Sugarcane Farming
Sugarcane Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : ऊस उत्पादकांची अगतिकता

Team Agrowon

अतिशय कमी श्रम असणारी शेती पीक पद्धती म्हणजे ऊस (Sugarcane Farming) लावणे, अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याकडे (Sugarcane Farmer) पुरेसे पशुधन नसल्याने सेंद्रिय खताची (Organic Fertilizer) गरज भागवली जात नाही.

त्यामुळे जमिनीची प्रत खालावून एकूण उत्पादनात घट येत चाललेली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याची एकूण उत्पादकता अनुक्रमे सरासरी एकरी ३३ ते ३७ टन एवढी खालावलेली आहे

काही शेतकरी अपवाद वगळता एकरी ६० ते ७० टनांपर्यंत, तर काही बोटांवर मोजण्याइतपत शेतकरी एकरी शंभर टन उत्पादनाचे उद्दिष्ट धरून काम करत आहेत. मुळात शेतकऱ्यांना ऊस उत्पादकाच्या तांत्रिक बाबींबद्दल फारशी माहिती नाही.

केवळ शेजारचा शेतकरी करतो म्हणून आपणही तसेच अनुकरण करायचं आणि येईल त्या उत्पादनावर समाधान मानायचं. उसाला अमर्याद पाण्याचा वापर होतोय. यासाठी किती तरी वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात.

काही ठिकाणी भरपूर पाऊस आहे म्हणून, दुसरं काहीच पीक येत नाही म्हणून ऊस लागण, खोडवा सलग घेऊन परत खोडवा काढून लागलीच ऊस लागण करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.

तर काही शेतकरी वर्षभर जनावरांना हमखास हिरवा चारा उपलब्ध होतो म्हणून ऊस लावणारे आहेत. उसाच्या वाढीच्या अवस्थेत पाला काढणे आणि ऊस तोडणीच्या वेळी ऊस वाड्यांचा जनावरांच्या चाऱ्यासाठी सर्रास वापर करणे हा एक कलमी कार्यक्रम ठरलेला असतो.

खोडवा तुटून परत रान तयार होईपर्यंत सुरू हंगामही (१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी) संपलेला असतो. त्यानंतर लागण करून खर्चाइतकेच उत्पन्न घेणारा शेतकरी काय साध्य करतोय हाच चिंतनाचा विषय झालेला आहे.

कारखानदारांना फक्त ऊस पुरवठादार हवे आहेत. उसाची रिकव्हरी किंवा उसाची उत्पादकता यांच्याशी त्यांचे काही देणे घेणे नाही. क्वचितच काही कारखान्यांकडून ऊस उत्पादन वाढीसाठी उपाययोजना चाललेली आहे ती पण अगदी तोकडी आहे.

ऊस तोडणीनंतर ऊस वाहतूक करणाऱ्यांच्या कडून एन्ट्री, खुशाली, दक्षिणा आदी नावाखाली ऊस उत्पादकांना, शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते.

शिवाय ऊस वाहतूक करताना चालकांकडून बेदरकारपणे वाहन चालवताना स्पीड ब्रेकर जवळ, खड्यांच्या ठिकाणी तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या लागून किती तरी ऊस, ऊसकांड्या रस्त्यावर सांडल्या जातात.

काही ठिकाणी रसवंतिगृहाजवळ वाहन लावून फुकटात रस पिताना, रसवंतिगृहाच्या मालकास ऊस उपसताना काणाडोळा किंवा मूकसंमती दिलेली असते.

विभक्त कुटुंब पद्धती आणि त्यामुळे तुकड्यांमध्ये विभागलेली शेती, दोन्ही, तिन्ही बाजूंनी शेजारी ऊस करतात मग मधल्यामध्ये आपलं दुसरं काही पीक येत नाही म्हणून नाइलाजाने ऊस लावावा लागतो.

छोट्या छोट्या तुकड्यात मशीन चालत नाही आणि अलीकडे ऊसतोडणी मजूरही कमीच येत आहेत. जे आलेत ते पैशाची आव्वाच्या सव्वा मागणी करत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या अगतिकतेतून बाहेर पडण्यासाठी स्वतःला काही निर्बंध घालून घेण्याची गरज आहे.

जसे की, ऊस लागण, खत व्यवस्थापन, तोडणीपर्यंतच्या योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा काटकसरीने वापर करणे, माती परीक्षणानुसार योग्य निविष्ठांचा, एकात्मिक पद्धतीने वापर करणे, उसाला स्पर्धा करणाऱ्या उदा. गहू, शाळू, मका आदींचा आंतरपीक म्हणून समावेश न करता बेवड पिकांची उदा भुईमूग, मिरची, कांदा आदींचा आंतरपिकांत समावेश करावा.

असे केल्यास त्यांच्या उत्पन्नातून उसाच्या एकूण उत्पादन खर्चात बचत करता येते. समूह शेती पद्धतीत छोट्याछोट्या तुकड्यांची शेती एकत्र करून एकच पीक पद्धती केल्याने ऊस लावणी पासून तोडणीपर्यंतच्या मजुरी, निविष्ठा, श्रम, वेळेची आणि पैशाची बचत होते.

- कृषिपंडित सुरेश पाटील, आयसीएआर राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेतकरी, मु. पो. बुदिहाळ, जि. बेळगाव (९७४१६२१६५०)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT