Crop Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Value Chain : मूल्यसाखळीतील पिकांच्या परिपक्वता निर्देशांकाचे महत्त्व

Crop Maturity Indices : पिकाची परिपक्वता ही बहुतांश वेळी शेतकऱ्यांच्या पारंपरिक अनुभवावर जोखली जाते. मात्र पिकाच्या परिपक्वतेचा निर्देशांकांबाबत व काढणीच्या योग्य वेळेबाबत शेतकऱ्यामध्येही जागरूकता निर्माण होण्याची आवश्यकता आहे. परिपक्वता निर्देशांकाचे महत्त्व जाणून घेताना प्रथम दृश्यमान निर्देशांकाची माहिती घेऊ.

Team Agrowon

डॉ. विक्रम कड, डॉ. गणेश शेळके, डॉ. सुदाम काकडे

भारतीय कृषी व्यवस्थेत फळे व भाजीपाला उत्पादन हा अविभाज्य घटक आहे. त्यांच्या दर्जेदार उत्पादनासाठी योग्य जमिनीची निवड, योग्य वाण, दर्जेदार व निरोगी बियाणे - रोपे, वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये, सिंचन व्यवस्थापन, आंतरमशागत, कीड-रोग व्यवस्थापन इ. बाबींना महत्त्व आहे.

त्याच प्रमाणे इतक्या कष्टानंतर पिकवलेल्या पिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. हा शेत व्यवस्थापनातील अंतिम टप्पा आहे. काढणी योग्य वेळेत न केल्यास पुढील सर्व मूल्यसाखळीत उत्पादनाचे मोठे नुकसान होते. प्रामुख्याने त्यातील पोषणमूल्य आणि टिकवण क्षमता कमी होते. बाजारपेठेत शेतीमालास कमी मूल्य मिळते.

पिकाची परिपक्वता ही बहुतांश वेळी शेतकऱ्यांच्या पारंपरिक अनुभवावर जोखली जाते. मात्र पिकाच्या परिपक्वतेचा निर्देशांकांबाबत व काढणीच्या योग्य वेळेबाबत शेतकऱ्यामध्येही जागरूकता निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे काढणीनंतर उत्पादनाची गुणवत्ता टिकेलच, वाहतूक, साठवणूक व हाताळणीतील नुकसानही टळेल. या सोबतच शेतकऱ्यांना उत्तम मूल्य मिळण्यास मदत होईल.

परिपक्वतेचे मूल्यांकन

शेतीमालाच्या परिपक्वतेचे मूल्यांकन करणे हे कृषी शास्त्रातील महत्त्वाचे संशोधन समजले जाते. त्यासाठी आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने काढणी परिपक्वतेच्या निर्देशांकाचे प्रगत तंत्र अलीकडे उपलब्ध होत आहे. परिपक्वतेशी संबंधित जीवनशास्त्रीय स्थिती लक्षात घेऊन पिकांची काढणी योग्य वेळेवर करता येते. त्यामुळे पोषकता, स्वाद टिकून राहण्यासोबत शेतीमाल टिकवण वाढते. त्याचा फायदा बाजारपेठेतील सर्व संबंधित घटकांना व ग्राहकांना होतो.

कापणीवेळी उत्पादनाने परिपक्वतेचा योग्य टप्पा गाठलेला असावा लागतो. अन्यथा अपरिपक्व किंवा अतिपक्व फळांची कापणी होते. ते पुढील मूल्यसाखळीमध्ये अनियंत्रितपणे पिकतात. त्याची गुणवत्ता कमी होते. म्हणूनच फार लवकर किंवा उशिरा काढणी ही त्या शेतकऱ्याची व्यवस्थापनातील त्रुटी मानली जाते. अशा एक दोन फळांमुळे संपूर्ण उत्पादनाची गुणवत्ता व्यापारी कमी जोखतात.

एकाच पिकाच्या विविध जातींचा व हवामानातील विविध घटकांचाही परिपक्वतेवर परिणाम होत असतो. त्यामुळे जातीप्रमाणेच स्थानिक हवामानाप्रमाणे कापणीचेही निकष स्थापित करण्याची गरज असते. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले असता परिपक्वता निर्देशांकाचे वर्गीकरण मुख्यतः दृश्यमान, भौतिक आकारीकीय आणि रचनात्मक बदल, काढणीचे दिवस, रासायनिक आणि शारीरिक निर्देशांकामध्ये केले जाते. यामध्ये फळे व भाजीपाला त्यांच्या श्‍वसनक्रिया, फळातील साखर, आम्लता आणि पोत यांच्या आधारे परिपक्वतेचा अंदाज घेतला जातो. योग्य त्या परिपक्वतेला काढणी केल्यास उत्पादनाचे शारीरिक, रासायनिक गुणधर्म उत्तम राहतात.

काढणी निर्देशांकांचे उद्देश व महत्त्व

उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे : काढणीची वेळ या घटकाचा फळे, भाज्या आणि अन्य कृषी उत्पादनांची पोत आणि चव यावर थेट प्रभाव पडतो. योग्य परिपक्वतेत काढल्यास चव, रंग, पोत व पोषणमूल्ये टिकून राहतात.

साठवणुकीचा कालावधी वाढवणेः योग्य काढणीमुळे टिकवणक्षमता वाढते. त्यामुळे माल त्या प्रमाणात दूरपर्यंतच्या बाजारपेठेमध्ये किंवा अन्य सर्व निकषांचे पालन केलेले असल्यास अन्य देशांमध्येही निर्यात करणे शक्य होते.

बाजारपेठेतील मागणी पूर्ण करणे ः बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांची, विक्रेत्यांची व ग्राहकांची परिपक्वतेसंदर्भात एक विशिष्ट मागणी असते. विशिष्ट रंग, चव, पोत आणि आकर्षकता याबाबत वेगवेगळ्या बाजारपेठेत ग्राहकांची मागणी वेगवेगळी असू शकते. ती जाणून पूर्ण केल्यास प्रिमिअम दर मिळू शकतो.

आर्थिक फायदे : केवळ वेळेवर काढणी केली म्हणून चांगले मूल्य मिळू शकते. एकूण फायद्यात वाढ होते.

नुकसान टाळणे : योग्य काढणीमुळे काढणीपश्चात विविध हाताळणी व वाहतूक यामध्ये होणारे नुकसान कमी होते.

साठवण, वितरण : योग्य वेळी काढणी केलेल्या उत्पादनाची साठवण अधिक काळासाठी करता येते.

तंत्रज्ञानाचा वापर ः परिपक्वता निर्देशांकांचा वापर करून शेतीमाल काढणीचे यांत्रिकीकरण सुलभ होते.

पृष्ठभागाचा किंवा सालीचा रंग : मुख्य रंग हा सामान्यतः पृष्ठभागाचा किंवा सालीचा रंग म्हणून ओळखला जातो. बऱ्याच फळे आणि भाजीपाला परिपक्वतेचे हे सर्वात स्पष्ट सूचक आहे. प्रत्येक फळ किंवा भाजी पिकल्यावर त्याच्या रंगात बदल होतो. त्यानुसार काढणीची वेळ ठरविण्याची अंदाजावर आधारीत पद्धत आजही सर्वत्र वापरली जाते.

फळांचा रंग : रंगामध्ये झालेल्या बदलांवरून शेतकऱ्यांना काढणीसाठी योग्य वेळ ठरवता येतो. उदा. संत्र्यांचे फळ पूर्णपणे पिकल्यावर ते गडद केशरी रंगाचे होतात. आंब्यांचा पिवळा रंग वाढल्यावर आणि टॉमॅटोचा लाल रंग झाल्यावर काढणी केली जाते.

भाजीपाला रंग : भाज्यांसाठी रंग एक महत्त्वाचा निकष आहे. गाजर, बटाटा आणि वांग्याचा रंग बदलला की ती काढणी योग्य होतात. भोपळा परिपक्व झाल्यावर त्याचा रंग सोनेरी, गडद तपकिरी होतो.

देठाचा रंग : देठ व त्याच देठावर फळाजवळचे शेवटचे पान पिकल्यावर पिवळे होते. त्यावरून काही फळांची काढणी केली जाते. उदा. फणस.

आकार आणि आकारमान : फळांचा आणि भाज्यांचा आकारमान हा देखील काढणीसाठी महत्त्वाचा सूचकांक आहे. काढणीच्या वेळी फळाचे आकार नक्कीच मोठे आणि योग्य असावे लागतात. उदा. आंब्याचा आकार त्याच्या पिकण्याच्या अवस्थेत मोठा होतो. आंब्याचे फळ आकाराने मोठे, गुळगुळीत आणि योग्य आकाराचे होते. सफरचंद पिकल्यावर त्याचा आकार मोठा होतो आणि त्याचा रंग गडद होतो. भोपळ्याचा आकार मोठा होतो आणि रंग अधिक चकाकणारा होतो.

ग्राउंड कलर : बहुतेकदा देठाच्या आणि त्याच्या विरुद्ध टोकाभोवती दिसणाऱ्या या रंगाला ग्राउंड कलर असे म्हणतात. बहुतेक फळांवर ते अस्पष्ट असते, परंतु ते योग्य प्रकारे परिपक्व फळांचे चांगले सूचक आहे. उदा. लाल सफरचंदाच्या जातींवर ग्राउंड कलर लाल किंवा गुलाबी पट्ट्यांमध्ये दिसतो.

बियांचा रंग : फळांच्या आणि भाज्यांच्या काढणीसाठी बियांचा रंग बदलणे महत्त्वाचे असते. पपई, सफरचंद आणि नासपातीमध्ये बियांच्या रंगावरून परिपक्वता ठरवता येते. जर बियांच्या आवरणाचा रंग पूर्णपणे गडद तपकिरी झाला असेल तर फळे काढणीसाठी पूर्णपणे तयार झालेले आहेत असे समजतात. तिळाच्या शेंगांचा रंग काळा होताच त्याची काढणी केली जाते.

पाने सुकणे : केळी, बटाटा, कांदा आणि लसूण या पिकांमध्ये पाने सुकणे हे एक परिपक्वतेचे लक्षण आहे.

पानांचे रंग : पानांचे रंग आणि त्यांची स्थिती देखील काढणीसाठी महत्त्वपूर्ण ठरते. परिपक्व पिकांमध्ये पानांचा रंग गडद हिरव्या रंगापासून पिवळा, तपकिरी आणि लाल रंगात बदलतो. हा रंग बदल ही काढणीचा एक सूचकांक असतो. उदा. तुरीच्या पिकात परिपक्व शेंगांच्या पानांचा रंग हलका पिवळा किंवा तपकिरी होतो. कोबी परिपक्व होताना पानांचा रंग गडद हिरव्या रंगापासून पिवळा होतो.

- डॉ. विक्रम कड, ०७५८८०२४६९७

कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT