Gramnamacha Itihas Book Agrowon
ॲग्रो विशेष

Book Review: महाराष्ट्रातील निवडक ग्रामनामांचा इतिहास

History of Places Name: 'महाराष्ट्रातील निवडक ग्रामनामांचा इतिहास' हे पुस्तक म्हणजे स्थानिक इतिहासाच्या शोधात भटकणाऱ्या वाचकासाठी अमूल्य ठेवा आहे. महेश पानसरे यांनी ३७२ गावांची नावे, त्यांच्या मूळ कथा, स्थानिक दंतकथा व ऐतिहासिक संदर्भांचा सखोल मागोवा घेतलेला आहे.

सतीश कुलकर्णी

सतीश कुलकर्णी

Maharashtratil Nivdak Gramnamancha Itihas Book:

पुस्तकाचे नाव : महाराष्ट्रातील निवडक ग्रामनामांचा इतिहास

लेखक संकलक : महेश दामोदर पानसरे

प्रकाशन : सनय प्रकाशन, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे

पाने : २५६

मूल्य : २५०

महाराष्ट्राला इतिहासाची एक समृद्ध परंपरा लाभलेली आहे. त्यापूर्वीही महाराष्ट्रात मौर्य, सातवाहन, वाकाटक, कलाचुरू, चालुक्य, यादव, बहामनी, मुघल, मराठा, पेशवा, पौर्तुगीज, ब्रिटिश इ. अनेक राजवटी होऊन गेल्या. एकेकाळी संपूर्ण भारतभर मराठ्यांचा दबदबा होता. प्रत्येक राजवटीमध्ये त्या त्या राजाच्या व राज्याच्या धोरणांनुसार कमीअधिक बदलही घडले. राजवटी कुठल्याही असल्या तरी प्राचीन काळापासून गाव हे बहुधा स्वयंपूर्ण राहिले. प्रत्येक गावाला स्वतःचा असा एक इतिहास असतो. तेथील मूळ व्यवस्था व परंपरामध्ये होणारे बदल हे अल्प प्रमाणात का होईना पण नक्की असतात.

प्रत्येक गावाच्या व स्थानाच्या इतिहासामध्ये त्यांच्या नावांमागील कथा, दंतकथा वयोवृद्ध मंडळी कायम सांगत असतात. आपल्या गावाचे इतिहासातील स्थान शोधण्याचा प्रयत्नही संशोधक मंडळी करत असतात. प्रत्येक राजवटीमध्ये अन्य काही बदलांसोबतच त्यांच्या नावामध्येही बदल होत गेले असतात. काही त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी बदललेली असतात, तर काही अपभ्रंशातून बदलत गेलेली असतात. म्हणजे गाव एकच असले तरी त्यांच्या नावांमध्ये होत गेलेले बदल मात्र तीव्रतेने जाणवतील असे आहेत.

इतिहास संशोधकांचे सोडा पण आपल्यासारख्या सामान्यांनाही आपल्या गावांची किंवा त्या त्या भागांची नावे कशी पडली, याचे कुतूहल असतेच. पण आपले कुतूहल आळसाअभावी असेच जिरून जाते किंवा आपल्या गावाच्या नावांविषयी गावपातळीवरच चर्चा करून विरले जाते. असेच कुतूहल महेश पानसरे यांनाही होते. पण त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. त्याच्या नोंदी शोधल्या. असे करत एक दोन नाही, तर चक्क महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि निवडक ३७२ गावांच्या नावांमागील इतिहासाचा धांडोळा घेतला.

आवश्यक तिथे इतिहास तज्ज्ञांची मदत घेतली. सखोल अभ्यास केला. प्रत्येक गावाच्या अक्षांश, रेखांश, तालुका, जिल्हा, पिनकोडसह माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे, मुंबईसारख्या काही मोठ्या व महत्त्वाच्या गावांबाबत माहिती देताना तेथील पेठा व अगदी महत्त्वाच्या गल्ल्या, रस्ते, चौक, उपनगरे यांचीही माहिती अंतर्भूत केलेली आहे. त्यासाठी आवश्यक ते ऐतिहासिक, धार्मिक व अन्य संदर्भ दिलेले आहेत. आपल्या या प्रयत्नांविषयी मनोगतामध्ये ते सांगतात, ‘गाव कितीही लहान असले किंवा इतिहासात त्याचा उल्लेख नसला तरीही त्याच्या नावाचा मात्र एक इतिहास नक्कीच असतो.’

प्राचीन काळापासून प्रत्येक गावाची एक संरचना होती. त्यात तेथील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक बाबींचे प्रतिबिंब पडलेले दिसते. प्रत्येक गाव हे प्रशासकीय पातळीवर पायाभूत म्हणूनही तितकेच महत्त्वाचे असते. त्या गावांचा इतिहास कुठे नोंदवला गेला नसला तरी त्या त्या गावातील वयस्कर आपल्या पुढील पिढींनाही नक्की सांगत असतात. त्यातून स्थानिक इतिहासाचे अनेक पदर उलगडत असतात. ते आपल्याला पकडता यायला हवेत.

‘स्थलनामव्युत्पत्तिकोश’ असे साधारण स्वरूप या लेखनाचे आहे. कोणतेही पान उघडून कोठूनही वाचायला सुरू करावे आणि रमून जावे, असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. हातात घेतले की आपल्या स्वतःच्या गावांच्या नावांचा इतिहास शोधायला सरसावल्याशिवाय माणूस राहत नाही. अशा पुस्तकांमुळे चाळवलेले साधे कुतूहल माणसाला इतिहास संशोधनापर्यंत नक्कीच घेऊन जाईल, इतकी ताकद त्यात नक्कीच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Suicides: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ‘एसएओ’ पद रिक्‍त

Crop Insurance: मुदतवाढीनंतरही पीकविम्याच्या अर्जांमध्ये ५० टक्क्यांची घट

Agri Student Protest: कृषी पदवीधारकांचा परभणीत आक्रोश मोर्चा

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

Hingoli Heavy Rain: हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT