Animal Market Maharudra Mangnale
ॲग्रो विशेष

Rural Maharashtra Story: हंडरगुळी बाजारचं नातं संपलं!

बाजारात शेणा-मुताच्या मातीवर सतरंजी नाही तर एखादं पटकूर अंथरूण त्यावर डब्बे सोडून माणसं जेवतात. वर्षानुवर्षांची त्यांची ही सवय आहे.त्यांचाही नाईलाज आहे.

महारुद्र मंगनाळे

Animal Market : परवा हंडरगुळीच्या बाजारला गेलो होतो.आमच्या एक वर्षे वयाच्या देवणी खोंडाला जोडीदार खोंड घ्यायचा होता.सकाळी त्याला टेम्पो मध्ये टाकण्यापासून ते बाजारात उतरेपर्यंत त्याने आमचे बेहाल केले.

चालक संगम,आमचे शेजारचे शेतकरी मित्र मंगेश सारोळे व मी असे तिघेजण होतो.पहिल्यांदाच गोठा सोडला असल्याने,ते थांबायला तयार नव्हतं.

वयाच्या दहा-बारा वर्षांपासून मी हंडरगुळीचा जनावरांचा बाजार बघतोय.सुरूवातीला वडिलांसोबत,नंतर पत्रकार म्हणून आणि गेली बारा वर्षे म्हशीपालक म्हणून.या सुमारे ५० वर्षांत जनावरांच्या बाजारात कसल्याच सुविधा निर्माण झाल्या नाही.

अख्ख्या बाजारात जनावरांसाठी सोडा,माणसांना बसायलासुध्दा शेड नाही,एकही निवारा नाही की झाड नाही.म्हशींचा बाजार तर हागणदारीतच भरतो.जनावरांना पिण्याच्या पाण्याचा हौद नाही.तेव्हाही आणि आताही घागरीवर पाणी विकत घेऊन जनावरांना पाजावं लागतं.

तेव्हा चहा,नाष्त्याच्या जशा टपऱ्या होत्या तशाच आजही आहेत.तेव्हा जसा बेक्कार चहा मिळायचा तसाच आजही मिळतो.तेच भजे,तोच चिवडा आणि च्या.पाच-सहा राज्यातून शेकडो व्यापारी,खरेदीदार, शेतकरी इथं येतात पण एकही चांगलं हॉटेल नाही.

बाजारात शेणा-मुताच्या मातीवर सतरंजी नाही तर एखादं पटकूर अंथरूण त्यावर डब्बे सोडून माणसं जेवतात .वर्षानुवर्षांची त्यांची ही सवय आहे.त्यांचाही नाईलाज आहे.

भयंकर उन्हात फिरताना कदरून गेलो.एकदम बेक्कार मुड बनला.अशा उन्हात केवळ पाण्यावर भागत नाही.शुगर लागते.पहिला काळा चहा पिला.त्यात पत्ती नावालाच.भरपूर साखर.स्वत:ला शिव्या घालत तो चहा पिला.पुन्हा तासाभराने बाजारातील दलाल मित्राने फारच आग्रह केला म्हणून पुन्हा दुसऱ्या टपरीवर काळा चहा मागवला.

पत्ती जास्त टाका,असं सांगूनही टपरीवाल्याने तसाच चहा दिला.दोन घोट पिऊन त्याच्यासमोरचं मातीत ग्लास रिकामा करून,पैसे दिले.

माझ्या या कृतीची त्याच्या चेहऱ्यावर कसलीच प्रतिक्रिया उमटली नाही.मला हेच अपेक्षित होतं.इथली माणसं व्यवसाय करीत नाहीत.पैसे घेऊन लोकांवर उपकार करीत असतात..दलिंदर यांनाच म्हणत असावेत!

ग्रामीण भारताचं जीवनमान किती उंचावलयं,याचा हा ही एक पुरावा!

दोन तासानंतर आमच्या खोंडाला जोड लागेल असं खोंड मिळालं.विक्रेता शेतकरी असल्याने फार घासाघीस न करता,वीस हजाराला खोंड विकत घेतलं. त्यांना हटवर टेम्पोत पाठवून दिलं.माझे अंबाजोगाईचे मित्र सुर्यकांत यांच्यासाठी ही जोड लावलीय.आठवडाभरात ही जोडी रुद्रा हट सोडेल.

बऱ्याच दिवसांपासून प्रत्यक्ष भेट होत नाही म्हणून उदगीरहून शिवाजी आपटे हा मित्र हंडरगुळीला भेटायला आला होता.दोन तास तिथंच गप्पा मारत बसलो.विषय होता शेतीचा,जनावरांचा व बाजारचा.

शेतीची जशी दूरवस्था झालीय तशीच जनावरांच्या बाजारांची.नैराश्याचे ढग कायमच दाटून आलेत बाजारावर.शेकडो वेळा मी हंडरगुळीचा बाजार बघितलाय.

गेल्या काही वर्षांत उदासी वाढतच चाललीय.शेतकऱ्यांसोबत दलालही बरबाद झालेत.त्यांच्याही कहाण्या मी ऐकल्यात.पण एवढी उदासी मला पहिल्यांदाच जाणवली.

शेतीत कामाला माणूस नाही,जनावरं सांभाळणार कशी? दोन-चार जनावरांसाठी सव्वा लाखाचा गडी परवडणार कसा?....आणि तोही मिळत नाही.हे प्रत्येक शेतकरी सांगत होता.कोणालाच जनावरं नको आहेत.अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबात घरातील एकही मुलगा शेतीत नाही.शेती कसणारा वारस नाही.

मित्र शिवाजी सांगत होता... माझ्या आयुष्यातील हे पहिलं वर्ष आहे की,घरात व शेतात एकही जनावर नाही.माझ्या जन्मापासून मी घरात कायम गाय बघितल्याय.

गाईचं दुध,दही,तुप खाऊनच मोठा झालोय...खूप प्रयत्न केला,एक तरी गाय घरी ठेऊ पण शक्य झालं नाही.परिस्थिती हाताबाहेर गेलीय.नाईलाज झाला..खूप वाईट वाटतं पण करू काय? परिस्थितीसमोर हतबल झालोय मी.

शिवाजीच्या सालगड्यांचे गेल्या चार वर्षांतील नुसते किस्से लिहिले तरी,एक नवं पुस्तक होईल.

मीही बालपणापासून गाई-म्हशी बघतच वाढलोय.दोन दोन गुराखी होते.शालेय आयुष्यात मी ही जनावरं राखली. मी शेतीत येण्यापूर्वी चारच जनावरं होती.मी शेतीत आल्यानंतर म्हशीपालनाला सुरूवात केली.कोरडवाहू शेतकऱ्यांना पुरक व्यवसाय म्हणून एक मॉडेल उभं केलं.

सात-आठ वर्षे ती यशकथा राहिली.कोरोनानंतर ती अपयशकथा बनली.कोरोनात बसलेले जनावरांचे बाजार पुन्हा उठलेच नाहीत.

या बाजारातही कधी नव्हे ती अनिश्चितता निर्माण झालीय. दोन वर्षांपूर्वी छोटी-मोठी ४२ जनावरं होती.ती संख्या आता ७वर आलीय.ती चारवर आणायचीय.कारण तेवढीच जनावरं आम्ही स्वत: सांभाळू शकतो.

बाजारच्या समस्यांवर कितीवेळा लिहिलं.जिल्हा दैनिकापासून राज्य पातळीवरील दैनिकात,साप्ताहिकात.

लोकांनी खूप कौतूक केलं.शेतकरी मित्र पत्रकार अशी माझी ओळख निर्माण झाली. मात्र प्रत्यक्ष परिस्थितीत काहीच बदल झाला नाही.५०वर्षांपूर्वी बाजारची स्थिती जी होती तीच आजही आहे.

शेतीबाबत तरी वेगळं काय घडलं? १९८५ला पत्रकारितेत आल्यापासून शेतीतील प्रश्नांवर लिहितोय.शेतीत राहायला आल्यापासून तर रोजनिशीसारखं दररोज लिहतोय.

ॲग्रोवन मध्येही चार-पाच वर्षांपासून लिहतोय.भरपूर कौतूक मिळालं आणि या लेखनाची पुस्तकं निघाली.प्रत्यक्षात शेती अधिकच बिकट बनलीय.ना सरकारने धोरणं बदलली ना शेतकरी शहाणे झाले....

चर्चेचा समारोप करताना शिवाजीला म्हटलं,या सगळ्या लेखनाचं एका ओळीत सार सांगायचं म्हणजे,वाळूत मूतलं,फेस ना पाणी. किती दिवस तेच ते करायचं?

इतरांचं माहिती नाही.मी मात्र शेतीतील अनुभवातून सतत धडा घेत राहिलो.माझी आनंददायी शेतीची कल्पना माझ्यापुरती तरी रूजवली.मी ती प्रत्यक्ष जगतोय.सगळे प्रयोग केले.

तोटा,अव्यवहार्यता लक्षात घेऊन सोडून दिले.कशातही अडकून पडलो नाही.म्हशीपालनाच्या प्रयोगात मी स्वत: सहभागी होतो.सात-आठ वर्षे तो बऱ्यापैकी यशस्वी होता.मात्र गेल्या तीन वर्षांत बाजार आणि सालगडी दोन्ही प्रतिकूल आहेत.

सगळ्या सुविधा निर्माण केलेल्या असल्याने,तो अयशस्वी होऊ नये म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले.पण हे शक्य नाही,या मताला आल्याने थांबलो. शेवटी शेतीत एकटा माणूस काहीच करू शकत नाही.मी एकाचवेळी विविध व्यापात असतो.

आयुष्यात मी पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून काहीच केले नाही.दैनिकात साप्ताहिकात,प्रकाशनात मी अग्रभागी होतो.प्रकाशनात आजही मी मुख्य खांब आहे.म्हणून ते नीट आहे.

शेतीतही मी स्वत: कष्ट करतोय.पण सालगडी ही डोकेदुखी बनलीय.तो विकतचा त्रास बनला.यातून मुक्त होणं हाच पर्याय होता.पशूपालन हे माझ्या शेतीतील आनंददायी जगण्याला अडथळा ठरत होते.ते बंद करणे हाच पर्याय होता.तो स्विकारला.

यापुढील काळात, भविष्यात मी मोठ्या प्रमाणात पशूपालन करण्याची अजिबात शक्यता नाही.त्यामुळं हंडरगुळीच्या जनावरांच्या बाजारलाही जाण्याचं कारण नाही.शेतीचं शोषण करून शहरी बांडगुळं पोसणं हे सरकारचं अधिकृत धोरण असल्याने,शेतीला चांगले दिवस येण्याची सुतराम शक्यता नाही.

शेतकऱ्यांनी कितीही ठरवलं तरी,शेती करून त्यांचं भलं होणार नाही.शेतीवरचं अवलंबित्व कमी करणं,कमीत कमी जोखमीची शेती करणं किंवा शेतीतून बाहेर पडणं,एवढंच त्यांच्या हाती आहे.शेतीत त्यांच्या वाट्याला आनंददायी जगणं येणं कठीण आहे.

त्यासाठी त्यांना माझा शेतीतून प्राप्तीची अजिबात अपेक्षा नसणारा, निसर्गपुरक आनंददायी शेतीचा मार्ग अवलंबवा लागेल.अर्थात हे सगळ्यांना शक्य नाही.

परवा हंडरगुळीचा बाजार सोडताना थोडा भावूकही झालो.अनेक वर्षांपासूनचे या गावाशी असलेले ऋणानुबंध मी तोडून टाकत होतो...त्याला गुडबाय करताना म्हटलं,...तुझे भोग कधी संपतील असं दिसत नाही...ते भोगणं हेच तुझं जगणं.

मी ते मांडून थकलो...यापुढं मी तुझं रडगाणं मांडणार नाही.तुझ्याशी असलेलं माझं नातं आता संपलं...

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT