Sugarcane Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Productivity : कशी वाढेल उसाची गोडी?

Sustainable Agriculture : ऊस पट्ट्यातील जमिनीची ढासळलेली परिस्थिती, घटलेली ऊस उत्पादकता, ऊस पिकापासून दुरावत असलेला शेतकरी या संकटामध्ये साखर उद्योग सापडला आहेत. ऊस उत्पादकांच्या दृष्टीने साखर कारखाने एक महत्त्वाचा प्रक्रिया उद्योग आहे.

डॉ. भास्कर गायकवाड

डॉ. भास्कर गायकवाड

Indian Agriculture : ऊस पीक त्याच्या गुणाप्रमाणेच गोड आहे. उसापासून साखर, गूळ हे गोड पदार्थ तयार होतात तर पेट्रोलला पूरक इंधन इथेनॉलही उसापासून तयार होते. उसापासून पेपर तयार होतो, तसेच कारखान्यासाठी लागणारी विविध रसायनेही तयार होतात. साखर कारखान्यामध्ये बायोगॅस प्‍लांट उभारून गॅस तयार करता येतो.

बायोगॅसपासून विद्युत निर्मितीचे प्रयोगही यशस्वी झालेले आहेत. पेट्रोल हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असून, दरवर्षी दोन ते अडीच लाख कोटी रुपये पेट्रोलच्या आयातीवर खर्च होतात. ब्राझीलसारख्या देशामध्ये उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. उसाच्या माध्यमातून ब्राझील इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण देश झालेला आहे.

उसापासून साखर आणि गुळाव्यतिरिक्त इतर अनेक उपपदार्थ तयार करता येत असले, तरीही देशांतर्गत तसेच निर्यातीसाठी साखरेची मागणी वाढत राहणार आहे आणि त्याचा फायदा ऊस उत्पादकांना होणार आहे. म्हणूनच उसाचे भवितव्य फारच चांगले आहे. ऊस शेतीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.

उसाखालील क्षेत्रात वाढ करण्याऐवजी कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्यासाठी सर्वांत जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. ऊस शेती करत असताना दोन बाबींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यामध्ये जमिनीची प्रत सुधारणा आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन. उसाचे पीक घेतल्यामुळे जमिनीची प्रत ढासळण्याऐवजी सुधारणा कशी करता येईल, याबाबत जास्त प्रयत्न करता येऊ शकतात.

पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आणि काढल्यानंतरही जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कसा वाढविता येईल यावरच भर देण्याची गरज आहे. शक्य असेल तेथे उसामध्ये किंवा ऊस पिकापूर्वी हिरवळीचे पीक घेणे, तसेच पिकाला काही प्रमाणात सेंद्रिय पदार्थ देणे गरजेचे आहे.

उभ्या उसाचे पाचट काढून त्याचे आच्छादन करणे किंवा ऊस तुटून गेल्यानंतर उसाचे पाचट न जाळता त्याचे आच्छादन करणे किंवा मशिनच्या साह्याने पाचटाचे जागेवरच तुकडे करून आच्छादन करणे यांसारख्या बाबी जमिनीची गुणप्रत सुधारणे, उत्पादन खर्च कमी करणे, तसेच उसाचे उत्पादन वाढविणे यासाठी फारच उपयुक्त आहेत.

उसाचे पाचट म्हणजे निसर्गाने उसाला दिलेले वरदान आहे, ज्याच्या माध्यमातून उसामुळे जमिनीची झालेली झीज भरून निघते. जमिनीला पाचटाच्या माध्यमातून सेंद्रिय खाद्यपदार्थ मिळतात. कमी पाण्यात उसाचे पीक घेण्यासाठी पाचट आच्छादनाशिवाय दुसरा मार्ग नाही. याशिवाय सूक्ष्मसिंचन म्हणजेच ठिबक, तसेच तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून पाण्यात बचत होते.

तसेच पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होऊन उत्पादन वाढते. जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी होऊन जमीन सुधारण्यास मदत होते. उसाची सुरुवातीला ९० ते १०० दिवसांपर्यंत योग्य पद्धतीने काळजी घेतली, तर हमखास उत्पादन मिळते. त्याचबरोबर खोडव्याचे चांगले उत्पादन मिळविणेही पहिल्या पिकाच्या सुरुवातीच्या वाढीवरच अवलंबून असते. याचा विचार करूनच पिकाची निगा ठेवणे महत्त्वाचे आहे.

राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी सुरुवातीपासूनच उसाची तोडणी करणे आणि त्याचे गाळप करणे हा एकमेव कार्यक्रम राबविला. जमीन व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब ऊस बागायतदारांनी करावा, यासाठीचे ठोस कार्यक्रम म्हणावे त्या प्रमाणात राबविले गेले नाहीत.

ऊस विकास विभाग प्रत्येक कारखान्यांनी सुरू करूनही त्याला सतत दुय्यम स्थान मिळालेले आहे. ऊस तोडणीचा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर वेळ मिळाला, तर ऊस विकासाचा कार्यक्रम राबविणे या बाबी आज ऊस कारखान्यांच्या अंगलट आल्या आहेत.

ऊस क्षेत्रातील जमिनीची ढासळलेली परिस्थिती, घटलेली ऊस उत्पादकता, ऊस पिकापासून दूर जात असलेला शेतकरी या संकटामध्ये ऊस कारखाने सापडले आहेत. शेतकऱ्‍यांना अनुदान दिले म्हणजे ऊस विकास कार्यक्रम झाला हा सरळ अर्थ काढला हीच खरी चूक झाली. अनुदानामुळेच तंत्रज्ञान वापरले जाते ही संकल्पनाच चुकीची आहे. कारण इतर पिकांमध्ये जेथे जास्त पैसा मिळतो तेथे अनुदान नसतानाही तंत्रज्ञानाचा वापर होतो आणि उत्पादकता वाढविली जाते याची प्रचिती येते. म्हणून ऊस विकास कार्यक्रमाचे नियोजन आणि त्यानुसार कृती कार्यक्रम तयार करणे फार गरजेचे आहे.

अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा ऊस विकासाचा कृती कार्यक्रम तयार करून त्याचा अवलंब करावा लागतो. जमीन सुधारणा, पाणी व्यवस्थापन, पीकपद्धती यांसारख्या दीर्घकालीन कृती कार्यक्रमावरच उसाची उत्पादकता अवलंबून असते. उसाची उपलब्धता, पिकाची फेरपालट, जातीचा प्रसार किंवा अन्य तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अल्प किंवा मध्यम मुदतीचा कृती कार्यक्रम तयार करून तो राबविता येऊ शकतो.

ऊस विकासाच्या कार्यक्रमावर भर देऊन ऊस उत्पादन तंत्रज्ञान प्रसार करून त्याचा अवलंब वाढला, तर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातच ताजा व चांगल्या प्रतीचा आणि अधिक ऊस गळीतासाठी उपलब्ध होऊन साखर कारखानदारी फायदेशीर होईल. साखर कारखान्यांच्या स्तरावर उसाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी एक स्थिर ठेव निधी निर्माण केला आणि हा निधी साखरेच्या भावातील चढ-उतारामध्ये होणाऱ्या फायद्या- तोट्यासाठी वापरता येईल.

त्यामुळे ऊस उत्पादकांनाही सारख्या प्रमाणात दरवर्षी भाव मिळाल्यास त्यांच्याही पिकामध्ये सातत्य राहील. म्हणजेच शेतकरी नियोजन करून कारखान्यांच्या गरजेनुसार उसाचा पुरवठा करू शकेल. ऊर्जानिर्मिती, इथेनॉल निर्मितीसाठी जास्तीचा ऊस वापरण्यासाठी यंत्रसामग्रीमध्येही बदल करून गरजेनुसार आणि मागणीनुसार योग्य निर्णय घेता येईल.

स्पर्धेच्या युगात वावरत असताना परिवर्तन करणे हीच काळाची गरज आहे. साखर कारखाने म्हणजे राजकारणाचा केंद्रबिंदू न होता ऊस उत्पादकांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रक्रिया उद्योग आहे, याची जाणीव ठेवून ऊस पिकाच्या विकासावर विचार होणे क्रमप्राप्त आहे. या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजेच उसाच्या पिकामध्ये जी गोडी आहे तीच गोडी उसाचे उत्पादन घेऊन उत्पादनाची रक्कम होईपर्यंत टिकली पाहिजे. निसर्गाने उसाला गोडपणा दिला त्यामध्ये मीठ कालवण्यापेक्षा आणखी साखर कशी मिळविता येईल, याचा विचार होणे महत्त्वाचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT