
Ahilyanagar News : धर्माच्या नावावर विधानसभा निवडणुकीत जनतेला फसवले गेले. निवडणुकीनंतर तालुक्याची बसवलेली घडी थोडी विस्कटली. सरळ विरोधक परवडले पण दोन्हीकडे राहणारे नको. चुकीच्या पद्धतीने वागले, तर त्याचा त्रास सर्वांना होतो. चाळीस वर्षांत एकही दिवस विश्रांती घेतली नाही, सातत्याने काम केले. धरण, कालवे आपणच पूर्ण केले. आता हक्काचे पाणी मिळण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागेल असे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मत व्यक्त केले.
संगमनेर खुर्द (ता. संगमनेर) येथे शनिवारी (ता.३) सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी युवक व कार्यकर्त्यांच्या स्नेहसंवाद मेळावा झाला. बाळासाहेब थोरात यांच्यासह ॲड. माधव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, इंद्रजित थोरात, संपत डोंगरे, पांडुरंग घुले, आर. बी. रहाणे, अर्चना बालोडे, रामनाथ कुटे, विनोद हासे, विजय राहणे, विलास शिंदे, अंकुश ताजणे, दिलीप नागरे, राजेंद्र चकोर, संतोष मांडेकर आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, की तालुक्याला, विविध सहकारी संस्थांना आमदारकीचे संरक्षणाचे कवच होते. जाती धर्माच्या नावाखाली खोट्या भूलथापांमुळे हे कवच जनतेने घालवले. हक्काचे पाणी तालुक्याला मिळालेच पाहिजे. कारखान्याने कायम सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीवर काम केले असून, आगामी काळामध्ये प्रति एकरी शंभर टन ऊस उत्पादन करावा लागणार आहे.
संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. कालव्यांच्या वरील भागातील शेतकऱ्यांनाही त्यांचे पाणी देण्यासाठी तातडीने काम झाले पाहिजे. आम्ही हक्काचे पाणी मागत आहोत. ते मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पाइप टाकले.
हे पाइप अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून फोडले, असा सवाल करताना मंत्री महोदय असा चुकीचा आदेश देतील, असे मला वाटत नाही असे ते म्हणाले. मग हे पाइप फोडण्याचे धारिष्ट झाले कसे? कोणाच्या आदेशावरून पाइप फोडले असा प्रश्न उपस्थित करत पाण्यासाठी संघर्ष करू असे थोरात म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.