Retired Meteorological Department Scientist Manikrao Khule Agrowon
ॲग्रो विशेष

Interview with Manikrao Khule : सप्टेंबरमध्ये राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

Retired Meteorological Department Scientist Manikrao Khule : सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत राज्यात पाऊसमान कसे राहील, पुढच्या आठवडाभरातील पावसाचा अंदाज काय, ‘ला-निना’ची स्थिती कशी आहे, याविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्याशी साधलेला संवाद.

Anil Jadhao 

This Interaction with Retired Meteorological Department Scientist Manikrao Khule :

‘ला-निना’ यंदा चकवा देत आहे का?

‘ला-निना’साठी म्यानमार ते दक्षिण अमेरिकेच्या पश्‍चिम किनारपट्टीपर्यंत विषुववृत्तादरम्यानचे पूर्व प्रशांत महासागरीय समुद्री पाण्याचे पृष्ठभागापासून २०० मीटर खोलीपर्यंतचे तापमान हे आठवड्यागणिक घटणे गरजेचे आहे. तरच ‘ला-निना’ स्थिती देशात अवतरू शकते. परंतु तेथील समुद्री पाण्याचा तापमानीय ‘निनो’ निर्देशांक कधी चढतीकडे तर कधी उतरतीकडे अशा दोलायमान स्थितीत आहे. तसेच अजूनही त्यात बदल झालेला नाही. तापमानात सातत्यापूर्ण घसरण झाली तरच ‘ला-निना’ला आमंत्रण मिळू शकते. परंतु सध्याच्या आठवड्यात समुद्री पाण्याचे तापमान पूर्वीच्या आठवड्यापेक्षा खालावलेले जाणवले. गेल्या सहा महिन्यांपासून जागतिक पातळीवर सर्वांनी ज्याचा आतापर्यंत डांगोरा पिटवला तो अति पाऊस देणारा ‘ला- निना’ सप्टेंबर महिना उजाडला तरीही अजून दिसत नाही. खरं तर जुलै महिन्यातच तो अपेक्षित होता. प्रत्येक आठवड्यात त्याची वाट पाहता पाहता आज तीन महिने उलटून गेले. आता तो सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाट पाहण्याचा कालावधी लांबतच चालला आहे.

सध्याचा पाऊस ‘ला-निना’चा आहे का?

गेल्या दोन महिन्यांतील पावसाचे एकूणच वर्तन पाहता यंदाचा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा माॅन्सूनचा कालावधी हा ‘ला-निना’ विरहित जातो की काय, अशी शंका येऊ लागली आहे. याचा खुलासा येत्या काही दिवसांत तर नक्की होईलच. आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपण पावसातील चढ-उताराचा अनुभवही घेतला आहे. ‘एन्सो’च्या तटस्थ अवस्थेने त्याला साथ दिली म्हणून ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात आणि सप्टेंबरमध्ये पाऊस होत आहे. परंतु हा पाऊस ‘ला-निना’चा समजू नये.

मग हा पाऊस नेमका कशामुळे होत आहे?

ऑगस्टमध्ये झालेला पाऊस ‘ला निना’चा नाही. जागतिक पातळीवरील नियमित घडणाऱ्या दुसऱ्या एका घटकामुळे म्हणजे ‘मॅडन ज्यूलियन ऑसिलेशन’मुळे देशाच्या इतर भागांबरोबर महाराष्ट्रातही भरपूर पाऊस झाला. परंतु ज्याची खूप अपेक्षा होती तो ‘ला निना’ आलाच नाही. खात्रीने येणार, येणार म्हणणारा ला -निना, संपूर्ण पावसाळा संपत आला तरी अजून आलाच नाही.

सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा असू शकतो?

सप्टेंबरच्या मासिक अंदाजानुसार हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव तसेच पूर्व नगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात सरासरी इतका, तर काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता जाणवते. पावसाळी हंगामातील सर्वांत कमी म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस हिंगोली जिल्ह्यात नोंदवला जाण्याची शक्यता जाणवते. उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते. राज्यात सरासरी पाऊस म्हणजेच ९६ ते १०४ टक्क्यांदरम्यान समजला जातो. टक्केवारी पाहता सप्टेंबरमधील पावसाची तीव्रता ही खूप अधिक असण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता जाणवते त्या ठिकाणी आगाप खरीप पिकांचे, भाजीपाल्याचे काढणीदरम्यान कदाचित अधिक पावसामुळे अडचणही होऊ शकते.

सप्टेंबर महिन्यात तापमान कसे राहू शकते?

संपूर्ण महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात दुपारी ३ वाजताचे कमाल तापमान व पहाटे ५ वाजताचे किमान तापमान यंदा सरासरीपेक्षा अधिक जाणवणार आहे. म्हणजेच दरवर्षीपेक्षा यंदा भादव्याची ताप किंवा हीट अधिक जाणवेल, तर पहाटेचा गारवाही कमी जाणवेल, अशी शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे ३ वाजेचे कमाल तापमान हे सप्टेंबरमधील सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणजे दिवसाचे तापमान अधिक म्हणून अधिक आर्द्रतेची निर्मिती आणि त्यामुळेच सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते. संपूर्ण महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात पहाटे ५ वाजताचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात किमान तापमान कमी असणार आहे. यामुळे ऊबदार रात्री जाणवतील व भल्या पहाटे दव अर्थात बादडचे प्रमाण कमी जाणवेल.

सप्टेंबरमध्ये पावसाचे वितरण कसे असू शकते?

रविवारपासून (ता.८) पुढच्या आठवडाभरात म्हणजे १५ सप्टेंबरपर्यंतच्या दुसऱ्या आठवड्यातही पावसाची शक्यता आहे. हा पाऊस म्हणजे सप्टेंबर महिन्यातील पावसाचे दुसरे आवर्तन व ऋण विसंगती पाहता ८ ते १२ सप्टेंबरच्या पाच दिवसांत मराठवाडा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची तर मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते. या आठवड्याच्या उत्तर्धात म्हणजे १२ ते १६ सप्टेंबरच्या दरम्यान मात्र मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल तर विदर्भात पावसाचा जोर कमी राहील. थोडक्यात, कोकण व खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत संपूर्ण आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता जाणवते. १६ ते ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजे शेवटच्या दोन आठवड्यांतील पाऊस हा ‘ला निना’च्या विकासनावर व माॅन्सूनच्या मुख्य आसाच्या सरासरी जागेच्या स्थितीवर अवलंबून आहे. तरी देखील माॅन्सूनच्या २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान पाच दिवसांच्या तिसऱ्या आवर्तनात पावसाची शक्यता जाणवते. थोडक्यात, सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यात सरासरी इतक्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

परतीचा पाऊस कधीपासून सुरू होईल?

देशाच्या अतिवायव्य टोकाकडील पश्‍चिम भागातून सहसा १ सप्टेंबरपूर्वी पाऊस माघारी फिरण्यास सुरुवात होत नाही. तर ती १ सप्टेंबर नंतरच होते. तर त्याच्या घोषणेसाठी खालील मुख्य वातावरणीय बदलांचा विचार केला जातो.

१) सलग पाच दिवस त्या भागात पावसाची गतिविधी थांबणे. म्हणजेच सलग पाच दिवस त्या भागात हवेच्या शुष्क वातावरणाचे प्राबल्य दिसते का, हे बघितले जाते.

२) जमिनीपासून साधारण दीड किलोमीटर उंचीपर्यंत हवेचे उच्च दाबाची प्रत्यावर्ते (म्हणजे चक्रीवादळाच्या विरुद्धची स्थिती ज्यातून हवेच्या उच्च दाब वातावरणातून तयार होणारा व घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बाहेर फेकणारा वेगवान भोवरा वारा) तयार होणे. म्हणून तर परतीचे मोसमी वारे जमिनीलगत पूर्वेकडून अंगावर आल्यासारखे भासतात.

३) हवेतील आर्द्रता खूप कमी होणे. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण कमी होणे म्हणजेच थोडक्यात हवेतील आर्द्रतेच्या सातत्याने कमी होण्याच्या प्रमाणाचे अवकाशीय सातत्याचे निरीक्षण करणे. हे डोळ्यापुढे प्रतिमा उभी राहील अशा उपग्रहीय चित्रातून तसेच त्या भागातील रेखाटलेल्या दैनिक ‘टी-फाय’ आलेखातून बघितले जाते.

४) उत्तरेतील मैदानी भागात दिवसाचे तापमान वाढते. रात्रीचे तापमान घटते. आकाश निरभ्र होते.

साधारण १७ सप्टेंबरपासून देशाच्या वायव्य भागातून माॅन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. परतत असताना साधारण १९ दिवसांनी म्हणजे सरासरी ५ ऑक्टोबरच्या दरम्यान ईशान्य दिशेकडून महाराष्ट्राच्या प्रवेशद्वाराजवळ आणि पाच दिवसांतच म्हणजे १० ऑक्टोबरला महाराष्ट्रातून पूर्णपणे पाऊस निघून जातो. म्हणजे या पाच दिवसांतच नैर्ऋत्येकडून येणारे बाष्पयुक्त वारे व ईशान्येकडून येणारे कोरडे वारे यांच्या संयोगातून (टकरीतून) ऊर्ध्वगमन होऊन सांद्रीभवनाची प्रक्रिया घडून येते व महाराष्ट्रात पाऊस पडतो. महाराष्ट्रात पडणाऱ्या या पावसाला परतीचा पाऊस म्हणू या. अर्थात, महाराष्ट्रात हा कालावधी कधी कधी एक दिवसापासून आठ दिवसांपर्यंत असू शकतो. अशाच पद्धतीने या वर्षी परतीच्या पावसाचे वर्तन असेल. माॅन्सून उशिरा परत फिरून देशातून उशिरा जाईल या शंकेला वाव नाही.

ऑक्टोबर महिन्यात पाऊस कसा राहू शकतो?

‘ला निना’च्या पार्श्‍वभूमीवर व ऑक्टोबर महिन्यातील ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यानच्या पाऊस आवर्तनच्या शक्यतेवरून ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. खरीप काढणीच्या वेळेस पावसामुळे नुकसानीची शक्यता कमीच जाणवते. तसेच रब्बी हंगामातील पिकांच्या बाबतीत ऑक्टोबरमध्ये भाकीत करणे योग्य ठरेल. त्यामुळे आताच रब्बी पेरण्यांची घाई करण्याची गरज नाही. रब्बीच्या पिकांची स्थिती या वर्षी नक्कीच चांगली राहील, असे वाटते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT