Javhar News : जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात आजही पशुधनाच्या मदतीने अनेक रोजगार उपलब्ध होत आहेत. शिवाय, या भागात सरकारच्या निरनिराळ्या योजना येथील पशुधनवाढीला चालना देत आहेत. त्यामुळे या ठिकाणी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊन काहीशा प्रमाणात कुपोषण, स्थलांतरसारख्या संकटांना आळा बसत आहे.
मात्र, सरकारच्या नव्या धोरणानुसार आता पशुधनाच्या योजना अगर लाभ घेता यावा, यासाठी पशुधनाचे इअर टॅगिंग नोंदणी ३१ मेपर्यंत होणे आवश्यक आहे. ते करण्याचे आवाहन तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यात अंदाजे ५० हजार पशुधन आहेत. त्यापैकी ४५ हजार ३३० (९०.६० टक्के) इतक्या पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली आहे.
नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन एकीकृत आयटी इकोसिस्टम पशुधन; तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी अभियान आहे. ही प्रणाली राज्यात राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार ३१ मेअखेर राज्यातील सर्व पशुधनाची इअर टॅगिंग करणे सरकारने बंधनकारक केले आहे. १ जूननंतर इअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास राज्यात प्रतिबंध असेल.
इअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची इअर टॅगिंग आणि त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून देय असलेले आर्थिक साह्य दिले जाणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केली नसल्यास यापुढे नुकसानभरपाई दिली जाणार नाही. त्यामुळे ३१ मेपर्यंत पशुधनाचे इयर टॅगिंग करण्याचे आवाहन जव्हार पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
...असे होतील फायदे
भारत पशुधन प्रणालीत १२ अंकी बारकोडेड इअर टॅगिंग केलेल्या सर्व पशुधनाच्या नोंदी घेतल्या जातात. यात जन्म-मृत्यू नोंदणी प्रतिबंधात्मक लसीकरण व औषध उपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरणाचा समावेश आहे. पशुधनांची औषधे यापुढे आता ई-टॅगिंगद्वारे देण्यात येतील. त्यामुळे पशुधनांना दिलेली औषधे विचारात घेऊन संभाव्य साथीच्या रोगाच्या शक्यतेचा अंदाज अथवा अस्तित्वात असलेल्या रोगांच्या स्थितीबद्दल आगाऊ माहिती उपलब्ध होणार आहे.
पशुधनातील रोग व मानवांना प्रभावित करणाऱ्या प्रमुख रोगांना प्रतिबंध करण्यासाठी अंदाज व त्यानुसार प्रतिसाद आणि उपचार करणे शक्य होण्यास मदत होईल. परिणामी, पशुधनाची जीवितहानी व पशुधनापासून मिळणाऱ्या उत्पन्नावरील विपरीत परिणाम टाळणे शक्य होणार आहे. शिवाय शेतकरी, पशुपालकांना सरकारच्या सुविधा, योजना आणि पशुधनासाठी आवश्यक असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे.
खरेदी-विक्री करण्यास बंदी
इअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडा बाजार आणि गावागावांतील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध असेल. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची असेल. ग्रामपंचायतीत पशूंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची इअर टॅगिंग झाल्याशिवाय तो दिला जाणार नाही. दाखल्यावर इअर टॅगचा क्रमांक नमूद करणे आवश्यक राहणार आहे.
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशनअंतर्गत कार्यान्वित झालेल्या ‘भारत पशुधन’ प्रणालीत इअर टॅगिंगद्वारे सर्व पशुधनाच्या सर्वंकष नोंदी करणे राज्य सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यसाय विभागाने बंधनकारक केले आहे. त्या दृष्टीने जव्हार तालुक्यातील पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे इअर टॅगिंग नोंदणी ३१ मेपर्यंत करणे आवश्यक आहे.डॉ. दिलीप उदगिरे, पशुसंवर्धन अधिकारी, जव्हार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.