Honey Agrowon
ॲग्रो विशेष

Honey : मध पंचामृतातील एक अमृत

डॉ. भास्कर गायकवाड

Honey : आपण एक चमचा मधाचे (Honey) ज्या वेळी सेवन करतो, त्या वेळी आपल्याला एकदम ताजेतवाने वाटते. तोंडाला एक प्रकारची गोडी- मधुर चव येते. याबरोबरच शरीराला अनेक अन्नघटक मिळतात. मधाचे सेवन आरोग्यदायी असून, त्यामुळे प्रतिकारक्षमता वाढते.

हे सर्व असले, तरी एक चमचा मध निर्मितीसाठी (Honey Production) मधमाशीला किती श्रम करावे लागतात, याचा मात्र आपण कधीही विचार करत नाही. एक मधमाशी (Honey Bee) सर्वसाधारणपणे ४५ दिवस जगते आणि तिच्या आयुष्यभराची एकूण कमाई असते ती फक्त अर्धा चमचा मध!

मधमाशी तिच्या घरापासून दोन किलोमीटर्सपर्यंत जाऊन फुलांतून मकरंद - परागकण गोळा करते. यासाठी ती २४ कि.मी. प्रतितास एवढ्या वेगाने प्रवास करू शकते. मधमाशी आपल्या घरातून दिवसभरात ८ ते १० वेळा बाहेर पडते. या एका फेरीला आपण उड्डाण म्हणू.

म्हणजेच मध- मकरंद गोळा करण्यासाठी ती दररोज ८ ते १० उड्डाणे घेते. प्रत्येक उड्डाणामध्ये ती ५० ते १०० फुलांना भेटी देते. यावरून लक्षात येईल, की मधमाशी दिवसभरामध्ये ५०० ते १००० फुलांना भेट देते. मधमाशी तिच्या सुरुवातीच्या आयुष्यात घरातील इतर कामेही करते.

सर्वसाधारणपणे २० दिवसांनंतर ती मध गोळा करण्यासाठी बाहेर पडते; म्हणजे मधमाशी तिच्या आयुष्यातील २० ते ३० दिवस मध गोळा करण्याचे काम करते. या सर्व बाबींचा विचार केला, तर मधमाशी १५ ते २० हजार फुलांना भेट देते आणि त्यापासून तिला मिळतो फक्त अर्धा चमचा मध.

यावरून मधमाशीच्या दृष्टीने मध किती मौल्यवान आहे हे आपल्या लक्षात येईल. परंतु आपल्या दृष्टीने यापेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट आहे ती म्हणजे एक मधमाशी तिच्या आयुष्यात १५ ते २० हजार फुलांचे परागीभवन करते. या फुलांना तिने केलेल्या परिसस्पर्शामुळे त्यांचे रूपांतर धान्यामध्ये, फळामध्ये होते.

मधमाशीच्या एका पोळ्यात २० ते ५० हजार मधमाश्या असतात. यावरून आपल्या लक्षात येईल, की एक मधमाशीचे पोळे कोट्यवधी फुलांचे परागीभवन करत असते. मधमाशीच्या एका पेटीतून वर्षाला १० ते ४० किलोपर्यंत मध मिळते.

एक किलो मध तयार करण्यासाठी मधमाशीला ४० लाख फुलांना भेटी द्याव्या लागतात. एका मधमाशीच्या पोळ्यापासून २० किलो मधाचे उत्पादन गृहीत धरले, तर एक मधमाशीचे पोळे ८०० लाख फुलांचे परागीभवन करते.

आजही मधमाशीद्वारे चाललेल्या परागीकरणाच्या या (अप्रत्यक्ष) कार्याला आपण पाहिजे तेवढे महत्त्व देत नाही. पण खरेच किती महान कार्य करत असते मधमाशी!

मधमाशी म्हटले म्हणजे आपण पहिला विचार करतो तो म्हणजे मधाचे उत्पादन. या पृथ्वीतलावरील पहिला गोड पदार्थ म्हणजे मध, जो मधमाशी फुलांपासून तयार करते. मधमाशी आपल्या तोंडाची नळी फुलांमध्ये घालून त्यातून मकरंद हा गोड पदार्थ ओढून घेते.

हा मकरंद ती तिच्या पोटामध्ये असलेल्या मधाच्या पिशवीकडे पाठवून तेथे साठविला जातो. या मधाच्या पिशवीमध्ये विशिष्ट प्रकारची विकरे (एन्झाइम्स) मिसळली जातात. ज्याद्वारे या मकरंदाचे रूपांतर मधामध्ये होते.

मकरंदामध्ये असलेल्या साखरेचे ग्लुकोज, फ्रुक्टोज यांसारख्या आरोग्यदायी अशा गोड पदार्थांमध्ये रूपांतर करण्याचे काम तिच्या पोटात असलेल्या मधाच्या पिशवीमध्ये सुरू होते. येथेच मकरंदाचे रूपांतर मधामध्ये होते. मकरंद

अत्यंत पातळ आणि गोड असलेला पदार्थ; पण मधाच्या पिशवीतील विविध विकरांमुळे घट्ट आणि गोड मधामध्ये रूपांतर होते. मधाची पिशवी भरल्यानंतर मधमाशी आपल्या वसाहतीकडे येते आणि वसाहतीमधील इतर मधमाश्यांच्या स्वाधीन करते.

बाहेरून आणलेल्या मधामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. ते कमी करण्यासाठी मधमाश्या त्यांच्या पंखांच्या साह्याने हवा घालून जास्तीचे पाणी काढून घेतात. ज्या वेळी मधामध्ये २० टक्के पाण्याचे प्रमाण राहते.

त्या वेळी मधमाश्या त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या मेणग्रंथीच्या साह्याने मेण तयार करून मध पोकळीतील तयार झालेले मधाचे कप्पे (घर) बंद करते. हे बंद केलेले मधकप्पे मधमाश्या त्यांच्या अडचणीच्या किंवा गरजेच्या वेळी वापरतात. हा मध खरा पक्व झालेला मध असतो.

कोणत्याही पदार्थाची टिकवणक्षमता वाढावी म्हणून आपण त्यात प्रिझर्व्हेटिव्ह टाकतो. निसर्गाने मधमाशीच्या शरीरातच प्रिझर्व्हेटिव्ह तयार करून दिलेला आहे. मधमाशी मधाचे रूपांतर करत असताना ग्लुकॉनिक आम्ल तयार करते, ज्याचा सामू कमी असतो.

हे आम्ल मधात मिसळल्यामुळे त्यात जिवाणू, बुरशी किंवा मध खराब करणारे कोणतेही जीव वाढत नाहीत. म्हणूनच मधाची साठवणक्षमता अनेक वर्षांची आहे. मध कधीही खराब होत नाही, अर्थात पक्व झालेला मध काढला असेल तरच!

पिनोकेब्रिन नावाचे अ‍ॅन्टिऑक्सिडंट या पृथ्वीतलावर फक्त मधमाशीच तयार करू शकते. असा हा महत्त्वाचा घटक फक्त मधमाशीपासून मिळत असलेल्या मध आणि प्रोपोलिस या मध्येच आढळून येतो. पिनोकेब्रिनमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.

मधापासून दोन प्रकारच्या महत्त्वाच्या साखर मिळतात. पहिली म्हणजे ग्लुकोज. ती रक्तामध्ये लगेच शोषली जाऊन शरीराला तत्काळ ऊर्जा देते. यामुळे मधाचे सेवन केल्याबरोबर एक वेगळाच उत्साह वाटतो. दुसरी साखर म्हणजे फ्रुक्टोज.

जी रक्तात हळुवार शोषली जाते आणि शरीराला जास्त काळ ऊर्जा देते. अनेक गोड पदार्थ खाल्ल्यानंतर वजन वाढण्याची भीती असते किंवा त्याचे अनिष्ट परिणाम शरीरावर होतात. परंतु मधाचे सेवन केल्यामुळे त्यामध्ये असलेल्या अ‍ॅन्टिऑक्सिडंट तत्त्वामुळे आणि जीवनसत्त्वांमुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते.

मधामध्ये स्निग्ध पदार्थ नसल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही, सोडिअम नसल्यामुळे रक्तदाब वाढत नाही. याउलट सर्व शरीरक्रिया सुरळीत चालण्यासाठी मधाचे सेवन फायदेशीरच ठरते. मधाचे सेवन केल्यामुळे झटपट तसेच दीर्घकालीन ऊर्जा मिळत असल्यामुळे शरीराला उत्तेजना मिळते, थकवा जातो.

अनेक वर्षांपासून ओपेरा सिंगर मधाचे सेवन करतात. ज्यामुळे गाताना त्यांची ऊर्जा टिकून राहते. तसेच घसाही चांगला राहतो. पहिल्या महायुद्धामध्ये सैनिकांना झालेल्या जखमा लवकर भरून येण्यासाठी कॉडलिव्हर ऑइलसोबत मधाचे मिश्रण वापरण्यात आले.

प्राचीन संस्कृतीमध्ये मधाचा अनेक गोष्टींसाठी वापर होत असल्याचे संदर्भ आहेत. आजच्या प्रगत मेडिकल सायन्सने सुद्धा मध आणि मधापासून मिळणाऱ्या अनेक पदार्थांचे मानवी जीवनातील महत्त्व मान्य करून त्यापासून अनेक पदार्थांची निर्मिती केली आहे.

एक किलो मध तयार करायला मधमाशीला एक लाख लोड मकरंद लागतो, ज्यासाठी तिला एक कोटी फुलांना भेटी द्याव्या लागतात, ज्यातून तिचा प्रवास चार लाख किलोमीटर होतो. हे अंतर म्हणजे पृथ्वीला दोन प्रदक्षिणा.

यातून समजून घ्या की मध किती मौल्यवान आहे आणि म्हणूनच मधाला अमृत म्हटले जाते. या सर्व बाबींचा विचार करता आपण सर्वांनी मधमाशीचे जतन केले पाहिजे; तरच आपल्याला गोड मधाबरोबरच मधमाशीमुळे पराभीवनाद्वारे निर्माण होणारे अन्नधान्य खायला मिळेल.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT