Mumbai News: अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी (ता. २) पत्रकार परिषदेत केली.
गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रशासन व संघटन गणेश पाटील, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते चरणजित सिंह सप्रा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रमेश शेट्टी, श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, ‘‘महाराष्ट्राला मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपले असून सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. शेतकऱ्यांच्या मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या संकटात त्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे.
मेमध्ये काही पिके काढणीला येतात तेव्हाच पावसाने सर्व वाहून नेले. केळी, केसर आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात भाजीपाला, टोमॅटो, कांदा, डाळिंब पिकाचेही नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली, काही ठिकाणी पशुधन गेले, पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे खरिपाची तयारी सुरू असतानाच हे संकट ओढवल्याने आता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, शेतकरी मोडून पडला आहे. पण सरकारची मदत करण्याची मानसिकता दिसत नाही. एनडीआरएफच्या निकषाने मदत करायची की एसडीआरएफच्या निकषाने ह्यात शेतकऱ्याला काही देणेघेणे नाही, त्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे.
सरकारने ३ हेक्टरचा निकष बदलून २ हेक्टर केला हे आणखी अन्यायकारक आहे. पीकविम्याचे निकष बदलल्याने त्यातूनही फारशी मदत मिळत नाही. सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले पण प्रत्यक्षात प्रशासन काम करताना दिसत नाही. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा करून आढावा घेतला पाहिजे पण तसे होतानाही दिसत नाही.’’
थोरात म्हणाले, ‘‘आज कांद्याला एकरी ६० हजार रुपये खर्च येतो तर टोमॅटोला एकरी ५० हजारांचा खर्च येतो. शेती करणे महाग झाले आहे. सरकारने अशा संकटावेळी शेतकऱ्याला भरीव मदत दिली पाहिजे.’’
‘कर्जमाफीचा विसर’
ते म्हणाले, ‘निवडणूक प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती पण सत्तेत आल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडलेला दिसत आहे. काँग्रेस आघाडी सरकार व मविआ सरकार असताना शेतकऱ्याला सातत्याने मदत दिली, कर्जमाफी केली पण आताचे सरकार कर्जमाफीवर बोलत नाही. शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. केवळ कोरड्या घोषणा करण्याऐवजी सरकारने कर्जमाफी जाहीर केली पाहिजे.’
कृषी विभाग ‘ओसाड’ तर बागायती विभाग कोणता?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत ते म्हणाले, ‘शेतकरी संकटात असताना त्याला आधार देण्याची गरज असते, आपण पालक आहोत अशी विधाने करून दुखवू नये. संवेदनशीलपणे वागले पाहिजे. कृषिमंत्री हे पद महत्त्वाचे आहे, मी स्वतः या विभागाचा मंत्री होतो, शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री होते पण कोकाटे यांनी ती ‘ओसाड गावची पाटीलकी’ का वाटते हे माहीत नाही. कृषी मंत्रालय ओसाड गावची पाटीलकी आहे तर मग बागायती विभाग कोणता हे त्यांनी सांगावे, असा टोला त्यांनी लगावला.
‘तांबेंचे विधान बालीशपणाचे’
विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘आपल्यासाठी ज्यांनी काही केले त्याचे ऋण ठेवावे. काँग्रेस पक्षाने त्यांना खूप काही दिले आहे. त्यांचे बोलणे बालीशपणाचे होते, त्यांना अजून खूप शिकायचे आहे आणि आत्मचिंतन त्यांनीच करावे.’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.