली, तर इतर पिकांचे भाव उतरले. किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.२ टक्क्यांनी वाढून रु. ५७,४२० वर आले होते. या सप्ताहात ते ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ५६,९०० वर आले आहेत. जुलै फ्युचर्स भाव १.९ टक्क्यांनी घसरून रु. ५७,९२० वर आले आहेत. सप्टेंबर फ्युचर्स भाव रु. ६१,८०० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ८.६ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात रु. १,४५३ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स रु. १,४४० वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या सप्ताहात १.९ टक्क्यांनी वाढून रु. २,१६० वर आल्या आहेत. फ्युचर्स (जून) किमती १.८ टक्क्यांनी वाढून रु. २,१७५ वर आल्या आहेत. जुलै फ्युचर्स किमती रु. २,१८७ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.८ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १७,४२९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.७ टक्क्यांनी घसरून रु. १७,३१४ वर आल्या आहेत. जून फ्युचर्स किमती रु. १७,८८० वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १८,३९० वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ६.२ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ६,०५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ६.६ टक्क्यांनी वाढून रु. ६,४५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,८०० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) १.३ टक्क्यांनी घसरून रु. ४,७०९ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,५७१ वर आली होती. या सप्ताहात ती १.४ टक्क्यांनी वाढून रु. १०,७१७ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे; मागणीमुळे नोव्हेंबरपासून भाव वाढत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,६३३ होती; या सप्ताहात ती रु. १,५८८ वर आली आहे. गेल्या सप्ताहात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,००० वर आली होती. या सप्ताहात रु. ७५० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT